Sunday, March 26, 2017

कलानिधीगड (कलानंदीगड)

      गड किल्ल्यांना परमोच्च महत्त्व प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. गड किल्ल्यांचा आधार घेऊन आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. महाराजांनी योग्य जागा हेरल्या. मोक्याच्या जागेच्या आजूबाजूच्या डोंगरावर बुरूज-तटबंदीचा शेला पागोटा चढवून किल्ल्यांची उभारणी केली.
रामचंद्रपंत अमात्य विरचित आज्ञापत्रात महाराजांचे किल्ल्यांविषयी असलेले विचार प्रकट होतात. त्यात म्हटलंय - "राज्यरक्षणाचें मुख्य कारण किल्ले, देशोदेशी स्थळे पाहून बांधावे."

कोल्हापूर जिल्ह्यातला कलानिधीगड हा असाच एक देखणा किल्ला. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. सिंधुदुर्ग आणि गोमंतकात उतरणाऱ्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी.


कालिवाडे गावातून कलानिधीगड
गड कसा असावा आणि त्याच्या रचनेसंदर्भातील कागदोपत्री वाचलेली माहिती मी ह्या किल्ल्यावर अगदी यशस्वीपणे पडताळून पहिली. किल्ले फक्त बघण्यापेक्षा ते समजून घ्यायला खूप जास्ती मजा येते !
रामचंद्रपंत अमात्य ह्यांनी गड बांधणीबाबत आज्ञापत्रात नमूद केलेल्या 'सूचना' हा किल्ला बांधणाऱ्या स्थापत्यवीराने तंतोतंत पाळल्या आहेत. कलानिधीगडावर ह्याची चटकन जाणीव होते ह्याचं कारण गड विस्ताराने लहान आहे, आणि इतक्या कमी जागेत किल्ल्यावर आवश्यक अश्या सर्व प्रकारच्या इमारती उभारल्या आहेत. हे एक प्रकारचं 'चॅलेंज' म्हणावं लागेल. कोणती इमारत कुठे असावी हे सुद्धा आज्ञापत्रातील उल्लेखाला अनुसरून आहे. लेखात मी त्या गोष्टींचा पडताळा नमूद करणार आहे.

बेळगाव-आंबोली रस्त्यावर बेळगाव पासून अंदाजे २५ किमी अंतरावर कालिवडे हे किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे. गडावर पायी जाण्यासाठी सध्या कालिवडे गावातून जाणारी पायवाट वापरात आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रॅक्टर जाईल असा अजून एक कच्चा दगडी रस्ता सुद्धा काढला आहे. हा गडाला लांबची फेरी मारून वरती येतो. आम्ही ह्या दगडी रस्त्यानं न जात पायवाट पकडली आणि किल्ला चढायला सुरुवात केली.

वाटेत खंडोबाचं (कि एखाद्या वीराचं?) उद्ध्वस्त मंदिर आणि मूर्त्या दिसल्या. चढताना मध्येच मुख्य पायवाट सोडून दुसऱ्या कमी रुळलेल्या वाटेनं गेल्यामुळे मंदिराचे हे अवशेष बघायला मिळाले.


वाटेमध्ये असलेली वीराची मूर्ती

गडाचा दरवाजा गाठायला अंदाजे दीड तास लागला. सुस्थितीत असणारा हा दरवाजा खरंतर गडाचा दुसरा दरवाजा आहे. ह्याचं कारण किल्ला फिरताना आम्हाला भग्न झालेला गडाचा मुख्य दरवाजा दिसला, जो दुसऱ्या दिशेला आहे.
ह्या सुस्थितीत असणाऱ्या दुसऱ्या दरवाज्याची रचना गोमुखी म्हणता येणार नाही. जागेअभावी दरवाज्यास गोमुखी पद्धतीनं बांधणं शक्य झालं नसावं. पण दरवाजा एका सशक्त बुरुजाच्या मागे लपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. दरवाज्याच्या डावीकडील बुरूज त्याला बरोबर कवेत घेतो. (वर्धनगडाची चोर दिंडी अगदी ह्याच पद्धतीनं बांधली आहे). 
आज्ञापत्रात पंत म्हणतात-
"दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून, पुढे बुरूज देऊन, येतिजाती मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे, यांकरिता गड पाहून, एक दोन तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यांमध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या"


गडाचा सुस्थितीत असणारा दरवाजा, उजवीकडील बुरुजामध्ये तोफ डागण्याची जागा आणि जंग्या दिसत आहेत
दरवाज्याची रचना - वर येणारी पायवाट बुरुजांच्या कुशीतून किल्ल्यात प्रवेश करते

दरवाज्यातून आत आल्यावर मागील बाजूस फांजीवर जाण्यास बांधलेल्या पायऱ्या दृष्टीस पडतात.

दरवाजा आतील बाजूने
दरवाज्याकडे पाठ करून उभं राहिल्यास उजवीकडील तटबंदी गडाच्या पश्चिम टोकापर्यंत शाबूत आहे. ह्याच ठिकाणी डाव्या हाताला एक लांबलचक भिंत बांधली आहे. जी गडाच्या दक्षिण टोकाच्या तटबंदीला जाऊन मिळते. ह्या भिंतीची जाडी अंदाजे सव्वा मीटर तर लांबी जवळपास सत्तर मीटर आहे(जीपीएस मेझरमेन्ट). ही भिंत तटबंदी नाही, तर किल्ल्यावरील सपाट प्रदेशाचे दोन भाग करण्यासाठी आहे (ज्याला आपण मराठीत 'पार्टिशन वॉल' म्हणतो).
अशी भिंत बांधायचं प्रयोजन आणि त्या संदर्भातील आज्ञापत्रातील उल्लेख लेखामध्ये पुढे देतो आहे.
गडाची विकीमापिया इमेज
सध्या ह्या भिंतीला मध्येच खिंडार पाडून एक लोखंडी दार बसवलं आहे. ह्या लोखंडी दारातून प्रवेश केल्यावर आपण किल्ल्याच्या पूर्वेकडील विभागात प्रवेश करतो. समोरच बीएसएनएलची चौकी आहे. चौकीत कालिवडे गावातील दोन व्यक्ती सिक्युरिटी गार्ड म्हणून काम पाहतात. ह्या चौकीच्या शेजारी टॉवर उभारला आहे.
इथून डाव्या बाजूनं पुढे गेल्यावर दारुकोठार आहे (नकाशा बघावा). एके ठिकाणी ह्याचा उल्लेख वाडा म्हणून आलेला आहे. परंतु मला हा वाडा किंवा कोणाच्या राहण्याची जागा वाटत नाही. हे दारुकोठार किंवा युद्धसामग्री संबंधातील एखादं बांधकाम असावं. ह्याचं कारण लेखात मी पुढे दिलं आहे.
ह्याच दिशेनं पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या पूर्व टोकावरील बुरुजावर येतो. ह्या ठिकाणावरून कालिवडे गावातून येणारी पायवाट दृष्टीस पडते.
तटबंदी डावीकडे ठेवत गडाच्या दक्षिण दिशेला चालत राहिल्यावर आपल्याला त्या काळी बांधण्यात आलेलं शौचकूप (संडास) दृष्टीस पडतं. गडाच्या तटबंदीला अगदी चिकटून ह्याचं बांधकाम आहे (तटबंदीची भिंत दोन्हीमध्ये 'कॉमन' आहे). असे अजून तीन शौचकूप ठराविक अंतरावर दिसतात. लोहगड, सिंधुदुर्ग, राजगड आदी किल्ल्यांवर शौचकूप आहेत, पण ते तटबंदीच्या आतच भुयार किंवा कोनाड्यासारखे बांधून काढले आहेत. पूर्वीच्या काळी तटावर चोवीस तास पहारेकरी असायचे (जश्या आज आपल्या शिफ्ट ड्यूट्या असतात). ह्या पहारेकऱ्यासाठी केलेली हि सोय आहे, जेणेकरून त्यांना नित्यविधींसाठी तटापासून लांब जायची गरज भासणार नाही.
मला ह्या शौचकुपांचं फार विशेष वाटतं. बहुतांश किल्ल्यांवर फक्त दरवाजे, तटबंदी आणि बांधकामाच्या जोती शिल्लक राहिल्या आहेत. 'शौचकूप' हे एक बांधकाम असं आहे की जे अजूनही आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे, आणि त्याच्या रचनेत फारसे बदल झालेला नाही!
इथून थोडं पुढे गेल्यावर आपण 'त्या' भिंतीच्या दुसऱ्या टोकापाशी येतो जी दरवाज्यापासून किल्ल्याला दोन भागात विभागते. इथून भिंतीला डावीकडे ठेवत पुन्हा लोखंडी दरवाज्यापाशी यायचं, आणि लोखंडी दरवाज्यातून डावीकडे बाहेर पडायचं.

इथे आपल्या डाव्या हाताला भवानी मातेचं प्रशस्त मंदिर आणि त्याला लागूनच असलेलं एक घर आहे. ह्या मंदिर परिसराचे तीन विभाग आहेत
१) मंदिरासमोरील अंगण, इथे एक मोठं तुळशी वृंदावन(समाधी?) आहे.
२) मंदिराचा सभामंडप.
३) मंदिराचा गाभारा. खरंतर दोन गाभारे आहेत, एका गाभाऱ्यात शिवलिंग आणि भैरोबा तर दुसऱ्या गाभाऱ्यात भवानी मातेची शस्त्रसज्ज मूर्ती आहे. हि मूर्ती पारगड आणि प्रतापगड ह्या किल्ल्यांवर असलेल्या मूर्तीशी साधर्म्य असलेली, पण आकारानं लहान आहे. ही मूर्ती ज्या खडकात घडवली त्याचा प्रकार अगदी प्रतापगड आणि पारगडावरील मूर्तीच्या खडकाशी मिळत जुळता आहे. गाभाऱ्याचा बाजूलाच गणेशाची देखणी मूर्ती आहे.
मंदिर आणि परिसर रचना
श्री गणेशाची मूर्ती

वरील आकृतीमध्ये मी ह्या बांधकामाची साधारण रचना दाखवायचा प्रयत्न केला आहे.
मंदिराला लागून एक घर आहे. ह्याला वाडा म्हणता येणार नाही, ना हि ह्याला सदर म्हणता येईल. हे एक साधं घर किंवा भक्तांसाठी मुक्कामाची सोय असावी. भिंतींमध्ये दिवे ठेवण्यासाठी अनेक कोनाडे आहेत. घरातच एका कोपऱ्यात दोन भिंती बांधून एक भाग वेगळा काढला आहे. हे स्नानगृह असावे.


तुळशी वृन्दावन

हे बघून आपण मंदिराच्या मागे असणारी विहीर बघायची. हि विहीर म्हणजे दगडाची प्रचंड मोठी खाण आहे. ह्या आयताकृती विहिरीची लांबी अंदाजे चोवीस मीटर, रुंदी अठरा मीटर आणि सरासरी खोली पाच-सहा मीटर आहे. किल्ल्याच्या बांधकामातील दगड ह्याच खाणीतून काढले आहेत.
वापरलेल्या दगडाचे काम झाल्यावर अश्या खाणींचा उपयोग नंतर विहिरी म्हणून केला गेला. महिपालगड, सामानगड सारख्या किल्ल्यांवर ह्या खाणींना पाणी लागले आणि त्या त्या ठिकाणी एकच मोठीच्या मोठी विहीर तयार झाली.
दगडाची खाण, मागे मंदिर परिसर

पण कलानिधीगड, संतोषगड या किल्ल्यांवर खाणीमध्ये पाणी लागलेले दिसत नाही. त्यामुळे खाणीच्या तळाशी अजून खोल खणून विहिरी काढण्यात आल्या. कलानिधीगडावर ह्या खाणीत तीन कोपऱ्यात तीन विहिरी खणल्या आहेत. ह्यातील एकच विहीर सध्या वापरात आहे. बाकी दोन बुजलेल्या स्थितीमध्ये आहेत. वापरात असलेली विहीर अंदाजे पन्नास फूट खोल आहे. जानेवारी मध्ये ह्यातील पाण्याची पातळी अंदाजे चाळीस फुटांवर होती. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची ही एकमेव सोय आहे, त्यामुळे किल्ल्यावर येताना लांब दोर बाळगावा.

आज्ञापत्रात पंत म्हणतात -
"गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणी ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळपर्येंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे, जसें तसें पाणीही पुरतें, म्हणुन तितकियावरीच निश्चिंती न मानावी. उद्योग करावा, किनिमित्य कीं, झुंजामध्यें भांडियांचे (तोफांच्या) आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें. याकरीतां तसे जागीं जखिरियाचें पाणी म्हणून दोन चार टाकीं तळीं बांधावीं. त्यातील पाणी खर्च होऊं न द्यावें, गडाचे पाणी बहुत जतन राखावें."
महाराजांच्या दूरदृष्टीला काय म्हणावे! त्यांच्या विचारला अनुसरूनच त्या काळी किल्ल्यांचा बांधकाम केलं गेलं, त्यामुळे आपल्याला बहुतांश किल्ल्यांवर पाण्याची अनेक टाकी बघायला मिळतात.
युद्धामध्ये पाणी स्रोतांमध्ये विष टाकून तो निरुपयोगी करणे हि सुद्धा एक नीती होती. त्यामुळे अश्या वेळेस गडावर अनेक टाकी, तीही किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागात असणे केव्हाही सोयीचेच होते!

विहीर पाहून आम्ही किल्ल्याच्या दक्षिणेकडील तटबंदीचा फेरफटका मारायला निघालो. वाटेत घरांच्या आणि इतर बांधकामाच्या अनेक जोत्या आहेत. त्यात एक जोत इतरांपेक्षा लांबी-रुंदीने मोठी आहे. हा किल्लेदाराचा वाडा असावा.
येथील तटबंदीला लागूनच एक धान्यकोठार आहे. त्याचेही मध्ये भिंत बांधून दोन भाग केलेले दिसतात.

आतापर्यंत आपण जे जे अवशेष बघितले त्यावरून एक कळतं की किल्ल्यावर बऱ्यापैकी वस्ती असावी आणि ही वस्ती किल्ल्याच्या ह्याच भागात होती.
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किल्ल्याच्या सध्या वापरात असलेल्या दरवाज्यापासून जी आडवी भिंत बांधली आहे, ती किल्ल्याचे दोन भाग करते. भिंतीच्या एका बाजूला दारुकोठार आहे. (बीएसएनएल चा टॉवर आहे त्याच्या शेजारी). दुसऱ्या भागात मंदिर, अंगण, त्याशेजारील घर, इतर बांधकामाचे आणि घरांचे अवशेष आहेत. धान्यकोठार सुद्धा आहे.
पंतांनी आज्ञापत्रात काय म्हटलंय ते पाहू -
"दारूखाना घराजवळ घराचे परिघाकाली नसावा. आठ पंधरा दिवसांत हवालदाराने येऊन दारू, बाण, होके आदिकरून बाहेर काढून उष्ण देऊन मागुती मुद्रा करुन ठेवीत जावें. दारूखान्यास नेहमी राखणेस लोक ठेवावे. त्यांणी रात्रं दिवस पहा-या प्रमाणे जागत जावें. परवानगीविरहित आसपास मनुष्या येऊं न द्यावे. किल्ला संरक्षणाचे कारण ते भांडी व बंदुका, याकरीता किल्ल्यांत हशम ठेवावेत (ते) बंदुकीचे ठेवावेत"
दारूकोठाराजवळ घरे असू नयेत(ते धोक्याचे आहे). दारुगोळा वेळोवेळी बाहेर काढून त्याची देखभाल बघितली जायची. परवानगी शिवाय दारूकोठारापाशी येण्यास मज्जाव होता.
किल्ल्याच्या एका भागात घरे तर दुसऱ्या भागात बीएसएनएल च्या चौकीशेजारील बांधकाम आहे. आज्ञापत्रात सूचना लक्षात घेता हे बांधकाम म्हणजे वाडा नसून दारुकोठार किंवा युद्धसामग्री संबंधातील एखादं बांधकाम असावं असा माझा तर्क आहे.
कलानिधीगड बांधणाऱ्याकडे जागा कमी उपलब्ध होती. गडाला बालेकिल्ला किंवा माची नाही. त्यामुळे किल्ल्याला दोन भागात मोडणाऱ्या जाड भिंतीचे प्रयोजन हे संरक्षणासाठी, आणि लष्करी गोष्टी मूळ वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी असावं असं मला वाटतं.

धान्यकोठाराच्या बाजूला आम्हाला किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याचे भग्नावशेष दिसले. हाच किल्ल्याचा मुख्य दरवाजा! हा दरवाजा म्हणजे दोन दरवाज्यांचा समूह आहे. पहिला (बाहेरील) दरवाजा पश्चिमेकडे तोंड करून, तर दुसरा (आतील) दरवाजा दक्षिणेकडे तोंड करून बांधला आहे. दोन्ही दरवाजे मजबूत तटबंदीने जोडले आहेत. एका दरवाज्यातून दुसऱ्यामध्ये जाण्यासाठी ९० अंशात वळायला लागतं. ह्याच वेळेस शत्रूची पाठ दिसते.
भग्नावस्थेतील मुख्य दरवाजाशिळेवर असणारी गणपतीची मूर्ती


मुख्य दरवाजा नकाशा, आत येणारी वाट बुरुज तटबंदीच्या विळख्यात आहे
भग्न दरवाजा

सध्या हा दरवाजा पूर्णपणे पडझड झालेला आहे. इतका, की इथं एक दरवाजा आहे हे ओळखायला खूप बारीक नजरेनं बघावं लागतं. दगडांच्या शीळांचा मोठा ढीग इथे जमा झाला आहे. त्यातीलच एका आडव्या शिळेमध्ये कोरलेला गणपती दरवाज्याची साक्ष पटवून देतो. दरवाज्याच्या बाजूचे बुरूज अतिशय धोकादायक झालेले आहेत. 
दुर्गांची ही अवस्था बघून स्वर्गातील त्या किल्लेदाराला कितीवेळा आवंढा गिळायला लागत असेल, ते त्यालाच ठाऊक.

दरवाज्याला लागून असलेल्या तटबंदीवरून आपण पश्चिम दिशेला चालत राहायचं. इथे एक शानदार बुरूज उभा आहे.
किल्ल्यावर असणारा एक शानदार बुरुज, त्यात वरती तोफ डागण्याची जागा दिसत आहे. बुरुजाच्या मध्य उंचीवर जंग्या दिसत आहेत

ह्यापुढील तटबंदी फोडून ट्रॅक्टरचा रस्ता गडावर आणला आहे. ह्या बुरुजावरून सूर्यास्त बघणं हा एक स्वर्गीय अनुभव होता. लांबवर पारगड आणि आंबोली घाटातले डोंगर डोळ्याचं पारणं फेडत होते.
असं दृश्य फक्त गड-किल्ल्यांवरच
इथून पुढे चालत गेल्यावर पश्चिमेकडील भक्कम बुरूज येतो. ह्याच बुरुजाला लागून असलेल्या तटबंदीमध्ये आपल्याला अलंगा दिसतात. अलंगा म्हणजे पहारेकऱ्यांच्या विश्रांतीची जागा.
तटबंदीला लागून असलेल्या अलंगा

हे बघून किल्ल्याची तटबंदी डाव्या हाताला ठेवून आम्ही  मागे फिरलो. पुन्हा मंदिरापाशी आलो. येथे गडफेरी पूर्ण झाली. संपूर्ण किल्ला बघताना मनाला अपार समाधान मिळालं.


किल्ल्यावरून दिसणारे जंगमहट्टी जलाशयाचे दृश्य 


त्या काळी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य अशा गडकिल्ल्यांची उभारणी करण्यात आली. प्रत्येक किल्ल्यावरील बांधकामाला एक वेगळा अर्थ आहे. हे बांधकाम घडविणारा कारागीर वेगळा आहे, त्यामुळे त्यात विविधता आहे. ह्या बांधकामातच आपल्या इतिहासाची आणि समाजरचनेची पायामुळं आहेत.
ह्या किल्ल्यांना नुसत्या भेट देऊन परतण्यापेक्षा, जर ते समजून घेतले तर त्यातून अधिक मजा तर येतेच, शिवाय त्या वास्तूबद्दल आणि आपल्या पूर्वजांबद्दल मनात आदरभाव निर्माण होतो.

Saturday, October 1, 2016

भुदरगड

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग !
गड किल्ल्यांना परमोच्च महत्व प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. ह्या गड किल्ल्यांचा आधार घेऊन आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं.
महाराजांच्या नजरेत प्रत्येक किल्ल्याचं महत्व हे अनन्य साधारण होतं. त्यांनी एक एक किल्ला हा एक एक राज्य असल्याप्रमाणे जपला. कोल्हापूर जिल्ह्यात उभे असणारे भक्कम किल्ले ह्याची साक्ष देतात.
सिंधुदुर्ग आणि गोमंतकात उतरणाऱ्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी, तसंच विजापूर येथील सत्तेवर आणि गोमंतकातील पोर्तुगीजांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्याच्या दक्षिणेकडील ह्या किल्ल्यांचा वापर केला गेला.

सध्याच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे ११ किल्ले नोंदीमध्ये आहेत. भुदरगड हा त्यातलाच एक महत्वाचा किल्ला !
माहित असलेल्या इतिहासाप्रमाणे - शिलाहार राजा भोज (दुसरा) यानं हा किल्ला बांधला. छत्रपती  शिवाजी महाराजांनी इथं नवीन बांधकाम करून किल्ल्याला एका प्रबळ लष्करी ठाण्याचं स्वरूप दिलं. भुदरगडाची मोठ्या प्रमाणात शाबूत असणारी तटबंदी आणि तिच्याखालील ताशीव कडे बघितल्यावर ह्याचा प्रत्यय येतो.
दुर्दैवाने हा गड पुन्हा अदिलशहाच्या ताब्यात गेला. १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला.
जिंजी वरून परत येताना छत्रपती राजाराम महाराजांनी काही काळ ह्या किल्ल्यावर वास्तव्य केलं.

भुदरगड किल्ला - विकीमापिया
http://wikimapia.org/#lang=en&lat=16.250420&lon=74.149346&z=15&m=b&search=bhudargad%20fort

कोल्हापूरच्या दक्षिणेस  साधारणपणे ७० कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. पुण्यापासून अंदाजे सव्वा-तीनशे किलोमीटर.
इतक्या लांबचा किल्ला बघायचा म्हंटल्यावर अनेक योग जुळून यावे लागतात. दोन दिवसांची सुट्टी, इतक्या लांब (बाईक वर) येण्याची तयारी असणारे आणि "किल्ल्यावर काय बघायचं" हा प्रश्न न पडणारे सोबती.
एन एच फोर आणि अपाचे ह्यांचं समीकरण केव्हाचं जुळलेलं ! निखिल आणि त्याची पल्सार सोबतीला.
पहाटे लवकर पुण्याहून निघून संध्याकाळी चहाला भुदरगडावर असा बेत ठरला. वाटेत साताऱ्या जवळची लिंब गावातील 'बारा मोटेची विहीर' बघायचं नक्की केलं. ह्या विहिरीविषयी एक वेगळा लेख इथे लिहिला आहे - 
http://bhushankarmarkarworld.blogspot.in/2016/08/bara-motechi-vihir.html

दुपारी साडेबाराच्या सुमारास कोल्हापुरात पोचलो. 'ओपल हॉटेल' मधलं 'तांबडं-पांढरं' जेवण आणि त्यावर कॅरॅमल कस्टर्ड आणि रबडी !

कोल्हापूर - कागल - गारगोटी - भुदरगड असा प्रवास करून पाच-साडेपाचच्या सुमारास आम्ही किल्ल्यावर पोचलो. गाडीरस्ता वरपर्यंत जात असल्यानं वरती पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी होती. गडाचा माथा सपाट आणि विस्तीर्ण आहे. तुलना करायची झाल्यास विसापूरच्या पठाराशी करता येईल.
भूदरगडाचं  विस्तीर्ण पठार
भुदरगड किल्ल्याची खरी ओळख म्हणजे तिथला दूधसागर तलाव. त्याचं दृश्य बघून मन प्रसन्न झालं.
भुदरगडाचं वैभव - विस्तीर्ण दुधसागर तलाव
पावसाळ्यात पाणी वाहून जाणाऱ्या दगडाच्या खाचेत बांध घालून पाणी अडवलंय. शिवकाळात हा तलाव इतका मोठा नव्हता. इंग्रजांनी तलावाच्या दुसऱ्या बाजूस अजून एक मोठी भिंत बांधून ह्या तलावाचं विस्तृतीकरण केलं आहे. ह्यातील पाणी मात्र पिण्यासाठी अयोग्य आहे. पाण्याला (इथल्या मातीच्या गुणधर्मामुळे?) दुधी रंग आला आहे.

तलाव बघून आम्ही किल्ल्याचा फेरफटका मारायला निघालो. तलावाच्या डाव्या बाजूनं चालत गेल्यावर भवानी मातेचं मंदिरआहे. भवानी मातेची शस्त्रसज्ज मूर्ती विलोभनीय आहे. मंदिराचं वैशिष्ट्य असं कि, मुख्य गाभाऱ्याच्या समोर एक सभामंडप बांधला आहे. जुन्या वाड्यांच्या ओसऱ्या किंवा सज्जा ज्या पद्धतीचे असतात, त्या प्रकारचं ह्याचं बांधकाम आहे. (आपल्या कसबा गणपती मंदिराचा सभामंडप साधारण अश्या प्रकारचा आहे)
मंदिराचा नकाशा (प्रमाणात नाही)
पूर्वीच्या काळी लग्न, मुंज, यज्ञ असे धार्मिक विधी किंवा इतर सामाजिक कार्यक्रम हे मंदिरातच होत असत. मंडपाच्या मधल्या मैदानी जागेत अंदाजे शेकडा माणसे सामावली जाऊ शकतात. लोकांना सामावून घेण्याची गरजच मंदिर आणि त्या समोर बांधलेल्या सभामंडपाच्या रचनेचे कारण असावं. मंदिर आणि सभामंडपाची अशी रचना फार पूर्वीपासून चालत आलेली आहे, आणि आजही गावोगावी बांधल्या जाणाऱ्या मंदिरातून ती आपल्याला दिसून येते.

काही पावलं पुढे गेल्यावर काही समाध्या दिसल्या. त्याच्या पुढे एक विशिष्ट रचनेत बांधलेलं मंदिर आहे. ह्या मंदिराचा गाभारा जमीन पोखरून तयार केला आहे. वरून पाहता या भागात मंदिर आहे ह्याचा पत्ताही लागत नाही. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर छोटंसं सभामंडप तयार केलेलं आहे.
गाभाऱ्यात अनेक देवी देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत.
पोखरून तयार केलेला मंदिराचा गाभारा
परकीयांच्या हल्ल्यांपासून देवता आणि मंदिरांचं रक्षण व्हावं म्हणून अश्या प्रकारची बांधणी असावी !

काही अंतर चालून गेल्यावर घरांच्या अनेक जोती दृष्टीस पडल्या. पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर असणारे, एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते! एक बैलगाडी जाऊ शकेल इतका रस्त्यांचा विस्तार, आणि त्यांच्या बाजूला घरांची बांधणी. त्या काळातील घरांची रचना अतिशय 'प्लॅनिंग' करून केलेली होती. धोडपच्या सोनारमाची वरील घरांची जोती, अथवा राजगडाच्या बालेकिल्ल्यावरील राजवाड्याच्या जोती, किंवा इतरही किल्ल्यांवरील बांधकामात हे प्लॅनिंग आढळून येतं !
आपल्या शहरातील "पेठा" ह्या अश्याच  बांधकाम रचनेतून जन्मास आलेल्या आहेत.

घरांच्या बाजूलाच एक सुबक बांधणीचं शंकराचं मंदिर आहे. ह्या मंदिराच्या डाव्या बाजूला चालत गेलो असता एक छोट्या आकाराचा साचपाण्याचा तलाव लागला.
सुबक बांधणीचं शंकराचं मंदिर. अलीकडे बांधकामाचे चौथरे
तलाव डावीकडे  ठेऊन आम्ही समोर असणाऱ्या तटबंदीवर चढलो. तटबंदीची रुंदी अंदाजे पाच ते सहा फूट, तर उंची अंदाजे दहा फूट आहे. तटबंदीच्या बाहेरील बाजूचा खडक तासून तिची बिकटता अजूनच वाढवलेली आहे.

तटबंदीवरुन फेरफटका मारताना खाली "जानकीपेठ" गाव  दिसत होतं. तटबंदी अखंड नसून मध्ये मध्ये जागा सोडली आहे. ह्या मोकळ्या ठिकाणी पाषाण कडे सरळसोट ३०-४० फूट खोल आहेत. त्यामुळे इथं भक्कम तटबंदीची आवश्यकता वाटली नसावी. ह्या ठिकाणी जुनी कमी उंचीच्या तटबंदीची जोती दिसतात, जी शिवकाळाच्याही पूर्वी उभारण्यात आली असावी असं वाटतं.
फांजीवर चढण्यासाठी पायऱ्या
तटबंदीवरुन फेरफटका मारताना आम्ही किल्ल्याच्या दक्षिण भागात  पोचलो. इथं जानकीपेठ गावातून येणारा कच्चा गाडीरस्ता किल्ल्यावर येतो. ज्या भागातील तटबंदी ढासळली आहे त्या त्या भागात सरकारनं  नवीन भिंत वजा तटबंदी बांधून गडाचं पूर्वीचं रूप परत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

भुदरगडाच्या दक्षिणेकडे असलेल्या डोंगरावरही मोठी सपाटी आहे. सध्या तिथं पवनचक्क्या उभारण्यात येत आहेत.
तटबंदीच्या लगोलग चालत गेल्यावर आम्ही किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूला आलो. इथून खाली असणाऱ्या जंगलाचं दृश्य डोळ्याचं पारणं फेडत होतं.तटबंदीला मध्ये मध्ये बुरुज आहेत. तटबंदीमधे एके ठिकाणी आतील बाजूस एक खोलीसदृश जागा आहे. बहुदा ही पहारेकरांच्या विश्रांतीसाठी बांधलेली खोली, ज्याला 'अलंग' म्हणतात ती असावी. तटबंदीच्या बाजूस कोरड्या पडलेली पाण्याची दोन टाकी दिसली. दोन्ही टाकी दगड खोदून तयार केलेली आहेत. त्यांचा आकार साधारण चौकोनी असून खोली जेमतेम चार फूट आहे. टाक्यांच्या आत उतरण्यासाठी ओबडधोबड पायऱ्या खणल्या आहेत. माझ्या अंदाजानुसार ह्या पाण्याच्या विहिरी नसून, दगडाच्या खाणी असाव्यात. ह्याच दगडाचा वापर करून तटबंदी बांधली गेली असावी,
बारा फुटांपर्यंत उंच असणारी भूदरगडाची तटबंदी. तिथं काम करत असणाऱ्या सफाई कामगारांच्या उंचीवरून तटबंदीच्या उंचीचा अंदाज येऊ शकतो.

कोरड्या पडलेल्या विहिरी/ दगडाच्या खाणी
तटबंदीचा फेरफटका मारून आम्ही पुन्हा दूधसागर तलावापाशी आलो. तिथे एक मस्त जागा बघून तंबू टाकला. सूर्य मावळ्याची वेळ समीप आली होती. बॅग मधून दुर्बीण काढून पळत पुन्हा तटबंदी वर जाऊन बसलो.
अस्ताला जाणारा सूर्य आणि त्यानं आकाशात पसरलेले रंग डोळ्याचं पारणं फेडत होते. दुर्बिणीमधून सूर्यावरील डाग (सौरडाग/सॅन स्पॉट) स्पष्ट दिसत होते. कानावर पडणारा पक्षांचा किलबिलाट आणि अंगाला थंडगार स्पर्श करून जाणारा मंद वारा मनातलं वातावरण प्रसन्न करत होता.

एव्हाना किल्ल्यावर आमच्या खेरीज कोणीच दिसत नव्हतं. लांबवरून किल्ल्याची डागडुजी करणाऱ्या कामगारांचा आवाज ऐकू येत होता. किल्ल्याच्या उत्तरेला असणाऱ्या भैरवनाथ मंदिरात त्यांचा मुक्काम असावा.

दिवसभरात साडे तीनशे किलोमीटर बाईकचा प्रवास आणि नंतर इतका सुंदर किल्ला बघून दिवस सार्थकी लागला होता. वाढणाऱ्या अंधाराबरोबरच आकाशातील तारे अधिक ठळक होत होते. रात्री ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाची मेजवानी मिळणार हे नक्की होतं !
परिश्रम करून पेटवलेल्या शेकोटीवर आधी सूप मग म्यागी झालं. शरीरही तृप्त झाल्यावर गाणी ऐकत निवांत पडलो. रात्री दुर्बिणीतून चंद्रावरील विवर, आकाशगंगेचा पट्टा आणि अनेक जुळे-तारे बघितले.

उगवणाऱ्या सूर्याबरोबरच आमची सकाळ झाली.

आवरून तलावाच्या पलीकडे असणारं शंकराचं मंदिर बघितलं. शुष्कसांधी शैलीचं हे मंदिर प्राचीन आहे.

मंदिराच्या छताचा भागजवळच असलेलं एक भग्न मंदिर
त्यानंतर भैरवनाथाचं मंदिर बघितलं. मंदिर प्राचीन आहे. मंदिराच्या समोर असणाऱ्या बुरुजावर एक तोफ ठेवली आहे.

मंदिरासमोरील दीपमाळ, शेजारी तोफ
भैरवनाथाच्या मंदिराच्या बाजूला राजवाड्याचे अवशेष आणि सदरेच्या जोती शिल्लक आहेत. गडावरील अवशेष, मंदिरे, घरांच्या जोती असे अवशेष बघितल्यावर किल्ला मोठ्या प्रमाणात राबता होता हे जाणवतं.

किल्ला बघून आम्ही किल्ल्यावरून निघालो. खरंतर किल्ल्यावरून पाय निघत नव्हता. अजून एखादी रात्र इथं काढून मग निघावं अशी इच्छा होत होती. प्रत्येक क्षणाला जॅकपॉट लागल्याप्रमाणे आनंद देणारे ट्रेक फार थोडे असतात !

भुदरगडावरून आमची स्वारी निघाली गगनगडावर ! गूगल मॅप राधानगरी ते गगनगड असा एक रस्ता दाखवत होता. पण तिथे गेल्यावर समजलं कि हा फारच कच्चा रास्ता आहे.
त्या क्षणाला गूगल मॅप वरचा विश्वास कमी झाला. कारण मागल्या वेळेस पारगडला जातानाही गूगलनं आमची अशीच फजिती केली होती.


रस्ता शोधत, घाटवाटांवरून रास्ता नेईल तिथे आणि असेल तश्या रस्त्यावर गाड्या मारत दुपारी बाराच्या सुमारास गगनगड गाठला.
घाटमाथ्यावरून कोकणच्या दिशेनं बाहेर आलेलं एक टोक म्हणजे गगनगड आहे !
किल्ल्याच्या उत्तरेकडून भुई बावडा घाट, तर दक्षिणेकडून करूळ घाट खाली कोकणात उतरतो. पूर्वीपासून वापरात असणाऱ्या आणि कोकणातील मालवण भागातील बंदरांकडे घेऊन जाणाऱ्या ह्या महत्वाच्या घाटवाटा. अश्या मोक्याच्या जागेवर किल्ला नसेल तरच नवल !
गगनगड स्थान
गगनगड हे पु. गगनगिरी महाराजांचे निवासस्थान होतं. रविवार असल्यानं इथं भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. गगनगिरी महाराजांची गुहा तसेच काही मंदिरं किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात आहेत. अजून काही पावले चालत पुढे गेल्यावर बालेकिल्ला आहे.
किल्ल्याचा विस्तार फार मोठा नाही. किल्ल्यावर एक विहीर आणि तटबंदीच्या चार दगडांखेरीज बघण्यासारखंही काही नाही. किल्ल्याच्या पश्चिमेकडील भागात एक छोटंसं माचीसदृश बांधकाम आहे. माचीच्या तत्बंदीच्या जोती नजरेस पडतात.
दुपारच्या कडक उन्हात, अनवाणी हिंडत, तळपायाला चटके सोसत किल्ला बघितला. अश्या वेळेस एकही फोटो काढायला जमलं नाही ह्याची खंत मनात सलतीये.

अडीच वाजता गाड्या कोल्हापूरच्या दिशेनं निघाल्या. चार वाजता कोल्हापुरात चहा झाला. तिथून एन एच फोर वर रमत गमत रात्री सडेनऊ वाजता आम्ही पुण्यात पोचलो.

महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या आणि इतिहासातील अनेक घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या भुदरगडाला शतश: नमन _/\_

*सर्व फोटो श्रुती आणि निखील कडून साभार.

Friday, August 26, 2016

बारा मोटेची विहीर / Bara Motechi Vihir

  कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात असणारा भुदरगड बघायचा बेत ठरला तेव्हाच जाता जाता साताऱ्याजवळील लिंब गावातील 'बारा मोटेची विहीर' बघावी असं ठरलं. ह्या विहिरीच्या रचनेबद्दल एक वेगळा लेख लिहिणं योग्य वाटलं. भुदरगडाविषयी वेगळा लेख लिहणार आहेच.

फेसबुक आणि वॉट्सऍप वर ह्या विहिरीबद्दल बरंच वाचलं-बघितलं होतं. प्रत्यक्ष विहीर बघून कळलं कि जी माहिती सोशल मीडिया वर फिरत आहे, त्यातले फोटो हे ह्या विहिरीचे नसून चम्पानेर येथील दुसऱ्या एका विहिरीचे आहेत. त्या फोटो खालील माहिती मात्र ह्या बारा मोटेच्या विहिरीचीच दिलेली आहे. साहजिक बऱ्याच लोकांनी ही विहीर प्रत्यक्ष बघितली नसल्यानं जी माहिती मोबाईल आणि संगणकावर फिरतीये त्यावर विश्वास ठेवला जातो. वाचकांनी असल्या पोस्ट बद्दल दक्ष राहावं.

लिंब येथील बारा मोटेची विहीर आणि त्यावर बांधलेला राजमहाल/खलबतखाना
ही विहिर म्हणजे स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे ! जे काही बांधलेलं आहे, ते 'काय' बांधलंय आणि त्या बांधकामाचं 'प्रयोजन' काय हे जर अभ्यासपूर्वक जाणून घेतलं तर आपल्या पूर्वजांबद्दलच्या भावनेनं आपली छाती अभिमानानं अजून चार इंच फुलून येईल.

मुख्य विहीर अष्टकोनी आकाराची असून त्याच्या वरील बाजूस मोटा लावण्याच्या नऊ जागा आहेत. प्रत्येक तीन मोटांनंतर अष्ट बाजूंमधली एक बाजू मोकळी सोडली आहे. (तीन तीन मोटा 'अल्टर्नेट' बाजूंवर). एका बाजूच्या खालच्या अंगाला राजवाड्याचं बांधकाम आहे त्यामुळे ह्या बाजूवर मोटा नाहीत. त्याच्या डावी-उजवीकडे एक एक बाजूला सुद्धा मोटांचे चौथरे नाहीत.

विहिरीचा नकाशा (प्रमाणात नाही)
मोटांच्या जागांपासून पाणी पसरू न देता योग्य ठिकाणी वाहून नेण्यासाठी दगडात बांधलेले पाट आणि खाचा आहेत. सर्वच खाचा आज शाबूत नाहीत, कदाचित जमिनीखाली गाडल्या गेल्या असाव्यात किंवा ह्याचे दगड लोकांनी इतर बांधकामासाठी उचलून नेले असण्याची शक्यता आहे.

निमुळत्या आयताकृती भागात मुख्य विहिरीला जोडून असणाऱ्या दोन उपविहीरी आहेत. खरंतर ह्याला उपविहीर म्हणण्यापेक्षा 'हौद' संबोधलं तर जास्ती योग्य ठरेल.
मुख्य विहीर, त्याच्या उपविहिरी किंवा हौद आणि विहिरीमध्ये आत उतरायचा जिना ह्यांचा एकत्रित आकार शंकराच्या पिंडीप्रमाणे आहे. अश्या आकाराच्या बऱ्याच विहिरी शिवकाळात बांधल्या गेल्या. त्यातील एक विहीर पुण्यात अरण्येश्वर जवळ आहे (सध्या अत्यवस्थ). अजून एक विहीर कादवे गावाजवळील शिरकोली इथं बघायला मिळते.

दोन हौदांच्या वरील भागात मोटा लावण्याच्या  प्रत्येकी तीन अशा एकूण सहा जागा आहेत. म्हणजे विहिरीला मोटा लावण्याच्या एकूण पंधरा जागा !

ह्यातील बारा मोटा एका वेळेस चालू असायच्या आणि उरलेल्या तीन ह्या 'बॅक अप' म्हणून होत्या. त्यामुळे विहिरीला बारा मोटेची विहीर म्हणतात, असं वाचण्यात आलं.
एका वेळी बारा (च) मोटा चालू ठेवण्यामागे काय प्रयोजन असावं? पाण्याच्या अधिक उपश्यासाठी पंधरा पैकी अधिकाधिक (जास्तीत जास्त पंधरा) मोटा वापरल्या जात असाव्यात. पावसाळ्यात किंवा गरज नसताना ह्यातील काही मोटाच वापरण्यात येत असाव्यात (बाराच मोटा का ? ह्या संदर्भात काही दस्तऐवज असल्यास कृपया तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा).

विहीर जमिनीच्या पातळीच्या बऱ्याच खाली म्हणजे जवळपास वीस फूट खाली बांधली आहे. येथपर्यंत जाण्यासाठी दगडी जिना बांधला आहे.

विहिरीच्या आत उतरण्यासाठी दगडी जिना

दगडी जिना आतील बाजूने
जिना संपला कि दगडी सपाट वाट आहे. जिन्या नंतरचा हा दगडी रस्ता मुख्य विहिरीच्या अगदी काठापर्यंत येऊन थांबतो. ह्या वाटेच्या दोन्ही बाजूला उपविहिरी किंवा हौद बांधले आहेत. रस्ता संपतो तिथे एक कमान बांधलेली आहे.

जिना उतरून खाली आल्यावर असणारा दगडी रस्ता. ह्याच्या डाव्या उजव्या बाजूला जी खोलगट जागा आहे, ते हौद आहेत. समोर कमान आहे त्याच्या पलीकडे मुख्य विहीर आहे.
हौदांच बांधकाम खूपच विचारपूर्वक केलेलं आहे. ह्या हौदांचा उपयोग असा कि, जेव्हा मुख्य विहिरीला पाणी भरपूर असेल, तेव्हा कमानीमधून ते आतमध्ये शिरेल (ओव्हरफ्लो). हे जास्तीचं पाणी दोन्ही बाजूंच्या हौदामध्ये आपोआप साठवलं जाईल. जेणेकरून आत उतरायचा जिना आणि त्याच्यापुढील वाटेवर पाणी साठून राहणार नाही. कारण हा भाग पाण्याने भरला तर विहिरीमध्ये आत उतरायची वाट आणि खलबतखान्यात जाणारे अंधारे जिने पाण्यानं भरून जातील.
ह्या भागातील पाण्याचं प्रमाण खूपच वाढल्यास दोन्ही हौदांच्या वरती असणाऱ्या मोटांनी पाणी बाहेर काढता येईल.

मुख्य विहिरीला लागून असणाऱ्या कमानीच्या बाजूच्या दोन्ही भिंतींमध्ये वरती जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्यांच्या ह्या वाटा अतिशय चिंचोळ्या असून एका वेळेस एकच व्यक्ती जा-ये करू शकते. पायऱ्यांची ही वाट अंधारी आहे, ती वर जाताना एक 'U' टर्न घेते. पायऱ्यांचे आकार एक सारखे नाहीत. वरती खलबतखाना बांधलेला आहे. खलबतखान्याच्या दोन विरुद्ध दिशांनी पायर्यांच्या वाटा वरती येतात.

कमानीच्या बाजूच्या भिंतींमध्ये जे कोनाडे दिसत आहेत, त्या वरील महालात जाण्याच्या वाटा आहेत

कमानीचा दुसऱ्या बाजूने घेतलेला फोटो. वरील बाजूस महालाचा सज्जा दिसत आहे.
हौदांच्या आणि मुख्य विहिरीच्या मधोमध बांधलेला महाल (खलबतखाना) विशेष पाहण्याजोगा आहे. ह्याच्या बांधकामात दगडी खांब आहेत. खांबावर मारुती, गणपती, गजारूढ महाराज, अश्वारूढ महाराज अशी शिल्प कोरलेली आहे. ह्या महालास एक सज्जा (गॅलरी)आहे. त्याची दिशा विहिरीच्या बाजूला आहे. सज्ज्यास तीन महिरपी कमानी, कमानीच्या प्रत्येक बाजूला एक अशी एकूण सहा कमळ शिल्पे कोरलेली आहेत.
ह्याखेरीज विहिरीच्या बांधकामातील वाघ, सिंह, शरभ ह्यांची शिल्प बघण्यासारखी आहेत. ह्या शिल्पांबद्दल अधिक माहिती गूगल वर मिळू शकेल.
महालाच्या छतावर सिंहासनाची आणि दरबाराची जागा आहे. (ह्या जागेवर अधिक बांधकाम असावं असा एक अंदाज. कारण सिंहासन आणि सभेचे ठिकाण उघड्यावर का असावे ? का हे सभास्थान सध्याच्या पंचायती प्रमाणे गावातील लोकांचे एकत्रीकरण करून चर्चा करण्यासाठी असावे ?)

महालमधील खांब व त्यावरील शिल्प

खांबांवरील कमळ शिल्प
विहिरीच्या बांधकामाची माहिती देणारा शिलालेख विहिरीमध्ये जाणाऱ्या पायर्यांच्या वाटेवर लावला आहे.
ह्या शिलालेखावरून संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहु महाराज (पहिले शाहु महाराज) यांच्या काळात या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ (इसवी सन १७१९ ते १७२४) या दरम्यान सौ. विरुबाई भोसले यांनी केले असं समजतं.
आत उतरायच्या जिन्याच्या कमानीवर असणारा शिलालेख
अमित कुलकर्णी यांनी काढलेले विहिरीचे अप्रतिम फोटो :
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-5-1620x1080.jpg
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-6-1617x1080.jpg
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-1-1440x1080.jpg
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-4-1620x1080.jpg

सध्या तशी दुर्लक्षित असणारी ही विहीर आवर्जून बघण्यासारखी आहे हे नक्की !

*ह्या लेखातील सर्व फोटो निखील आणि श्रुती कडून साभार.