Wednesday, May 24, 2023

२५० किल्ल्यांच्या निमित्ताने

 


    कळवण्यास आनंद होतो आहे की आज माझे २५१ गडकोट अभ्यासपूर्ण बघून पूर्ण झाले. लहानपणी संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आजही टिकून आहे. गेली जवळपास पंचवीस वर्षे एक-एक करत गडकोट बघत आलो आहे आणि आज इथपर्यंत येऊन पोचलो आहे.

सुरुवातीला केवळ महाराजांविषयी आदर आणि आपुलकी म्हणून गडकोट फिरायला सुरुवात केली. त्यावेळी फारश्या नोंदीसुद्धा केल्या नाहीत. पण हळू हळू समजू लागलं की प्रत्येक किल्ला हा वेगळा आहे. त्याची रचना, त्याचा उपयोग, त्याचा इतिहास वेगळा आहे.
मग मात्र सुरुवात झाली ते गडकोटांचे अभ्यासपूर्ण निरीक्षण करण्याची. गडाचे नाव, जिल्हा, उंची, त्यावरील विशेष रचना, गूगल लोकेशन इत्यादी माहितीची नोंद करण्यास सुरुवात केली. पूर्वी पाहून झालेले गडकोट परत परत जाऊन बघितले.

खरंतर शंभर, दोनशे, अडीचशे असे आकडे कधीच मनात ठेवले नाहीत. पण यादी जशी १७५ - १८० च्या पुढे जाऊ लागली, तेव्हा जाणवू लागलं की आज खूप लांबवर आलो आहे. मागे वळून बघताना असंख्य आठवणी सोबत जोडत आलो आहे.
कधी किल्ल्याचं अस्तित्व झाडाझुडुपात शोधून काढायला लागत आहे, तर काही भव्य किल्ले अनेक दिवस मुक्काम केला तरी पूर्ण बघून झालेले नाहीत. काही किल्ले म्हणजे केवळ नावाला शिल्लक आहेत. त्यावर एखादा बुरूज किंवा एखादी गुहा किंवा पाण्याचे टाके इतकेच काय ते अवशेष शिल्लक! पण तेही किल्ले तितकेच महत्त्वाचे!

कारण "किल्ला बघणे" हे केवळ तिथल्या तटाबुरूजाला हात लावून परत येणे नव्हे. किल्ला बघायची सुरुवात होते त्या किल्ल्याची प्राथमिक माहिती आणि इतिहास काढण्यापासून. मग त्याच्या भेटीचे प्लॅनिंग, सहकारी जमा करणे, प्रवास, मुक्काम आणि इतर बऱ्याच निगडित गोष्टी. किल्ल्यावर भटकताना आलेले अनुभव, तिकडे असणारे कोड्यात टाकणारे बांधकाम, ह्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज केली की एक एक गड म्हणजे एक एक अनुभव होऊन जातो.

गडकिल्ल्यावरील बुरुजाच्या दगडाला नुसता हात लावला तरी विलक्षण ऊर्जा जाणवते. किल्ल्यात प्रवेश करताच भोवतालाचे तटबुरुज स्वागत करतात. किल्ल्यावर वावरताना एक क्षण डोळे बंद करून मी नेहमी कल्पना करतो - ह्या किल्ल्याच्या परमवैभवाच्या काळात तो कसा असेल?

मग दिसू लागतात दरवाजाच्या आतल्या देवड्यांत गस्तीला बसलेले पहारेकरी. तटाच्या छोट्या कोनाड्यात लावलेल्या पणत्या आणि दिवे. बुरुजांच्या फलिकांमध्ये सुसज्ज तोफा. दरवाज्यातून आतबाहेर करणाऱ्यांच्या होत असणाऱ्या नोंदी. धान्याने भरलेली कोठारे, हे तर कोणाचे तरी घर असावे, हे इथे स्वयंपाकघर, इकडे देवघर, हा व्हरांडा, समोर तुळशी वृंदावन, हे पाणी साठवायचे दगडी भांडे, हि सांडपाणी वाहून जायची वाट, त्या तिकडे पायऱ्या असणारी विहीर. हे शंकराचं मंदिर, हा सभामंडप आणि हा गाभारा. त्या उंचवट्यावर असणाऱ्या वाड्यात किल्लेदार राहत असावा. हे त्याचं खासगी पाण्याचं टाकं. हि सदर, आणि हे समोर उभे असलेले अधिकारी.

कल्पना केली तरी किती विलक्षण वाटतं. प्रत्येक किल्ला म्हणजे एक वेगळंच विश्व. हा सह्याद्री अफाट आहे, तो आणि त्यावर बांधलेले सगळे किल्ले बघून व्हायला अनेक आयुष्य कमी पडतील. जितकं काही बघून झालंय, मी त्याची नोंद करत आलो आहे, जमेल तितके फोटो काढत आलो आहे. महाराष्ट्र शिवाय गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेशातील किल्लेही बघत आलो आहे.
गड किल्ल्यांच्या रचनेबाबत आज थोडंफार कळत आहे. क्वचित वेगळं बांधकाम बघून कोड्यातही पडत आहे! कधी पडलो, कधी रडलो, कधी दमलो, कधी भांडलो सुद्धा आहे! अनेकांची साथ आणि सहकार्य घेत आलो आहे. सोबत नसेल कोणी तर क्वचित एकटा सुद्धा भटकून आलो आहे.
गोनीदा, प्र. के. घाणेकर, महेश तेंडुलकर यांची पुस्तके आणि डॉ. सचिन जोशी सरांशी मारलेल्या गप्पा आणि मार्गदर्शन, त्यामुळे किल्ले अभ्यासपूर्ण बघण्यासाठी मदत झाली.

सहकार्य, प्रोत्साहन आणि साथ दिलेल्या सर्व मित्रांचा मी ऋणी आहे. काही वेळेस मित्रांना केवळ माझ्या हट्टापायी निवांत कोकण ट्रीप ऐवजी गडकिल्ल्यावर तंगडतोड करावी लागली आहे. ट्रेकला गेल्यावर काळजी करणाऱ्या आईचा मी ऋणी आहे. माझी धडपड सांभाळून घेणाऱ्या रौद्र सह्याद्रीचा मी ऋणी आहे. ज्यांच्यशिवाय हे अशक्य होतं त्या माझ्या अपाचेचा आणि केटीएमचा मी ऋणी आहे. अनेक गावात चांगले रस्ते नाहीत, तिथे ह्या गाड्यांना पर्याय नाही. लांबच्या पल्ल्यांना माझ्या wrv ची सोबत होती, तिचाही ऋणी आहे. जिच्यासोबत हे सर्व शक्य झालं, अश्या बायकोचा मी खूप ऋणी आहे! थोडा भाग्यवानही आहे कारण तिलाही गडकोटांची भटकंती प्रचंड आवडते. (श्रुती @ १९८).

२५० गडकोट बघून झाले ह्या गोष्टीची जाहिरात करायची अजिबात इच्छा नाही. पण कदाचित लोकांना प्रेरणा मिळेल म्हणून लिहितो आहे. दैनंदिन काम आणि जबाबदाऱ्या सांभाळून इतकी भटकंती करणे सोपे नाही. पण ध्यास असेल तर हे अशक्यही नाही हेच सांगायचं आहे.
माझी गडकोटांची भटकंती अशीच पुढे चालू ठेवणार आहे. बऱ्याच किल्ल्यांची माहिती आज जालावर आणि पुस्तकांत सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे माझ्याकडे साठलेल्या माहितीच्या आधारे एखादे पुस्तक लिहिण्यापेक्षा, त्यावर विश्लेषण करून काही उपयुक्त माहिती किंवा संशोधन समोर येते का असा माझा पुढे प्रयत्न राहील.

धन्यवाद,

भूषण करमरकर

२५० किल्ल्यांच्या निमित्ताने

      क ळवण्यास आनंद होतो आहे की आज माझे २५१ गडकोट अभ्यासपूर्ण बघून पूर्ण झाले. लहानपणी संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आजह...