कुंभार्ली आणि वरंध घाटातून घाटवाट खाली कोकणात उतरते अन चिपळूण आणि महाड मार्गे अनेक बंदरांना जाऊन मिळते. ह्यांची सुरुवात पश्चिमेकडे पंढरपूर, विजापूर ह्या भागात होते. ह्याच व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी साताऱ्यातील अनेक किल्ल्यांची बांधणी झालेली आढळून येते. पूर्व भागात वर्धनगड, महिमानगड ह्यातील मुख्य किल्ले, तर भूषणगड, संतोषगड यांसारखे पूरक किल्ले.
भूषणगड बघायचं फार आधीच पक्क झालेलं. जेव्हा ह्या किल्ल्याचा विषय निघाला, तेव्हा माझ्या नावाचा ('नावचा' किंवा 'नावावर' नव्हे ) एक किल्ला आहे हे ऐकून बऱ्याच लोकांना हसू आवरलं नाही. किल्ल्यास हे नाव कोणी आणि का दिलं हे मला माहिती नसल्यामुळे गप्प बसून राहण्यावाचून माझ्याकडे काही पर्याय नव्हता.
'चालायचच' !
बर्याच दिवसांनी योग आला आणि ट्रेकला यायला आठ जण तयार झाले. स्वप्निल (दत्त्या) आणि केदार बऱ्याच दिवसांनी ट्रेक मोहिमांमध्ये पुनरागमन करत होते. भर भरून जोक्स आणि अनुपस्थित लोकांचा उद्धार अश्यांनी सहल गाजणार हे निश्चित होतं !
भूषणगड किल्ला |
भूषणगड औंध पासून सात-आठ किलोमीटर आहे (सातारा जिल्ह्यातील औंध, जे पूर्वी संस्थान होते). पायथ्यापासून किल्ल्याची उंची जेमतेम १०० मीटर असेल. घेराही फार मोठा नाही.
किल्ल्याला 'स्पर्श करून' परत निघण्यासाठी जे येणारे आहेत, त्यांच्यासाठी किल्ल्यावर फार बघण्यासारखं नाही. पण 'थोडसं' अभ्यासपूर्ण बघायचं झाल्यास किल्ल्यावर बघण्यासारखं आणि जाणून घेण्यासारखं बरंच काही आहे.
![]() |
लेखातील वर्णन वाचताना विकीमॅपिया लिंक बघितली, तर समजायला सोपं जातं |
पायथ्यापासून वरपर्यंत पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्यांच्या सुरुवातीला एक कमान बांधली आहे.
![]() |
सुस्वागतम |
![]() |
डाव्या बाजूला दरी आणि उजव्या बाजूला डोंगर अशी वाट |
![]() |
उजवीकडील डोंगराच्या वरील भागात पायऱ्यांच्या वाटेच्या समांतर तटबंदी |
![]() |
पायऱ्यांच्या वाटेनं वर चढताना प्रत्येक जण तटबंदीच्या टप्प्यात येतो |
शंभरातील नव्वद लोक उजव्या हाताचे तर फक्त दहा डावखुरे असतात. शत्रू सैन्यातील बहुतांश लोक आपल्या उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात ढाल पकडणार. वाटेच्या समांतर असणाऱ्या वरील भागातील तटबंदीवरून शत्रू 'टप्प्यात' येतो. शत्रूवर दगड धोंड्यांचा वर्षाव करायचा. दगडांना अडविण्यास उजव्या हातातील तलवार वापरणे ही 'नैसर्गिक' प्रतिक्रिया. ह्यामुळे तलवारी बोथट, वेड्यावाकड्या आणि निकामी होणार. ह्या अर्धमेल्या शत्रूनी चुकून गडाच्या आत प्रवेश केलाच, तर त्याचा पाडाव करणं म्हणजे तलवारीनी लोणी कापण्याइतकं सोपं !
राजगडाच्या पाली मार्गाने चढताना जो पहिला दरवाजा लागतो, त्याच्या आधीची पायवाट ह्याच प्रकारे काढण्यात आली आहे. संपूर्ण बुरुजाला प्रदक्षिणा घालून मार्ग वरती जातो. ह्यामध्ये बुरुज सतत उजव्या बाजूला राहतो. बुरुजातील जंग्या अश्या बांधल्या आहेत, पायवाटेने येणारा जाणारा प्रत्येक जण ह्यामधून दिसेल.
वर जात असताना वाटेत एक खंडोबाचं मंदिर लागलं. दाट, लांब मिशी, पसरलेले कान आणि वर 'गांधी टोपी' घातलेल्या खंडोबाची मूर्ती बघून थोडी गम्मत वाटली. आपल्या देव-देवतांच्या पोशाखांवर स्थानिक जीवन पद्धतीचा पगडा दिसून येतो त्याचंच हे एक उत्तम उदाहरण.
![]() |
मिशी आणि गांधी टोपी असलेला खंडोबा |
![]() |
दरवाजा लपवून ठेवणे हाच अश्या बांधकामाचा हेतू ! |
![]() |
एकात एक अश्या तीन महिरपी, दरवाज्याचा उंबरा. |
संतोषगडाचा मुख्य दरवाजा किंवा धोडपचा हट्टी दरवाजा आणि पूर्व दरवाजा अगदी अश्याच शैलीत बांधलेले आढळतात. दगडांच्या लहान आकारावरूनही हे बांधकाम तुलनेने नवीन आहे हेही सांगता येतं. तसंच बांधकामात वापरेलला दगड 'नवीन' आहे, मुरुमी नाही.
![]() |
दरवाजा ओलांडल्यावर दोन्ही बाजूला असणाऱ्या पहारेकर्यांच्या देवड्या |
![]() |
पहारेकर्यांची देवडी |
![]() |
दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर लागणारा चिंचोळा मार्ग |
काही पायऱ्या चढून पुढे गेल्यावर एक खोल खंदक सदृश खड्डा लागला. हा खड्डा म्हणजे पूर्वी वापरात असणारी दगडाची खाण आहे. ह्याच दगडांनी गडाचे बांधकाम केले गेले.
काही अंतरानं उजव्या बाजूला एक चौकोनी विहीर लागली. लांबी रुंदी साधारण आठ बाय आठ मीटर !
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळी भाग. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून इतक्या मोठ्या आकाराची विहीर ! किल्ल्यावरील तटबंदी आणि इतर मंदिराचे बांधकाम बघता, बांधकाम समयी पाण्याची गरज मोठी असणार हे निश्चित.
![]() |
दुर्दैव म्हणजे इथेही पाण्यात कचरा, थर्मोकोलची ताटे आणि बाटल्या... ते पाहून हृदय सोलवटून निघालं. आपल्या वारसा हक्कांचं महत्व आणि त्यामागे असलेलं आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व आपला समाज नेहमीच विसरत आला आहे. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी जेम्स डग्लसनेही हेच लिहून ठेवलं आहे. असो.
ह्या विहिरीच्या शेजारीच शंकराचे लहानसे मंदिर आहे. ते पाहून चार पायऱ्या चढल्यावर किल्ल्यावरील सध्याची प्रमुख वास्तू - हरणाई देवीचे देऊळ लागले. दुर्गा देवीचाच हा एक अवतार अशी माहिती पुजाऱ्याकडून मिळाली.
![]() |
आई हरणाई देवी |
देवांचे दर्शन घेऊन आम्ही तटबंदीवरुन फेरफटका मारायला निघालो. किल्ल्याची तटबंदी चांगल्या प्रमाणात शाबूत आहे. दरवाज्याचे दोन बुरुज धरून एकूण दहा बुरुज शाबूत आहेत. काहीं ठिकाणी तटबंदी धोकादायक झालेली दिसली. तटबंदी मध्ये एक शौचकूप, पाणी साठवण्याची जागा, तोफा आणि बंदुकांसाठी साठी वेगवेगळ्या आकाराच्या जंग्या दिसल्या. गडाच्या माचीच्या मध्यभागावर एक मोठ्या आकाराचा बांधीव बुरुज आहे.
माचीच्या टोकावर एक मोठा बुरुज आहे. येथून डोंगराच्या खालच्या टप्प्यात एक मोठी पायवाट दिसत होती. ही पायवाट म्हणजे किल्ल्याच्या पश्चिम दिशेस असणाऱ्या भुयारी देवीच्या मंदिराकडे जाणारी पायवाट आहे.
![]() |
किल्ल्याचे बुरुज, तटबंदी, खालच्या बाजूला भुयारी देवीकडे जाणारी पायवाट |
![]() |
माचीच्या टोकाला असणाऱ्या बुरुजावर |
किल्ला चढताना उजव्या डोंगराच्या वर दिसणारी हीच ती तटबंदी. येथून खाली वाकून पहिले असता पायऱ्यांची वाट दृष्टीक्षेपात येते. |
उतरताना काही पायऱ्या गेल्यावर एक वाट डाव्या दिशेने जाताना दिसली. हीच ती भुयारी देवीच्या मंदिराकडे जाणारी वाट. आम्ही मुख्य किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या भुयारी देवीच्या मंदिरापाशी आलो. कदाचित इथे आधी एक भुयार होतं आणि त्याच्या आतमध्ये देवीचं वास्तव्य असावं. हे भुयार आता बुजवण्यात आलय. तिथेच बाहेरच्या बाजूला देवीचं एक छोटंसं मंदिर उभारलेलं आहे.
![]() |
भुयारी देवीकडे जाणाऱ्या मार्गावरून दिसणारा माचीच्या टोकावर असणारा बुरुज |
![]() |
भुयारी देवीची प्रसन्न मूर्ती |
औंधचं भवानी संग्रहालय बघितलं. औंध संस्थांचे तत्कालीन राजे कै. भवानराव पंतप्रतिनिधी यांनी १९३८ साली हे बांधलं. ह्यामध्ये शेकडो तेलचित्रे आणि अनेक कलाविष्कार आहेत. मोगल आणि मराठाकालीन शस्त्रात्रे बघण्यासारखी आहेत. संग्रहालयाच्या आवारात अनेक वीरगळी, बौद्ध मूर्ती, शंकर पार्वतीच्या मूर्ती ठेवल्या आहेत. (फोटो काढण्यास मनाई आहे.)
संग्रहायल बघून झाल्यावर थोडी पेटपूजा केली आणि गाड्या यमाई देवीच्या मंदिराबाहेर येऊन थांबल्या.
यमाई देवीविषयी खालील कथा सांगितली जाते -
यमाई देवी म्हणजे पार्वती मातेचा अवतार. प्रभू श्रीराम सीतामातेच्या शोधात असताना पार्वती मातेनं त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. तिनं सीतामातेचा अवतार परिधान केला व प्रभू श्रीराम यांना दर्शन दिलं. परंतु श्रीराम हे साक्षात विष्णूचा अवतार असल्यानं त्यांनी पार्वती मातेला ओळखलं. त्यांनी मातेला "ये माई" अशी हाक मारली.
त्यावरून ह्या देवीचं "यमाई" असं नाव पडलं. यमाई देवीच्या अधिक माहितीसाठी: http://aundh.info/marathi/yamaidevi.php
हे मंदिर शुष्कसांधी शैलीचं, म्हणजेच दगड एकमेकांवर जोडताना कोणताही चुना अथवा तत्सम पदार्थ न वापरता बांधलं आहे. मंदिराची बांधणी कोल्हापूरच्या मंदिरासारखीच वाटली. कोल्हापूरचं मंदिर चालुक्य राजवटीमध्ये सातव्या आठव्या शतकात झालंय. पण यमाई देवीचं हे मंदिर यादवकालीन असावं असा माझा अंदाज आहे. तज्ज्ञांनी कृपया प्रकाश टाकावा.
मंदिराच्या गाभाऱ्यात अंदाजे दोन मीटर उंचीची यमाई देवीची भव्य मूर्ती आहे. देवीची जुनी स्वयंभू मूर्तीसुद्धा आहे.
मंदिराच्या सर्व बाजूंनी तटबंदी वजा भिंत उभारली आहे. भिंतीच्या आत सभामंडप आहेत. हे सगळं मंदिराच्या तुलनेने नवीन (बहुतेक पेशवेकालीन) बांधकाम आहे.
यमाई देवी पार्वतीचा अवतार, त्यामुळे मंदिरासमोर नंदी आहे |
मंदिराच्या भोवताली बांधलेले सभामंडप |
मंदिराच्या बाजूने बांधलेली तटबंदी- मंदिराच्या तुलनेने हे नवीन बांधकाम आहे |
यमाई देवीच्या टेकडीवरून दूरवर दिसणारा भूषणगडाचा एकमेव डोंगर |
येताना जरांडेश्वर, चंदन-वंदन, वैराटगड यांचं धावतं दर्शन घेतलं.
दत्या, केदार आणि सुमंत एकत्र असल्यानं ट्रीपच्या सुरुवातीपासूनच जी खेचाखेची सुरु झाली, ती अगदी शेवटपर्यंत सुरूच होती. इथे दांड्या असता तर अजूनच धुव्वा झाला असता. भूषणगड किल्ला तर बघण्यासारख आहेच, पण ट्रिप लक्षात राहण्याचं अजून एक कारण नक्कीच मिळालं. एक निवांत ट्रिप झाली.
"We didn't realize we were making memories, we just knew we were having fun !"
very nice
ReplyDelete