Wednesday, October 23, 2019

किल्ले इंद्राई आणि थरार ! - Indrai Fort

पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जवळपास सर्व किल्ल्यांवर तंगडतोड झाल्यानंतर आता हे लांबचे, काहीसे अल्प परिचित किल्ले खुणावू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सातमाळ रांगेतले किल्ले एकदम राकट. त्यातील धोडप सोडला तर बाकी सर्वच बघायचे राहिलेले. ह्या रांगेतीलच एक किल्ला म्हणजे चांदवड जवळ असलेला इंद्राई !



इंद्राई डावीकडे, राजधेर उजवीकडे


खूप दिवसांनी असं झालं की चक्क पाच जण ट्रेकला यायला तयार झाले! पहाटे साडेपाचच्या सुमारास WR -V सर्वांना घेऊन निघाली.प्रवासात तुफान मजा करत, निवडणुकांच्या उमेदवारांवर ताशेरे ओढत आणि मध्ये मध्ये चहाचे ब्रेक घेत साडेअकराच्या सुमारास आम्ही किल्ल्याच्या पायथ्याच्या इंद्राईवाडीमध्ये पोचलो.
चांदवड जवळील झेंडूच्या शेतात

 आकाश ढगाळलं होतं, त्यामुळे उन्हाचा त्रास कमी होणार होता. खाली असणाऱ्या घरांमध्ये चौकशी करून आम्ही पायवाट पकडली.
दोन पातेली (मोठे खिचडी आणि छोटे चहा साठी), दोन टेंट्स, स्लीपिंग मॅट्स, एक दुर्बीण, कॅमेरा, थंडीचे कपडे वगैरे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाच किलोचा गॅस सिलेंडर असं 'हलकं' सामान घेऊन आम्ही निघालो. हे सिलेंडर प्रकरण माझ्यासाठी पहिल्यांदाच होतं. पुष्कर आणि सुमंत मात्र त्याबद्दल भलतेच कॉन्फिडन्ट होते.

अर्ध्या तासात एका पठारावर आलो. किल्ल्यावर येण्यासाठी तीन मुख्य वाटा आहेत. त्यातील इंद्राईवाडी आणि राजधेरवाडी मधून येणाऱ्या वाटा इथे पठारावर एकत्र येतात. इथून पुढे हि वाट आपल्याला कातळ कड्यापाशी घेऊन जाते. वडबारे नावाच्या गावामधून येणारी वाट कातळकड्याच्या पायथ्याशी ह्या वाटेल येऊन मिळते (नकाशा बघा).


किल्ल्यावर येणाऱ्या पायवाटा



किल्ल्यावरील स्थलदर्शन
पठारावरून कातळ कड्याकडे जाताना वाटेत बारीक पाऊस सुरू झाला. पंधरा-वीस मिनिटात कातळ कड्यापाशी आम्ही पोचलो. इथे कड्याच्या डावीकडच्या टोकाला वळसा घालून थोडं पुढे आलं की उजवीकडे कड्यात खोदून काढलेल्या पायऱ्या आपलं लक्ष वेधून घेतात.

पायऱ्या उजवीकडे ठेवून, कड्यालगत सरळ थोडं पुढे गेलं की काही गुहा दृष्टीस पडतात. ह्या पाण्यानं भरल्या होत्या. त्या पाहून परत मागे पायऱ्यांपाशी आलो. पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. काही फुटांवरचंही दिसत नव्हतं. चार पायऱ्या चढून आम्हाला कोरडी जागा मिळाली. पाऊस कमी व्हायच्या आशेनं तिथे काही वेळ थांबलो.



ह्या पायऱ्या दगड कातून काढल्या आहेत. C शेपचा कट आहे. पायऱ्यांवर जागोजागी पोस्ट होल्स आहेत (लाकडी खांब रोवण्यासाठी केलेले गोल किंवा चौकोनी खड्डे). तसेच उजव्या बाजूच्या कातळ भिंतीमध्येसुद्धा अनेक ठिकाणी छोटे चौकोनी पोस्ट होल्स आहेत. पूर्वीच्या काळात ह्या पायऱ्यांवर जागोजागी छप्पर आणि कठड्याची व्यवस्था असावी हे कळून येतं. पायऱ्यांच्या मध्ये पाणी वाहून जाण्यासाठी चॅनेल खणले आहेत. पावसाचं पाणी बरोबर ह्या चॅनेल मधून वाहून बाहेर दरीकडे ढकललं होतं, त्यामुळेच आम्ही बसलो होतो तो भाग कोरडा राहिला होता. इथे दुर्बीण बाहेर काढली. सहज इकडे तिकडे न्याहाळताना किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला असलेल्या माळावर एक जुनं मशीद दिसून आलं (त्याचे फोटो घेता आले नाहीत. exact लोकेशन साठी मॅप बघावा).




कोरीव पायऱ्या



थोड्या वेळात पाऊस कमी झाला, आणि आम्ही पुढे निघालो.
पायऱ्यांचा मार्ग काटकोनात उजवीकडे वळला. इथून पुढे हा कातळ वर पर्यंत खोदून, दोन कातळ भिंतीमधून मार्ग काढला आहे. नाणेघाट आठवला, फक्त तो वरील बाजूने नैसर्गिकरीत्या उघडा आहे. हा मार्ग मात्र पूर्ण डोंगर पोखरून खाच तयार करून बनवला आहे.
सध्या पुणे-नाशिक महामार्गावर पुण्याहून जाताना संगमनेरच्या अलीकडे चंदनापुरी घाट आहे, त्याचं काम अगदी असंच डोंगर मध्येच खणून खाच तयार करून केलेलं आहे. आज आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आणि सामुग्री आहे, त्या काळी छन्नी-हातोडा आणि हात इतकीच सामुग्री होती.

पायऱ्या जिथे काटकोनात वळतात तिथेच उजव्या हाताला भिंतीमध्ये पहारेकऱ्यांची छोटीशी चौकोनी देवडी खणून काढली आहे. आकार अंदाजे पाच बाय पाच फूट.
माझ्या अंदाजानुसार ह्या ठिकाणी दोन कातळ भिंतींमध्ये बांधलेला किल्ल्याचा एक दरवाजा नक्की असणार. पूर्वी किल्ल्याच्या दरवाज्याला आतल्या बाजूने आडवे असे एक/दोन/तीन अडसर लावायचे. हे अडसर अडकवण्याच्या खोबण्या ह्या ठिकाणी समोरासमोरील कातळ भिंतीमध्ये दिसून येतात.
ह्याच ठिकाणी पायऱ्यांवर एक कमळ शिल्प पडलं आहे. वरील बाजूला असणाऱ्या, सध्या भग्नावस्थेत असलेल्या दरवाज्यावरील हे कमलपुष्प असावे. काळाच्या ओघात घरंगळून खाली आले.


कमळशिल्प



पहारेकर्यांची देवडी


कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या
ह्या पायऱ्या चढून वर गेल्यावर आपल्याला किल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो. दरवाज्याचे केवळ काही दगड शिल्लक राहिले आहेत. दरवाज्याच्या अलीकडे, डाव्या भिंतीवर फारसी भाषेतील शिलालेख आणि उजव्या भिंतीवर एक कोनाडा आहे.

शिलालेख

भग्नावस्थेतील किल्ल्याचा मुख्य दरवाजा

इथून पुढे पुसट झालेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर खोदीव पावठ्या येतात. त्या चढून पुढे आल्यावर सरळ चालत पुढे जावे. डोंगर चिंचोळा आहे. आणि आजूबाजूला काही अवशेष नाहीत. दहा मिनिटं चालत पुढे आल्यावर आपल्याला समोर एक टेकडी दिसते. इथे डाव्या-उजव्या बाजूला दरी आहे. उजवीकडे अगदी दरीच्या तोंडाशी जमिनीशी मिळती जुळती झालेली तटबंदीचे काही दगड दिसले. इथून समोर लांबवर राजधेर, कोळधेर, कांचना, इखारा, धोडप, रवळ्या-जवळ्या अशी एकापेक्षा एक किल्ल्यांची शृंखलाच दृष्टीस पडते. तर डाव्या बाजूस दोन रोडग्यांचा डोंगर, त्याच्या मागे चांदवड किल्ला आणि लांबवर परसूल धरण नजरेस पडतं.


किल्ल्यांची शृंखला (brightness कमी केला आहे)

थोडं पुढे चालत गेल्यावर टेकडीच्या डाव्या बाजूला वाड्याचे अवशेष आहेत. शिल्लक असलेले बांधकाम विटा आणि सिमेंट वापरून केलेले दिसते. त्यावरून ते तुलनेनं नवीन असावं असा अंदाज.
इथे उजवीकडे पाण्याची खांबटाकी आहेत. टेकडी उजवीकडे ठेवून पुढे चालत गेल्यास उजव्या बाजूला खोदलेल्या गुहांची शृंखला आहे. एकाच धाटणीतल्या ह्या जवळपास वीस गुहा आहेत. प्रत्येक गुहेला दरवाजा आणि बाजूला एक किंवा दोन खिडक्या आहेत. गुहेच्या बाहेरील बाजूस नक्षीदार खांब आहेत. ह्या खांबांवर मी खुणा दिसतायत का ते बघितलं, जेणेकरून त्यांच्या बांधकामाच्या काळाचा अंदाज येईल, पण मला नाही समजू शकलं.




सर्व गुहा पाण्यानं भरल्या होत्या. गुहांची रांग संपते तिथे पाण्याचं विशाल टाकं आहे. आर्किटेक्ट पुष्करच्या मते हे पाण्याचे टाके नसून एक सभागृह असावं. ही वास्तू पाण्यानं पूर्ण भरलेली असल्यानं त्याच्या खोलीचा अंदाज काही आला नाही. पाण्याच्या टाक्याशी तुलना केली तर वास्तू प्रचंड मोठी आहे हे मात्र नक्की.



गुहांची शृंखला
ह्या सर्व गुहांचा उद्देश काय असावा? बौद्ध भिक्खुंच्या राहण्याची जागा असावी का? की त्या काळातील प्रवाशांची केलेली सोया असावी?
अजिंठा लेण्यात अनेक छोट्या अंधाऱ्या खोल्या आहेत, ज्याचा उपयोग ध्यान धारणेसाठी व्हायचा असं तिथले गाईड सांगतात. ह्या गुहांचंही तसंच काही असेल का?
"कोणी बांधलं?", "का बांधलं?", "त्या काळी इथे कसं असेल?" हे विचारच मला किल्ल्यांवर भटकण्यास उत्साह देतात. आपली कल्पनाशक्ती लावायची. कधी चूक, कधी बरोबर. पण त्यातली मजाच काही खास !
ह्या सर्व बांधकामावरून इंद्राई हा एक प्राचीन किल्ला आहे ह्यात शंका नाही.

अंदाजे पाच वाजले असतील. सर्वत्र धुकं पसरलं होतं. पाऊसही होता. आम्ही भिजलो होतो. प्रत्येकाच्या मनात "आजच्या पुरतं बस्स झालं" हीच भावना.
आजची रात्र शंकराच्या मंदिरात काढून बाकी किल्ला उद्या सकाळी उठून बघायचा असं ठरलं.

पावलांचा वेग वाढला. गुहांपासून उजवीकडे कातळात खोदलेल्या काही पायऱ्या आहेत. ह्या चढून पुढे दहा मिनिटं चालत गेल्यावर भगवा ध्वज दृष्टीस पडला. आम्ही मंदिर गाठलं.
हे मंदिर म्हणजे बांधलेलं मंदिर नसून खडकात कोरून काढलेलं मंदिर आहे. (भुदरगडावरही असंच कोरून काढलेलं एक छोटंसं मंदिर आहे).
मंदिर कोरणाऱ्यांनी मध्यभागी मूळ दगडातून कोरलेले चार खांब ठेवले आहेत. गाभारा मागील बाजूस वेगळा काढलेला आहे. गाभाऱ्यातील शंकराची पिंड मात्र तुलनेनं नवीन वाटली. गाभाऱ्याच्या बाहेर डावी-उजवीकडे कोनाडे आहेत.
समोर प्रचंड विस्तार असलेला, आयताकृती बांधीव तलाव. तलावाच्या बाजूला काही अंतरावर अर्धवर्तुळाकार रचनेतील बांधकाम.
एकंदरीत सगळं बघता हा परिसर म्हणजे पूर्वी एखादं तीर्थक्षेत्र असावं. किल्ल्यावर लोकांचा भरपूर वावर असावा. त्या काळात ह्या परिसराचं वैभव बघण्यासारखं असणार !

मागे दोन रोड्ग्यांचा डोंगर, त्याच्यामागे चांदवड किल्ला

हेच ते शिवमंदिर

गुहेत स्थिरावलो आणि इथून पुढे आमच्यासमोर एकापेक्षा एक अश्या अडचणी यायला सुरुवात झाली.
मंदिरात जेमतेम चार माणसं दाटीवाटीत झोपू शकतील इतकीच जागा होती. त्यातील बरीच जागा पाण्यानं आधीच धरून ठेवली होती. आम्ही होतो पाच जण !
खूप विचार आणि चर्चा झाली, कोण कुठे कसं झोपेल ते ठरलं.
एकूणच काय, तर रात्री टेंट टाकून मस्त चांदण्यात झोपावं, रात्रीचं गडावर थोडं भटकावं अश्या काही स्वप्नांना कात्री लागली.

"चहा तर व्हायलाच पाहिजे"

पुष्करनं सिलेंडर बाहेर काढला. अमित आणि पुष्कर त्यावर सिलेंडरची थाळी बसवू लागले. काय चैन आहे बघा, बाहेर मुसळधार पाऊस, सगळीकडे ओलं किच्च झालेलं, आणि आग पेटवायला काहीच कष्ट नव्हते !
मी, श्रुती आणि हर्षल कौतुकानं त्यांच्याकडे बघत होतो.

तितक्यात राडा झाला ! त्या सिलेंडरची थाळी बसवत असताना गॅस लीक झाल्याचा आवाज येऊ लागला.
"अरे थांब, अरे थांब, आता असं फिरव" असं म्हणेपर्यंत त्या थाळीलाच जोडलेल्या लायटर मधून ठिणगी पडली, आणि गॅसचा भडका उडाला !!
लीक होणाऱ्या गॅसमुळे ज्वाळा अजूनच मोठी होऊ लागली. दोन सेकंद सगळे लांबूनच त्याच्याकडे बघत होते. त्या थाळीवर आलेला प्लास्टिकचा नॉब वितळून त्याचे थेंब सिलेंडर वरती पडू लागले.

अक्षरशः: फा ट ली !

"बाहेर व्हा.. बाहेर व्हा.. ती बदली घे, भरून आण त्या तलावातून ..."
सगळे पळत बाहेर ! हर्शलनी बदली भरून आणली आणि गुहेच्या दारातूनच त्या सिलेंडरवर ओतली. वाईट म्हणजे आग शांत झालीच नाही..
"अजून एक बदली भरून घेऊन ये .. लवकर.."
अजून एक बदली आणली आणि त्या पेटत्या सिलेंडरवर पालथी केली.
आग शांत झाली, पण गॅस लीक चा आवाज अजूनही येत होता.
पुष्करनं पटकन पुढे होऊन ती थाळी उलट फिरवून काढली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला..

सगळे आत आलो, एकमेकांची तोंड बघण्यात काही मिनिटं गेली.
सर्वांनी जमिनीवर बघितलं. उरली सुरली कोरडी जागासुद्धा पाण्यानं व्यापून टाकली.
"आता काय करायचं ?" मोठा प्रश्न होता. पावसाच्या तयारीनं कोणी आलोच नव्हतो ! थंडीचे कपडे सोबत आणले होते.
पावणेसहा वाजले. अंधार पडू लागला. ओले कपडे आणि वाढती थंडी.
"उतरू खाली.. गावात जाऊन झोपू" - एक नवा विचार.

सर्वांनाच पटलं.

"इतकं आलोय तर चहा व्हायलाच पाहिजे, तो घेऊ आणि निघू"
"अरे तो सिलेंडरचा मॅटर नकोय पुन्हा ... चहा कसला करतो.."
"लावू रे.. नीट लावू .. थांब आधी त्या थाळीचा थोडा अभ्यास करू.. मग च लावू."
थाळी आणि त्याला असलेल्या लायटरचं सेटिंग नीट समजून घेतलं आणि थाळी नीट सिलेंडरवरती बसवली. नॉब फिरवला, गॅस चालू झाला.

'कंट्रोल आणि आऊट ऑफ कंट्रोल' मधला फरक !

पाचव्या मिनिटाला चहा तयार होता. सोबत बिस्किटं आणि केक हाणले.
"आवरा रे.. अंधार वाढत चाललाय"

जणू किल्ल्यालाच आम्ही नकोसे झालो होतो. सव्वासहा वाजता देवाला नमस्कार करून उतरायला सुरुवात केली. समोर गडद धुकं.. आणि अंधार .. मुसळधार पाऊस .. दहा फुटांवरचंही दिसेना !
पंधरा मिनिटं चाललो आणि एका दरीच्या समोर येऊन थबकलो.
"बोंबला, वाट चुकलो.. फिरा मागे .. थोड्या अलीकडे बघा डावीकडे वाट गेलेली दिसतीये का.."

पुन्हा पाच मिनिटं बॅकट्रॅक. बारीक पायवाट उजवीकडे वरती जाताना दिसली. त्यावरून अंदाज बांधून डावीकडे जायला सुरुवात केली. पुढे आल्यावर त्याच वाटेवरून किल्ल्यावर आलो असं वाटलं. आपण त्या चिंचोळ्या भागात आहोत हे समजलं. इकडे तिकडे दरी, सरळ चालायचं !

तितक्यात धुकं थोडंसं बाजूला झालं आणि समोर बघतो तर काय.. काही फुटांवर दहा-बारा गायी पुतळ्यासारख्या उभ्या होत्या !! आमचे पुतळे व्हायचेच बाकी होते !
इतक्या जवळ जाऊन पण त्यांची आम्हाला आणि आमची त्यांना चाहूल पण लागली नाही.
हा क्षण पचवतो तोच त्यांच्यातून मध्येच एक घोडा पळत पळत उजवीकडून डावीकडे गेला..
अरे काय चाललंय काय.. गुरं इतक्या पावसात कोणी सोडली? आणि मध्येच तो घोडा कुठून आला?
'कैच्याकै च !'

एव्हाना सुमंत एकदम passive मोड मध्ये गेले होते. तोंडातून शब्दही फुटत नव्हता. त्यामुळे वाट शोधायच्या धडपडीत आम्ही चौघ च. श्रुती तिची भीती स्पष्ट बोलूनच मोकळी करत होती.
मला भीती वाटत नव्हती पण वाट सापडली नाही तर रात्र कुठे काढावी त्याची चिंता सतावत होती.
मोबाईल काढला. GPS चालू केलं. ट्रेक ला जायच्या आधी मॅप ऑफलाईन डाउनलोड करायची माझी सवय इथे उपयोगात आली. मॅप वर बघितलं तेव्हा समजलं आम्ही किल्ल्याच्या एकदम उत्तर टोकावर आलो आहोत.
खोदीव पायऱ्या मागे उजव्या हाताला कुठेतरी राहिल्या.
पुन्हा मागे फिरलो, GPS झिंदाबाद. गूगल मॅप झिंदाबाद.
वाट मिळेल तसं त्या खाचेच्या दिशेनं जायला सुरुवात केली. अनेक वेळेस समोर भलतीच कुठलीतरी घळई आली, मध्येच दाट काटेरी झुडुपं, काही ठिकाणी दहा फूट उभा ड्रॉप.. पायऱ्यांच्या अगदी जवळ येऊन पोचलो होतो. इकडे तिकडे बॅटरी मारून अखेरीस पायऱ्या नजरेस पडल्या, आणि खूप बरं वाटलं.
वाट सापडली !

पायऱ्या आल्यावर काय, सगळेच राजे ! तासाभरात किल्ला उतरला.

"चला, चांदवडला जाऊ, दोन घास शेवभाजी पोटात ढकलू, आणि पुढचं पुढे ठरवू"

इंद्राईला मनोमन नमस्कार करून, पुन्हा भेटायला यायची इच्छा व्यक्त केली, आणि तिथून निघालो. चांदवडला शेवभाजी हाणली, आणि निघालो.
सर्वच जण गाडी चालवणारे होते. प्रत्येकानं आळीपाळीनं थोडा वेळ डुलकी थोडा वेळ ड्रायविंग करत पहाटे चारच्या सुमारास पुण्याला पोचलो.

तर असा हा इंद्राईचा थरारक अनुभव !
आजपर्यंतच्या गड भटकंतीचा सर्व अनुभव पणाला लावायला लागला. निसर्गाचं रौद्र रूप आणि त्याच्या पुढे आपण किती क्षुद्र आहोत ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली !
आधुनिक तंत्रज्ञान आपली कशी मदत करू शकते तेही समजलं.

इंद्राईवर जाणाऱ्यांसाठी काही टिप्स -
१) किल्ला हिवाळ्यात करणे सोयीचे. अर्थात, आजकाल पावसाचा भरवसा नाही, त्यामुळे हवामानाचा पूर्ण अंदाज घेऊन जाणे.
२) किल्ल्यावर जाणारी वाट अवघड नाही. पावसाळ्यात मात्र वाटेचा अंदाज येणं अवघड आहे.
३) शंकराच्या मंदिरात दाटीवाटीत पाच जण झोपू शकतात. अलीकडील २० गुहा झोपेसाठी योग्य नाहीत. ओपन टेंट टाकून झोपायला पुष्कळ जागा आहे.
४) गडावर अनेक टाकी आहेत. परंतु कोणत्याच टाक्याचे पाणी पिण्यास तितकेसे चांगले नाही. पातेले घेऊन जाणे, आणि पाणी उकळून पिणे.
५) जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती.

Leave nothing but footprints. Take nothing but memories.

आणि हो .. गॅस सिलेंडर ट्रेकला न्यावा की न न्यावा ह्यावरून आमच्यात सध्या वाद सुरू आहेत.

4 comments:

  1. 😊मस्त, एक नंबर, मी मिस केला.

    ReplyDelete
    Replies
    1. पुढील वेळेस नक्की ये

      Delete
  2. Class re, लै आवडलं. सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं.

    ReplyDelete
  3. खूपच छान वर्णन,
    आणि हो सिलेंडर नेताना योग्य काळजी बाळगा .

    इंद्राई बद्दल ची ऐतिहासिक माहिती आपण http://chandwadtaluka.com/ इथे पाहू शकतात. चांदवड तालुका ची माहिती आम्ही ब्लॉग वर टाकण्याचा प्रयत्न करत आहोत.

    ReplyDelete

२५० किल्ल्यांच्या निमित्ताने

      क ळवण्यास आनंद होतो आहे की आज माझे २५१ गडकोट अभ्यासपूर्ण बघून पूर्ण झाले. लहानपणी संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आजह...