Wednesday, June 29, 2016

संतोषगड (ताथवड्याचा किल्ला) / Santoshgad

         जिम रॉननं म्हटलंय "Motivation is what gets you started, Habbit is what keeps you going !"
विकेंड म्हंटलं की गड किल्ल्यांवर भटकंतीची सवयच लागलेली. आपल्या गड-किल्ल्यांवर आणि ह्या सह्याद्रीवर प्रेम व्यक्त करायची हीच तर संधी असते. त्याच बरोबर किल्ल्यांचे बांधकाम, त्याची शैली ह्यांची अभ्यासपूर्वक पाहणी करायची. एखादी वास्तू किंवा बांधकाम करण्यामागे आपल्या पूर्वजांचा काय  हेतू असावा, हे जर समजलं तर त्यासारखी दुसरी मजा नाही.

ह्या वेळेस सातारा जिल्ह्यातील संतोषगड येथे जायचा बेत ठरला. भटक्यांसाठी हा किल्ला माहितीतलाच, इतरांना मात्र तसा अल्प-परिचित. सह्याद्रीच्या पश्चिम पूर्व पसरलेल्या म्हसोबा डोंगर सोंडेवर हा किल्ला आहे. किल्ल्याची साधारण उंची २९०० फूट आहे.  पायथ्याच्या ताथवडा गावामुळे संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असेही म्हणतात.

सूर्य उगवायचा आधीच पुण्याची वेशी म्हणजेच कात्रजचा बोगदा गाठायचा हे समीकरण ठरलेलं. अपाचे वर सुसाट जाताना पावसाचे तुषार तोंडावर झेलत, हेल्मेटच्या आत आपल्या आवडीची गाणी गुणगुणत असतानाच शिरवळ आलं. श्रीरामचा वडापाव झाला. तिथून निघून लोणंदचा रस्ता पकडला. अपाचे पहिल्यांदाच ह्या रस्त्यावर धावली. अर्ध्या तासात लोणंद आणि तिथून काही वेळात ताथवडा.
किल्ल्याचा आकार पाहून तिकोण्याची आठवण आली.  दोन्ही किल्ल्यांचा आकार आणि उंची साधारण सारखीच.


ताथवडा गावातून सोपी पायवाट गडावर घेऊन जाते. पंधरा वीस मिनिटांच्या चढाई नंतर एक पायवाट उजवीकडे वाळलेली दिसली. तिच्यावरून चालत गेलो असता आम्ही एका मानवनिर्मित गुहे जवळ जाऊन पोचलो. ही गुहा म्हणजे एक खांबटाकं आहे. सुरुवातीच्या दोन खांबांवर द्वारपाल कोरलेलेआहेत. आत गेल्यावर खोली वाढत गेली. खाली जायला कोरलेल्या पायऱ्या आढळून आल्या. सध्या गुहेमध्ये गणपतीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवलेले आहे. पाणी मात्र नाही.

गुहा बाजूला ठेऊन पुन्हा मुख्य पायवाटेला आलो आणि दोन मिनिटात एका आश्रमापाशी पोचलो. येथील माताजी दत्ताच्या भक्त असून सुमारे चाळीस वर्षांपासून येथे राहत आहेत अशी माहिती मिळाली. आश्रमाजवळ एक छोटे मंदिर आहे, जेथे दत्त व लक्ष्मी मातेच्या प्रतिमा ठेवल्या आहेत.

आश्रमाकडून पुन्हा काही पावले मागे आलो आणि  डावीकडे वर जाणारी पायवाट पकडली. इथे किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराचे दर्शन झाले. येथील बुरुज ढासळले आहेत. अलीकडेपर्यंत दरवाज्याचा बराचसा भाग हा मातीखाली गडाला गेलेला होता. परंतु पुण्यातील शिव सह्याद्री संस्थेच्या कामातून हा दरवाजा पुन्हा आणला गेला आहे.
किल्ल्याचा पहिला दरवाजा. काही दिवसांपूर्वी शिव सह्याद्री संस्थेच्या कामातून हा दरवाजा जमिनीतून पुन्हा वर आला आहे. 

माची वरून खाली दिसणारा पहिला दरवाजा
दरवाज्यातून पुढे चालत गेल्यावर आमचा प्रवेश किल्ल्याच्या माचीवर झाला. येथील बालेकिल्ल्याची तटबंदी आणि ताशीव कडे दृष्टीस पडतात. माचीला सुद्धा तटबंदी आहे. ह्याची उंची अंदाजे वीस फूट आणि रुंदी पंधरा फुटाहून अधिक आहे. किल्ल्याची भौगोलिक रचना पाहता इतकी भव्य तटबंदी बांधायचा हेतू लक्षात येतो. किल्ल्याचा डोंगर चढायला अतिशय सोपा आहे. त्यामुळे शत्रू अगदी सहजपणे वर चढून येऊ शकतो. माचीवरील ही अभेद्य तटबंदी त्याला आत येण्यापासून रोखून ठेवू शकते.
बालेकिल्ल्याचे तासलेले कडे
माचीवरून पायवाटेने पुढे गेल्यावर आपल्याला अजून एक दरवाजा लागला. ह्या दरवाज्याची पडझड झाली आहे.
बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेतील एक दरवाजा
येथून आत गेल्यावर बालेकिल्ल्याचा दरवाजा मुख्य दरवाजा लागला. हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे. दरवाज्याचा बराचसा भाग अनेक वर्षे जमिनीखाली गाडला गेला होता. शिव सह्याद्री संस्थे मार्फत मुरूम माती बाजूला करून दरवाजा बाहेर काढण्यात आला आहे. दरवाज्याचे चौकोनी दगड, ते एकमेकांवर चिकटवण्यासाठी वापरलेल्या चुन्याच्या रेषा स्पष्ट दिसतात. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर सुस्थितीत असलेल्या पहारेकर्यांच्या देवड्या दृष्टीस पडल्या.
बालेकिल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार. गोमुखी रचना.

 दरवाज्याला लागून असणाऱ्या पहारेकर्यांच्या  देवड्या

बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला मारुती आणि गणपतीचे भग्न अवस्थेतील मंदिर आहे.




त्याच्या पुढे प्रशस्त सदर आहे. ती पाहता राजगडाच्या सदरीची आठवण आल्यावाचून राहात नाही. सदरीच्या मागच्या बाजूला तीन खोल्यांत विभागून बांधलेले धान्यकोठार आहे. त्याच्या भिंती शाबूत आहेत, परंतु छप्पर उडाले आहे.
बालेकिल्ल्यावरील सदर
धान्यकोठाराच्या भिंती
धान्यकोठाराच्या मागच्या बाजूस प्रचंड मोठं विहीर वजा टाकं आहे. टाक्यात खाली वाकून बघताना भीती वाटते. ह्या चौरसाकृती टाक्याची लांबी-रुंदी साधारण तीस फूट, तर खोली जवळपास पन्नास ते पंचावन्न फूट आहे. इतकं मोठं खोदीव टाकं अजून कोणत्या किल्ल्यावर असेल असं वाटत नाही. टाक्यात पाणी नाही. माती आणि मुरूम ह्यामुळे ह्या टाक्याच्या बराच भाग बुजलेल्या अवस्थेत होता. शिव सह्याद्री संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला, त्यामुळे टाक्यांची खोली आठ ते दहा फूट वाढली. टाक्याची मूळ खोली अजूनही जास्ती असण्याची शक्यता आहे.
ह्यावरून टाक्याच्या खोलीचा अंदाज येऊ शकतो
टाक्यात उतरण्यासाठी खोदीव पायऱ्या काढल्या आहेत. खाली उतरताना वाटेत शंकराचे छोटे देऊळ आहे. देवळाच्या बांधकामात विटा आढळतात.

टाक्यात उतरताना लागणारे शंकराचे मंदिर
टाक्याच्या बाजूने पुढे गेल्यावर आम्ही एका बुरुजावर आलो. ह्या बुरुजावरून खाली पाहिल्यावर ह्या बुरुजाची चिलखती तटबंदी दृष्टीस पडली. इथे जाण्यासाठी बुरुजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूने भुयारी मार्ग केलेले आहेत. दोन्ही बाजूला तटबंदी आणि मधून वाट. राजगडाच्या आळु दरवाज्याची आठवण आली. पूर्वीच्या लोकांनी काय हेतू डोळ्यासमोर ठेऊन इतकं भव्य बांधकाम केलंय हे कदाचित आपल्या कल्पनेच्या पलीकडे असू शकते.
बुरुजाच्या चिलखती तटबंदीकडे जाणारी वाट
चिलखतावरून मूळ बुरुज
चिलखती तटबंदी मधून एक चोरवाट डावीकडे उतरते. सध्या ही वाट काही प्रमाणात बुजलेल्या अवस्थेत आहे.

हा बुरुज पाहून किल्ल्याच्या पूर्व दिशेकडे असणाऱ्या बुरुजावर आलो. येथून खाली पाहता भक्कम  तटबंदी दृष्टीस पडली. खाली जाण्यासाठी उभ्या असलेल्या बालेकिल्ल्याच्या बुरुजावरून दगडी जिना खाली काढला आहे. परंतु त्याची बरीच पडझड झालेली आहे. उगाच जोखीम न पत्करता आम्ही पुन्हा मुख्य दरवाज्याच्या इथे आलो आणि इकडून उजवीकडे जाणारी पायवाट पकडली (तयार केली). काही मिनिटात त्या तटबंदी वर येऊन पोचलो.
हा किल्ल्याच्या माचीचाच भाग असावा. माचीचा विस्तार फार नाही. ह्या तटबंदी मधून सुद्धा एक चोरवाट काढलेली दिसली. पण ती वाट तटबंदीच्या आत निघते (जे की फार च अस्वाभाविक आहे), की बाहेर निघते के कळू शकलं नाही. ही माची पाहून आमची किल्ल्याची फेरी पूर्ण झाली.

माचीवरील चोरवाट (की फसवी चोरवाट ?)
एकूणच किल्ला पाहता हा  गड फारच "underrated" आहे असं म्हणायला लागेल.
किल्ल्यावरील विस्तीर्ण धान्यकोठार, बालेकिल्ल्यावरील सदर, बालेकिल्ल्याचे चिलखती बुरुज, त्यातील चोरवाटा, प्रचंड मोठं पाण्याचं टाकं, गोमुखी बांधणीचे दरवाजे लक्षात घेता हा किल्ला मोठ्या प्रमाणावर राबता असावा. पेशवे काळात किल्ल्याची डागडुजी झाल्याचे इथले बांधकाम पाहता वाटते. किल्ल्यावरील बरेचसे अवशेष मातीखाली गाडले गेलेले आहेत. शिव सह्याद्री संस्थेच्या उपक्रमातून बऱ्याच गाडल्या गेलेल्या वास्तू अक्षरश: जमिनीमधून वर काढल्या आहेत.

किल्ला पाहून झाल्यावर पुढच्या पंधराव्या मिनिटाला आम्ही गावात पोचलो. ताथवडा गावातील प्रसिद्ध ‘बालसिध्दचे मंदिर' बघितले. त्यावरील शिलालेखावरून ह्या मंदिराचे (की किल्ल्याचे? ) इसवी सन १७६२ (शके १६८४) साली जिर्णीद्धार झाल्याचे समजले. मंदिर आणि परिसर बघून आम्ही ताथवड्याचा निरोप घेतला.
जाता जाता गावाच्या वेशीवरून गडाचं रूप मनात साठवून घेतलं. ह्या पवित्र रचनेस मनात नमन करून आम्ही निघालो. परत येताना वरुणराज प्रसन्न होऊन पाण्याचे शिंतोडे उडवत होता. अश्या भूर भूर पावसातच खरंतर जास्ती मजा येते.
आज नवीन किल्ला बघितल्याचं समाधान वाटत होतं. दिवस सार्थकी लागला होता.

*(सर्व फोटो स्मिता कडून साभार)

२५० किल्ल्यांच्या निमित्ताने

      क ळवण्यास आनंद होतो आहे की आज माझे २५१ गडकोट अभ्यासपूर्ण बघून पूर्ण झाले. लहानपणी संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आजह...