Sunday, July 31, 2016

भूषणगड, हरणाई देवी, यमाई देवी / Bhushangad, Harnai Devi, Yamai Devi


       सातारा जिल्ह्याला स्वत:च एक वेगळं दुर्गवैभव लाभलेलं आहे. सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडील घाटमाथ्यावर असलेले प्रतापगड, जंगली जयगड, वासोटा असे अनेक किल्ले, तर पूर्वेकडे खटाव आणि फलटण भागात संतोषगड, वारुगड, भूषणगड, वर्धनगड, महिमानगड, नांदगिरी असे किल्ले आहेत.

कुंभार्ली आणि वरंध घाटातून घाटवाट खाली कोकणात उतरते अन चिपळूण आणि महाड मार्गे अनेक बंदरांना जाऊन मिळते. ह्यांची सुरुवात पश्चिमेकडे पंढरपूर, विजापूर ह्या भागात होते. ह्याच व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी साताऱ्यातील अनेक किल्ल्यांची बांधणी झालेली आढळून येते. पूर्व भागात वर्धनगड, महिमानगड ह्यातील मुख्य किल्ले, तर भूषणगड, संतोषगड यांसारखे पूरक किल्ले.

भूषणगड बघायचं फार आधीच पक्क झालेलं. जेव्हा ह्या किल्ल्याचा विषय निघाला, तेव्हा माझ्या नावाचा ('नावचा' किंवा 'नावावर' नव्हे ) एक किल्ला आहे हे ऐकून बऱ्याच लोकांना हसू आवरलं नाही. किल्ल्यास हे नाव कोणी आणि का दिलं हे मला माहिती नसल्यामुळे गप्प बसून राहण्यावाचून माझ्याकडे काही पर्याय नव्हता.
'चालायचच' !
बर्याच दिवसांनी योग आला आणि ट्रेकला यायला आठ जण तयार झाले. स्वप्निल (दत्त्या) आणि केदार बऱ्याच दिवसांनी ट्रेक मोहिमांमध्ये पुनरागमन करत होते. भर भरून जोक्स आणि अनुपस्थित लोकांचा उद्धार अश्यांनी सहल गाजणार हे निश्चित होतं !
भूषणगड किल्ला
ठरल्याप्रमाणे पहाटे पाचच्या सुमारास वडगाव चौकात सगळे जमलो. पुणे - सातारा - औंध असा प्रवास करत भूषणगड किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी पोचलो. वाटेमध्ये 'विरंगुळा' नावाच्या हॉटेल मध्ये आम्ही बराच 'विरंगुळा' केला !
भूषणगड औंध पासून सात-आठ किलोमीटर आहे (सातारा जिल्ह्यातील औंध, जे पूर्वी संस्थान होते). पायथ्यापासून किल्ल्याची उंची जेमतेम १०० मीटर असेल. घेराही फार मोठा नाही.
किल्ल्याला 'स्पर्श करून' परत निघण्यासाठी जे येणारे आहेत, त्यांच्यासाठी किल्ल्यावर फार बघण्यासारखं नाही. पण 'थोडसं' अभ्यासपूर्ण बघायचं झाल्यास किल्ल्यावर बघण्यासारखं आणि जाणून घेण्यासारखं बरंच काही आहे.

किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाचं नावही भूषणगडच आहे. किल्ल्याचं वैशिष्ट असं कि, फार दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात हा एकेमेव डोंगर आपलं लक्ष खेचून घेतो. त्यामुळे ह्याला ओळखायला सोपं गेलं.

लेखातील वर्णन वाचताना विकीमॅपिया लिंक बघितली, तर समजायला सोपं जातं
http://wikimapia.org/#lang=en&lat=17.465687&lon=74.405079&z=15&m=b&show=/35459220&search=bhushangad

पायथ्यापासून वरपर्यंत पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्यांच्या सुरुवातीला एक कमान बांधली आहे.
सुस्वागतम
पायऱ्या चढून जात असताना एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पायऱ्यांचा मार्ग हा बहुतेक ठिकाणी डोंगर उजव्या हातास ठेवून बांधलेला आहे. तसच, उजव्या बाजूच्या ह्या डोंगरावर पायऱ्यांच्या वाटेच्या समांतर तटबंदी बांधलेली आहे.


डाव्या बाजूला दरी आणि  उजव्या बाजूला डोंगर अशी वाट

उजवीकडील डोंगराच्या वरील भागात पायऱ्यांच्या वाटेच्या समांतर तटबंदी 
पायऱ्यांच्या वाटेनं वर चढताना प्रत्येक जण तटबंदीच्या टप्प्यात येतो
गडावर जाणाऱ्या वाटेचं असं बांधकाम हे जाणूनबुजून केलं आहे. ह्यामागे एक नीती आहे.
शंभरातील नव्वद लोक उजव्या हाताचे तर फक्त दहा डावखुरे असतात. शत्रू सैन्यातील बहुतांश लोक आपल्या उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात ढाल पकडणार. वाटेच्या समांतर असणाऱ्या वरील भागातील तटबंदीवरून शत्रू 'टप्प्यात' येतो. शत्रूवर दगड धोंड्यांचा वर्षाव करायचा. दगडांना अडविण्यास उजव्या हातातील तलवार वापरणे ही 'नैसर्गिक' प्रतिक्रिया. ह्यामुळे तलवारी बोथट, वेड्यावाकड्या आणि निकामी होणार. ह्या अर्धमेल्या शत्रूनी चुकून गडाच्या आत प्रवेश केलाच, तर त्याचा पाडाव करणं म्हणजे तलवारीनी लोणी कापण्याइतकं सोपं !
राजगडाच्या पाली मार्गाने चढताना जो पहिला दरवाजा लागतो, त्याच्या आधीची पायवाट ह्याच प्रकारे काढण्यात आली आहे. संपूर्ण बुरुजाला प्रदक्षिणा घालून मार्ग वरती जातो. ह्यामध्ये बुरुज सतत उजव्या बाजूला राहतो. बुरुजातील जंग्या अश्या बांधल्या आहेत, पायवाटेने येणारा जाणारा प्रत्येक जण ह्यामधून दिसेल.

वर जात असताना वाटेत एक खंडोबाचं मंदिर लागलं. दाट, लांब मिशी, पसरलेले कान आणि वर 'गांधी टोपी' घातलेल्या खंडोबाची मूर्ती बघून थोडी गम्मत वाटली. आपल्या देव-देवतांच्या पोशाखांवर स्थानिक जीवन पद्धतीचा पगडा दिसून येतो त्याचंच हे एक  उत्तम उदाहरण.
मिशी आणि गांधी टोपी असलेला खंडोबा
काही पायऱ्या चढल्यावर किल्ल्याचा प्रमुख दरवाजा आला. ह्याची बांधणी गोमुखी रचनेची आहे. दरवाज्यापर्यंत नेणारी वाट एकदा डावीकडे वळते आणि लगेच उजवीकडे वळते. 'z' आकाराच्या ह्या चिंचोळ्या मार्गाला तटबंदी आणि बुरुजांनी घेराव घातला आहे. प्रचंड संख्येने शत्रू आला, तरी ह्या चिंचोळ्या मार्गावर तो अडून राहणार अशी ही रचना (बॉटलनेक).

दरवाजा लपवून ठेवणे हाच अश्या बांधकामाचा हेतू !
 दरवाज्याची कमान पडली आहे. दरवाज्याच्या  एकात एक अश्या तीन कोरीव महिरपी आहेत. अवशेषांवरून ही कमान तिकोना किल्ल्याच्या दरवाज्याशी मिळती जुळती वाटली.

एकात एक अश्या तीन महिरपी, दरवाज्याचा उंबरा.
 दरवाज्याला आतल्या बाजूला लागून असलेल्या पहारेकर्यांच्या देवड्या अजूनही शाबूत आहेत. पेशवेकाळात देवड्यांची दुरुस्ती झाली हे निश्चितपणे सांगता येईल. ह्याचं कारण म्हणजे पेशव्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या बाकीच्या काही किल्ल्यांवरील दरवाजे आणि देवड्या अगदी अश्याच शैलीत बांधलेल्या दिसतात.
संतोषगडाचा मुख्य दरवाजा किंवा धोडपचा हट्टी दरवाजा आणि पूर्व दरवाजा अगदी अश्याच शैलीत बांधलेले आढळतात. दगडांच्या लहान आकारावरूनही हे बांधकाम तुलनेने नवीन आहे हेही सांगता येतं. तसंच बांधकामात वापरेलला दगड 'नवीन' आहे, मुरुमी नाही.

दरवाजा ओलांडल्यावर दोन्ही बाजूला असणाऱ्या पहारेकर्यांच्या देवड्या
पहारेकर्यांची देवडी

दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर लागणारा चिंचोळा मार्ग
दरवाज्याच्या डावीकडील बुरुज अक्षरशः फुटला आहे. त्याच्या अंतरंगावरून बुरुजाचे बांधकाम कसे केले असावे ह्याचा अंदाज लावता येतो. प्रचंड मोठ्या शिळांनी बुरुजाच्या बाहेरील बाजूची परीघ-भिंत निश्चित करून आतमध्ये वेगवेगळ्या आकाराचे दगड आणि चुना मिश्रण 'कोंबले' आहे. त्यावर एक सपाटी, ज्याला स्लॅब म्हणता येईल, बांधलेली आहे.

काही पायऱ्या चढून पुढे गेल्यावर एक खोल खंदक सदृश खड्डा लागला. हा खड्डा म्हणजे पूर्वी वापरात असणारी दगडाची खाण आहे. ह्याच दगडांनी गडाचे बांधकाम केले गेले.
काही अंतरानं उजव्या बाजूला एक चौकोनी विहीर लागली. लांबी रुंदी साधारण आठ बाय आठ मीटर !
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळी भाग. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून इतक्या मोठ्या आकाराची विहीर ! किल्ल्यावरील तटबंदी आणि इतर मंदिराचे बांधकाम बघता, बांधकाम समयी पाण्याची गरज मोठी असणार हे निश्चित.



दुर्दैव म्हणजे इथेही पाण्यात कचरा, थर्मोकोलची ताटे आणि बाटल्या... ते पाहून हृदय सोलवटून निघालं. आपल्या वारसा हक्कांचं महत्व आणि त्यामागे असलेलं आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व आपला समाज नेहमीच विसरत आला आहे. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी जेम्स डग्लसनेही हेच लिहून ठेवलं आहे. असो.

ह्या विहिरीच्या शेजारीच शंकराचे लहानसे मंदिर आहे. ते पाहून चार पायऱ्या चढल्यावर किल्ल्यावरील सध्याची प्रमुख वास्तू - हरणाई देवीचे देऊळ लागले. दुर्गा देवीचाच हा एक अवतार अशी माहिती पुजाऱ्याकडून मिळाली.

आई हरणाई देवी
देवळासमोर दीपमाळ आणि शेंदूर फासलेले दगड ठेवलेले दिसले. ह्या मंदिराशेजारीच गणपतीचे मंदिर आहे. श्रींची मूर्ती संगमरवरात घडवलेली आहे.




देवांचे दर्शन घेऊन आम्ही तटबंदीवरुन फेरफटका मारायला निघालो. किल्ल्याची तटबंदी चांगल्या प्रमाणात शाबूत आहे. दरवाज्याचे दोन बुरुज धरून एकूण दहा बुरुज शाबूत आहेत. काहीं ठिकाणी तटबंदी धोकादायक झालेली दिसली. तटबंदी मध्ये एक शौचकूप, पाणी साठवण्याची जागा, तोफा आणि बंदुकांसाठी साठी वेगवेगळ्या आकाराच्या जंग्या दिसल्या. गडाच्या माचीच्या मध्यभागावर एक मोठ्या आकाराचा बांधीव बुरुज आहे.
माचीच्या टोकावर एक मोठा बुरुज आहे. येथून डोंगराच्या खालच्या टप्प्यात एक मोठी पायवाट दिसत होती. ही पायवाट म्हणजे किल्ल्याच्या पश्चिम दिशेस असणाऱ्या भुयारी देवीच्या मंदिराकडे जाणारी पायवाट आहे.



किल्ल्याचे बुरुज, तटबंदी, खालच्या बाजूला भुयारी देवीकडे जाणारी पायवाट
किल्ल्याच्या माचीचं हे टोक असल्यानं पलीकडच्या बाजूने येणारी तटबंदी येथे येऊन मिळते. ह्या ठिकाणाहून आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूच्या तटबंदी वरून चालू लागलो.


माचीच्या टोकाला असणाऱ्या बुरुजावर
चालताना डाव्या बाजूस खालच्या टप्प्यावर किल्ल्यावर येण्याची पायऱ्यांची वाट दृष्टिक्षेपात दिसत होती. किल्ल्याची बांधणी करताना संरक्षणाचा किती विचार केला आहे हे जाणवलं.
किल्ला चढताना उजव्या डोंगराच्या वर दिसणारी हीच ती तटबंदी. येथून खाली वाकून पहिले असता पायऱ्यांची वाट दृष्टीक्षेपात येते.
ही तटबंदी मुख्य प्रवेशद्वाराला येऊन मिळाली आणि आमची गडफेरी पूर्ण झाली.

उतरताना काही पायऱ्या गेल्यावर एक वाट डाव्या दिशेने जाताना दिसली. हीच ती भुयारी देवीच्या मंदिराकडे जाणारी वाट. आम्ही मुख्य किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या भुयारी देवीच्या मंदिरापाशी आलो. कदाचित इथे आधी एक भुयार होतं आणि त्याच्या आतमध्ये देवीचं वास्तव्य असावं. हे भुयार आता बुजवण्यात आलय. तिथेच बाहेरच्या बाजूला देवीचं एक छोटंसं मंदिर उभारलेलं आहे.

भुयारी देवीकडे जाणाऱ्या मार्गावरून दिसणारा माचीच्या टोकावर असणारा बुरुज

भुयारी देवीची प्रसन्न मूर्ती
 हे पाहून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. पाच-सात मिनटात गड उतरून खाली आलो. इथून औंध गाठलं.

औंधचं भवानी संग्रहालय बघितलं. औंध संस्थांचे तत्कालीन राजे कै. भवानराव पंतप्रतिनिधी यांनी १९३८ साली हे बांधलं. ह्यामध्ये शेकडो तेलचित्रे आणि अनेक कलाविष्कार आहेत. मोगल आणि मराठाकालीन शस्त्रात्रे बघण्यासारखी आहेत. संग्रहालयाच्या आवारात अनेक वीरगळी, बौद्ध मूर्ती, शंकर पार्वतीच्या मूर्ती ठेवल्या आहेत. (फोटो काढण्यास मनाई आहे.)

संग्रहायल बघून झाल्यावर थोडी पेटपूजा केली आणि गाड्या यमाई देवीच्या मंदिराबाहेर येऊन थांबल्या.
यमाई देवीविषयी खालील कथा सांगितली जाते -
यमाई देवी म्हणजे पार्वती मातेचा अवतार. प्रभू श्रीराम सीतामातेच्या शोधात असताना पार्वती मातेनं त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. तिनं सीतामातेचा अवतार परिधान केला व प्रभू श्रीराम यांना दर्शन दिलं. परंतु श्रीराम हे साक्षात विष्णूचा अवतार असल्यानं त्यांनी पार्वती मातेला ओळखलं. त्यांनी मातेला "ये माई" अशी हाक मारली.
त्यावरून ह्या देवीचं "यमाई" असं नाव पडलं. यमाई देवीच्या अधिक माहितीसाठी: http://aundh.info/marathi/yamaidevi.php

हे मंदिर शुष्कसांधी शैलीचं, म्हणजेच दगड एकमेकांवर जोडताना कोणताही चुना अथवा तत्सम पदार्थ न वापरता बांधलं आहे. मंदिराची बांधणी कोल्हापूरच्या मंदिरासारखीच वाटली. कोल्हापूरचं मंदिर चालुक्य राजवटीमध्ये सातव्या आठव्या शतकात झालंय. पण यमाई देवीचं हे मंदिर यादवकालीन असावं असा माझा अंदाज आहे. तज्ज्ञांनी कृपया प्रकाश टाकावा.
मंदिराच्या गाभाऱ्यात अंदाजे दोन मीटर उंचीची यमाई देवीची भव्य मूर्ती आहे. देवीची जुनी स्वयंभू मूर्तीसुद्धा आहे.


मंदिराच्या सर्व बाजूंनी तटबंदी वजा भिंत उभारली आहे. भिंतीच्या आत सभामंडप आहेत. हे सगळं मंदिराच्या तुलनेने नवीन (बहुतेक पेशवेकालीन) बांधकाम आहे.
यमाई देवी पार्वतीचा अवतार, त्यामुळे मंदिरासमोर नंदी आहे


औंधासुर -  ह्याचा यमाई देवीनं पराभव केला. देवीच्या मंदिराशेजारी माझा पुतळा असावाअशी ह्या असुराची अंतिम इच्छा होती.  त्यामुळे त्याची मूर्ती मंदिराच्या परिसरात बघायला मिळते. ह्याच असुराच्या नावावरून गावाला औंध नाव मिळालंय.


मंदिराच्या भोवताली बांधलेले सभामंडप

मंदिराच्या बाजूने बांधलेली तटबंदी-  मंदिराच्या तुलनेने हे नवीन बांधकाम आहे
मंदिराच्या टेकडीवरून भोवतालचा लांब पर्यंतचा प्रदेश सृष्टिक्षेपात येत होता. पावसाळी वातावरणानं तर अजूनच प्रसन्न वाटत होतं.

यमाई देवीच्या टेकडीवरून दूरवर दिसणारा भूषणगडाचा एकमेव डोंगर
मंदिर बघून झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत झाडाखालच्या एका स्टॉल वर चहा भजी अशी मस्त फिस्ट झाली !
येताना जरांडेश्वर, चंदन-वंदन, वैराटगड यांचं धावतं दर्शन घेतलं.

दत्या, केदार आणि सुमंत एकत्र असल्यानं ट्रीपच्या सुरुवातीपासूनच जी खेचाखेची सुरु झाली, ती अगदी शेवटपर्यंत सुरूच होती. इथे दांड्या असता तर अजूनच धुव्वा झाला असता. भूषणगड किल्ला तर बघण्यासारख आहेच, पण ट्रिप लक्षात राहण्याचं अजून एक कारण नक्कीच मिळालं. एक निवांत ट्रिप झाली.

"We didn't realize we were making memories, we just knew we were having fun !"

Friday, July 15, 2016

धोडप / Dhodap Fort

      सह्याद्री म्हंटलं कि डोळ्यासमोर येतात ते उत्तुंग गगनचुंबी पर्वत, त्यावर वसवलेले गड किल्ले आणि घाट वाटा. पुढची स्वारी कुठे करायची ते ठरवताना धोडपचे फोटो लक्ष वेधून घेत होते. त्याचा तो विशेष आकार फारच आकर्षक वाटला. त्याचा इतिहास आणि माहिती वाचल्यावर मात्र हेच पुढील स्वारीचं ठिकाण ठरलं.

हट्टी गावातून धोडप किल्ला

नाशिकच्या उत्तरेस साधारण साठ किलोमीटर अंतरावर पिंगलवाडी गाव आहे. तिथपासून ते चांदवड पर्यंत सह्याद्रीची एक डोंगररांग पश्चिम-पूर्व पसरलेली आहे. ह्या रांगेला अजंठा-सातमाळ रांग असे म्हणतात. सातमाळ रांगेत अचला, अहिवंत, सप्तशृंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप, इखारा, कांचना, कोळधेर, राजधेर, इंद्राई आणि चांदवड असे 'लाईनीत' किल्ले आहेत.

ह्यातल्या धोडप किल्ल्याची समुद्रसपाटी पासून उंची १४७३ मीटर आहे. कळसुबाई आणि साल्हेर पाठोपाठ उंचीनुसार धोडपचा महाराष्ट्रात तिसरा क्रमांक लागतो. ही माहिती नवीनच होती. कारण सर्वात उंच 'किल्ल्याचा' मान साल्हेरचा हे तर माहिती होतं. सहसा आपल्याला सर्वात उंच, सर्वात लांब, सर्वात खोल अश्या गोष्टींची माहिती ठेवायची सवय असते. पण दुसऱ्या क्रमांकाचे उंच, दुसऱ्या क्रमांकाचे खोल किती लोकांचे मेंदू लक्षात ठेवतात?

तर हा धोडप किल्ला म्हणजे निसर्गाच्या कलात्मक रचनेचा सुरेख नमुना आहे. सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमिनीतून बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण आकार तयार झाले. त्यापैकी एक रचना म्हणजे डाईक.
डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली 'भिंत'. ही रचना आपल्याला धोडप तसेच नाणेघाटाच्या जवळच्या भैरवगड किल्ल्यावर पहायला मिळते. धोडपच्या बालेकिल्ल्याच्या वरील एका बाजूला प्रचंड कातळाचा शंकराच्या पिंडीसारखा आकार तयार झालेला आहे. त्याला लागून तयार झालेल्या डाईकच्या (बेसॉल्ट खडकाच्या ४०० फूट उंच, सरळसोट भिंत) मध्ये मोठी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक खाच तयार झालेली आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या परीसरात फिरतांना हा किल्ला आपले लक्ष सहज वेधून घेतो.

किल्ल्याचा विस्तार बर्यापैकी मोठा आहे. तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, राजवाडे, विहिरी अश्या अनेक वास्तूंनी धोडपला सुंदर सजवलं आहे. किल्ल्यावरील बांधकाम बघता हा किल्ला फार प्राचीन आहे ह्याची जाणीव होते. बांधकामातील विविधते वरून हा किल्ला वेगवेगळ्या राजवटीखाली असल्याचे लक्षात येते.
कोणत्या काळात हा किल्ला कोणत्या राजवटीच्या अधिपत्याखाली होता हे ह्यावरील बांधकामावरून समजून घेता येतं. किंवा ह्याउलट, आपल्याला ह्या किल्ल्याच्या इतिहासाची माहिती असेल, तर कोणते बांधकाम कोणत्या काळात झाले हे काढता येऊ शकतं.

मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकच्या पुढे ५५ किमी अंतरावर वडाळीभोई  नावाचे आहे. ह्या गावातून डावीकडे वळणारा फाटा आपल्याला धोडांबे मार्गे हट्टी गावात घेऊन जातो. हट्टीगाव धोडपच्या पायथ्याचे गाव आहे (पुण्याहून अंदाजे ३०० किमी).
आम्ही मात्र पुणे - नगर - शिर्डी - मनमाड - चांदवड - वडाळीभोई  - हट्टी असा लांबचा पल्ला केला. निखिलच्या मते पुणे नाशिक महामार्गापेक्षा हा रस्ता जास्ती चांगला आणि चार पदरी आहे. ४०-४५ किमी जास्ती झाले.
पण ह्या निमित्तानी अंकाई-टंकाई, कात्रा, हडबीची शेंडी, चांदवडचा किल्ला अश्या अनेक किल्ल्यांचे दर्शन झाले. आणि मग लगेचच ते बघण्याचे मनसुबे मनात रचले जाऊ लागले.

दुपारी दीड वाजता आम्ही हट्टी गावात पोचलो. दोन वाजता किल्ला चढण्यास सुरुवात केली. संध्याकाळी सनसेट हा डाईक वरून बघायचा असा बेत ठरला. समोर दिसणारा धोडपचा अजस्त्र कातळ आणि त्याचा आकार मनात धडकी भरवत होता !

हट्टी गावातून धोडप किल्ल्यास डावीकडे ठेऊन उजव्या बाजूला असणाऱ्या कच्च्या रस्त्याने आम्ही चालत निघालो. काही अंतरावर पाणी अडवाण्यासाठीचा बांध लागला. येथून दोन वेगवेगळ्या पायवाटा किल्ल्यावर गेलेल्या आहेत.

धोडप - विकीमॅपिया सॅटेलाईट
एक वाट डावीकडे किल्ल्याच्या दिशेने जाते. हीच वाट आम्ही पकडली. किल्ल्याच्या डोंगराच्या जवळ पोचल्यावर हनुमानाची सहा-सात फुटी उंच मूर्ती आहे. हीच पायवाट पुढे आम्हाला किल्ल्यावर घेऊन गेली.
दुसरी वाट म्हणजे बांधापासून सरळ गेलेली वाट. डावीकडे हनुमानाच्या मूर्तीकडे न जाता आपल्याला किल्ल्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या डोंगर सोंडेवर घेऊन जाते. ह्या वाटेने गेल्यावर किल्ल्याचा हट्टी दरवाजा लागतो.
आम्ही ह्या रस्त्याने न गेल्याने आम्हाला वर जाताना हा दरवाजा लागला नाही. येताना ह्या वाटेने येऊ असं आम्ही ठरवलं.
वीसेक मिनिटांच्या चढाई नंतर आम्ही एका खोदीव टाक्यापाशी पोचलो. ह्या टाक्याच्या एका भिंतीमध्ये एक कोनाडा आहे. त्यात गणेशाची मूर्ती आहे. टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.

गणेश टाकं
 टाक्यावरून थोडं पुढे गेल्यावर आम्ही किल्ल्याच्या निम्म्या टप्प्यावर आलो. इथे जेमतेम सात-आठ घरांची एक वस्ती आहे. ह्याला सोनारवाडी म्हणतात. परंतु आता इथे कोणी राहत नाही. ह्या माचीवर नव्या घरांसोबत जुन्या घरांच्या बांधकामाची बरीच जोती आढळूनआली.
किल्ला किती राबता होता हे ओळखायचं असेल तर त्या किल्ल्यावरील बांधकामाच्या जोतींची संख्या लक्षात घ्यावी. आणि इथे भरपूर जोती दिसत होती.
एक बैलगाडी आरामात जाईल इतकी मोठी पायवाट आणि वाटेच्या दोन्ही बाजूला बांधकामांच्या अनेक जोती दिसून आल्या. दोन घरांच्या मध्ये योग्य अंतर ठेवलं होतं.  पूर्वीच्या काळात सुद्धा उगाच कुठेही घरं आणि बांधकाम न करता, बांधकाम करण्यामागे किती 'प्लॅनिंग' होतं ते कळून येतं (ज्याचा आज अभाव दिसतो).

त्याच रस्त्याने (कुठलाही फाटा ना घेता) सरळ पुढे गेल्यावर अनेक मंदिरे दिसली. जवळपास प्रत्येक मंदिराशेजारी एक विहीर आहे. बहुतांश विहिरी आकाराने लहान आणि विटांनी बांधलेल्या आहेत. विहिरींमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पण एकाही विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही.
ह्या मंदिरांपासून पुढे पंधरा वीस मिनिट सरळ चालत गेल्यावर आपण पूर्वाभिमुख दरवाजाकडे येऊन पोहोचतो. या दरवाज्याच्या बाजूला उध्वस्त तटबंदी व बुरुज आहेत. आतील बाजूस पहारेकार्‍यांसाठी देवड्या आहेत.
इथून आम्ही मागे फिरलो. पुन्हा विहिरींपाशी आलो. येथे स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आपलं लक्ष वेधून घेतो. दोन मजली विहीर !
जिने उतरून विहिरीचे घुमटाकार छत आणि कमानी असलेल्या उंच व मोठ्या खिडक्या आवर्जून बघण्यासारख्या आहेत. विहिरीत खाली उतरायला पायऱ्या आहेत. विहिरीला फार पाणी नसल्यानं आम्ही सगळ्या पायऱ्या उतरून अगदी तळाशी गेलो. पहिला मजला संपल्यावर पायऱ्यांची दिशा काटकोनात उजवीकडे वळाली.

विहिरींची  महिरप आणि पायऱ्या

विहिरीचे विटांचे आकर्षक बांधकाम
ह्या विहिरीला लागूनच मुख्य पायवाट वरती गेली आहे. ती वाट आम्ही पकडली.
इतक्या सगळ्या गोष्टी बघता बघता वेळ कसा गेला समजलं नाही. किल्ल्याच्या निम्म्या उंचीवर असतानाच सूर्य मावळायला आला होता. त्यामुळे 'डाईक वरून सनसेट' हा प्लॅन स्वप्नातच राहिला. पंधरा वीस मिनिटांच्या चढाई नंतर एक लोखंडी जिना आला. खरंतर ह्या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या स्पष्ट दिसत होत्या. जी की मूळ वाट होती. पण त्यांचा एक मोठा भाग ढासळून ही वाट अवघड होऊन बसली आहे. त्यामुळे हा लोखंडी जिना लावला आहे.

लोखंडी जिना. ह्या इथे कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. त्यांची पडझड झाली आहे.
जिना संपून पायवाट उजवीकडे गेली. पाच मिनिटात आम्ही दोन बुरुजांपांशी पोचलो. हे बुरुज म्हणजे एक भग्न प्रवेशद्वाराचे सोबती आहेत. काळाच्या ओघात दोघांच्या मधला दरवाजा गेला, पण हे बुलंद दगडी बुरुज मात्र ताठ मानेने उभे आहेत.
ह्या बुरुजांपासून काही मीटर अंतर पुढे गेल्यावर किल्ल्याचा मोठा दरवाजा लागला. हा दरवाजा तुलनेने मोठा आहे. दरवाज्याच्या आत पहारेकर्यांच्या उध्वस्त देवड्या आहेत. दरवाजाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर विटा आढळल्या. ह्या दरवाज्याचे बांधकाम किंवा जीर्णोद्धार पेशवेकाळात झाला असावा. अगदी अश्याच प्रकारच्या विटांचे बांधकाम कुलंग किल्ल्यावरील बांधकामात आपल्याला आढळते.

पडझड झालेला किल्ल्याचा दरवाजा
ह्याच दरवाज्याच्या उजव्या बाजूला मोठा बुरुज उभा आहे. ह्या बुरुजाच्या चर्या आवर्जून पाहण्यासारख्या आहेत. ह्या बुरुजावर प्रचंड गवत आणि तण वाढलेले बघून वाईट वाटलं. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा हा बुरुज काही वर्षांनी धारातीर्थी पडेल आणि राहतील ते फक्त दगडधोंडे. ह्या ठिकाणी एक बुलंद बुरुज उभा होता हे फक्त वाचनातून आणि फोटोमधूनच कळू शकेल. आपल्या वारसा स्थळांचं जतन आपण नीट करू शकत नाही हे किती त्रासदायक तथ्य आहे.असो.

काही मिनिटांचा चढ चढून गेल्यावर दगड कोरून बांधलेला दरवाजा आला. हा दरवाजा म्हणजे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. येथील दगडी खोदीव पायऱ्या बघण्यासारख्या आहेत. दरवाजाच्या परिसरात काही शिलालेख आढळले. सोळाव्या शतकात किल्ला नगरच्या निजामशाहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलावर्दीखानाने हा किल्ला जिंकून घेतला. ह्याचा उल्लेख ह्या शिलालेखात आहे.
दरवाजा बंद केल्यावर अडसर म्हणून लावतात त्या दांडूच्या खोबण्यासुद्धा इथे बघायला मिळाल्या.

बालेकिल्ल्याच्या दरवाज्याची खोदीव वाट. फोटो मध्ये उजवीकडून येऊन यु टर्न घेऊन डावीकडे दरवाजा आहे. 

दरवाज्याला अडसर लावण्यासाठी चौकोनी खोबण्या.
ह्या दरवाज्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दगडात पोखरून बांधलेल्या पहारेकर्यांच्या देवड्या. उंदराच्या बिळाप्रमाणे कातळ पोखरून ह्या देवड्या बांधल्या आहेत. पायवाट ह्या 'बोगद्यातून' पलीकडे जाते. आम्ही आत शिरलो. आतमध्ये अंधार होता. आपण चालतोय त्या वाटेच्या दुतर्फा शिपायांची पहाऱ्याला बसायची जागा दिसत होती. मशाली आणि दिवे लावायचे कोनाडे आणि महिरपी पुसटश्या दिसल्या. अंधारातच वाट डावीकडे काटकोनात वळाली आणि आम्ही पलीकडून बाहेर निघालो.

दरवाज्यातून बाहेर आल्यावर एक गोष्ट लक्षात आली की आपण जवळपास माथ्यावरती पोचलो आहोत. समोर दिसणाऱ्या शंकराच्या पिंडीसारख्या प्रचंड उभ्या कातळाला मनोमनी साठवुन घेतलं.  ह्या कातळावर जाण्यासाठी मार्ग नाही. प्रस्तरारोहण करावे लागते.
पुढे चालत गेल्यावर काही पावलांवर राजवाड्याचे अवशेष दिसले. अंधार पडू लागला असल्याने आता थेट गुहा गाठायचं आम्ही ठरवलं. समोरील कातळास उजवीकडे ठेऊन आम्ही पुढे चालू लागलो. पाच एक मिनटात आम्ही आमच्या मुक्कामाच्या गुहेत पोचलो. गुहेमध्ये देवीची विलोभनीय मूर्ती आहे. तिला नमन करून आम्ही डाईक कडे प्रस्थान केले.
गुहेला उजवीकडे ठेऊन पायवाटेने सरळ पुढे चालत गेल्यावर आम्ही डाईक वर पोचलो !
चार साडेचार तास पायपीट करून सह्याद्रीच्या एका उंच आणि विशिष्ट भौगोलिक रचना असलेल्या किल्ल्यावरून दिसणाऱ्या दृश्याने मनास जे समाधान आणि जो अनुभव मिळत होता, तो शब्दांकित करणं केवळ अशक्य !! हा अनुभव प्रत्यक्ष तेथे जाऊनच अनुभवण्यासारखा आहे.

हेच ते 'डाईक' अंदाजे चारशे फूट,उंच  नैसर्गिक दगडी भिंत !

डाईक ची खाच. अखंड दगडाचा साडेतीनशे चारशे फूट सरळ उभा काप ! 
खरंतर ह्याच कड्यावर तंबू टाकून राहायचा आमचा बेत होता. पण प्रचंड वारा आणि वाढलेले तण त्यामुळे  गुहेजवळ असणाऱ्या जागेतच तंबू टाकले. गुहेशेजारीच पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. हरिश्चंद्र गडावरच्या त्या मधुर पाण्यासारखीच चव ह्या पाण्याला.
चार लाकडं आणली. चूल पेटली. शेंगदाणा लाडू, दोन प्रकारचे खाकरे आणि श्रुतीच्या हातची खिचडी ..ह्यासारखी  दुसरी मेजवानी असूच शकत नव्हती. दिवसभराच्या आठवणी कुरवाळत, आकाशातल्या ताऱ्यांना न्याहाळत सर्वजण निद्रेच्या अधीन झाले.

अशी नयनरम्य सकाळ फक्त गडांवरच !
उगवणाऱ्या सूर्यासोबत आमचा दिवस उजाडला. आलंयुक्त दमदार चहा झाला. आवरून आम्ही आजूबाजूच्या गुहा न्याहाळल्या. काही गुहा नैसर्गिक आहेत तर काही तासून बनवलेल्या आहेत. गुहांवरून ह्या किल्ल्याचा कालखंड बराच मागे जातो हे नक्की.
गुहेच्या बाजू बाजूनी जाणारी वाट कातळास वळसा घालून बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी घेऊन जाते. आम्ही पुन्हा गुहेपाशी आलो. श्रुतीच्या हातचे अप्रतिम पोहे झाले. (ट्रेकमध्ये मुली असल्यावर असा फायदा निश्चित होतो).
नाश्ता आटपून आम्ही परतीच्या वाटेल लागलो. कातळाला डावीकडे ठेऊन पुन्हा राजवाड्याच्या ठिकाणी आलो. येथून डावीकडे एक पायवाट कातळात वरती घेऊन जात होती. आणि एक पायवाट डावीकडे झाडांमध्ये गेली होती.
कातळात वर जमेल तिथपर्यंत सोबत यायला अनुराग तयार झाला. वर पोचल्यावर एक टाकं आणि गुहा दिसली. खालच्या बाजूला डावीकडे झाडांमध्ये जाणारी पायवाट एका साच तलावाकडे घेऊन जाताना दिसली. इथून खाली उतरताना मात्र थोडी भीती वाटली. घसारा प्रचंड होता आणि गवत वाळले होते.

हाच तो अजस्त्र कातळ ! त्यात मध्यभागी आडवी बारीक खाच दिसतीये त्या खोदीव गुहा आहेत. ह्या कातळाचा आकार इतका प्रचंड आहे की त्या गुहे पाशी आम्ही उभे आहोत हे फोटोवरून कळतही नाही
ह्या नंतर आम्ही राजवाड्याचे अवशेष बघितले. राजवाड्याच्या फक्त भिंती शाबूत आहेत. अवशेषांवरून हा तीन विभागात असावा असं वाटलं. पहिल्या भागात स्वागत कक्ष (किंवा लिविंग रूम?), मधले माजघर, आणि सर्वात आत निजण्याची जागा (बेडरूम). भिंतीमध्ये सुंदर महिरपी कोनाडे होते.
पूर्वीच्या काळच्या भिंतींवरती, खासकरून घरांच्या भिंतींवरती छप्पर कसे असावे हे मला पडलेलं कोडं ही वास्तू बघितल्यावर थोडंसं उमगलं. दगडी भिंतीवर आतल्या बाजूला वाढीव, तासून अंतर्गोलाकार भाग असणारे दगड ठेवले होते. ह्या दगडांच्या आतील वाढीव भागांवर त्याच प्रकारचे दगड, फक्त भिंती च्या रेषेत न ठेवता, थोडे आतल्या बाजूला लावलेले. असं करत पूर्ण छप्पर झाकून जाईपर्यंत  दगडांची रचना केलेली दिसली. अर्थात, ही फक्त एक प्रकारची बांधकाम शैली झाली. वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या राजवटीमध्ये बांधकाम शैली मध्ये  फरक  दिसून येतो.
ह्या राजवाड्याच्या शेजारीच दोन टाकी होती. समोर काही अंतरावर अजून एका वाड्याचे अवशेष आणि त्याला लागून एक टाकं होतं.

राजवाड्याचे अवशेष

राजवाड्याच्याच बांधकामातील एक भाग असणारे हत्ती शिल्प
हे अवशेष पाहून आम्ही किल्ला उतरायला घेतला. काही वेळात दुमजली विहिरीपाशी (सोनारवाडी वस्तीपाशी) आलो. आता इथून खाली जाताना दुसऱ्या मार्गाने, म्हणजेच हट्टी दरवाजा मार्गाने जायचं होतं. त्यामुळे उजवीकडे न जाता डावीकडून सरळ जाणारी वाट पकडली.
वाटेच्या दुतर्फा घरांचे अवशेष दिसत होते. पाच मिनिटात आम्ही किल्ल्याच्या दरवाज्यापाशी आलो (हा हट्टी दरवाजा नाही). ह्या दरवाज्याच्या बाजूला दोन भक्कम बुरुज उभे आहेत, ह्याच प्रवेश  द्वारावर एक शिलालेख कोरलेला दिसून आला.
ह्या दरवाज्यातून दोन वाटा फुटल्या आहेत. एक वाट डावीकडे जाते. ह्या वाटेने थोडं चालत गेल्यावर कळवण दरवाजा लागतो. ह्याच मार्गाने पुढे आपल्याला कळवण गावात उतरता येतं.
उजवीकडील वाट आपल्याला हट्टी गावात घेऊन जाते.
आम्ही उजवीकडची वाट पकडली. काही वेळात डाव्या बाजूला हनुमान मंदिर दिसले. बाजूला घरांचे अवशेष, तसेच एक समाधी वास्तू दिसली.
पुढे चालत राहिल्यावर एक साच-तलाव लागला. इथे धोडप आणि त्याचं त्या तलावातील पाण्यात पडलेलं प्रतिबिंब डोळ्याचं पारणं फेडत होतं.

''ध' धोडप चा !
समोर तटबंदी दिसू लागली होती. इथे एक आकर्षक पण भक्कम बुरुज ताठ मानेने उभा आहे. ह्याची गोलाकार भिंत वरील गुहांच्या इथून सुद्धा स्पष्ट दिसत होती. बुरुजाच्या सुबक जंग्या आणि ह्या भागातील तटबंदी वेळ देऊन बघण्यासारखी आहे. ह्याच भिंतीवरून उजव्या दिशेस चालत गेल्यास आपण एक प्रशस्त दरवाज्याजवळ पोचतो. हाच तो हट्टी दरवाजा.
हा दरवाजा म्हणजे एक प्रकारची चौकीच आहे. दोन्ही बाजूला आकर्षक महिरपी कमानी आणि उंबरे, दोन दारांच्या मध्ये गोपुरासारखे बांधकाम, आणि आतमध्ये पहारेकर्यांच्या देवड्या.
दरवाजा उत्तराभिमुख आहे, पण आपण बाहेर पाडण्यासाठी उंबरा ओलांडला की वाट काटकोनात उजवीकडे वळते. अश्या बांधणीचा प्रमुख उद्देश हाच की लांबून किल्ल्याच्या दरवाजा कोणाला दृष्टीस पडू नये.

हट्टी दरवाजा

आतील भागातील पहारेकर्यांच्या देवड्या
ह्या दरवाज्यातून बाहेर पडल्यावर काही पावलांनी दोन वाटा दिसल्या. डावीकडची वाट समोरील इखारा सुळक्यापाशी जाणारी होती. आम्ही उजवीकडून जाणारी वाट पकडली. धपाधप उतरत काही मिनिटात आम्ही पायथ्याशी आलो, तिथून १० मिनटात हट्टी गावात पोचलो. फार वेळ न घालवता लगेचच चांदवडचा रस्ता पकडला.

फार दूरपर्यंत धोडपचा तो प्रचंड आकार डोळ्यांसमोर होता. डोळ्याआड जायच्या आधी त्यानं मनात कायमची छाप उमटवली होती.

किल्ल्यावरील पायवाटा, अवशेष, दरवाजे ह्यांची माहिती घेऊन जर किल्ल्यावर जायचा बेत करत असाल तर लेखन वाचता वाचता सोबत विकीमॅपिया लिंक बघितली तर फायद्याचं ठरेल.
http://wikimapia.org/#lang=en&lat=20.384860&lon=74.028625&z=14&m=b&search=dhodap

पुण्यापासून इतक्या लांब जाऊन, दोन दिवसात फक्त एकच किल्ला बघून झाला. पण किल्ला जर नीट बघायचा आणि समजून घ्यायचा असेल, तर पुरेसा वेळ काढावाच लागतो.
गो. नि. दांडेकर यांनी राजगड, राजमाची असे अनेक किल्ले शेकडो वेळा बघितले. पण तरीही त्यांना किल्ला पूर्ण बघून झाल्याचं समाधान नव्हतं. त्यांनी म्हटलंय - 

"गड कसा पाहावा ह्याचं एक तंत्र आहे. तो धावत पळत पाहता उपयोगाचे नाही. त्याची भौगोलिक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षण दृष्ट्या त्याचं महत्व, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्याची मजबुती, त्यावरील पाण्याची ठिकाणं - हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरुज, त्याची प्रवेश द्वारं, हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे. तरच त्यांचं महत्व ध्यानी येतं. धावत पळत किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे ! धावत पळत त्याला नुसतं शिवून जाणं म्हणजे त्याचाही अपमान, आपलाही !"

हर हर महादेव !


**सर्व फोटो निखिल आणि श्रुतीकडून साभार

२५० किल्ल्यांच्या निमित्ताने

      क ळवण्यास आनंद होतो आहे की आज माझे २५१ गडकोट अभ्यासपूर्ण बघून पूर्ण झाले. लहानपणी संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आजह...