कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात असणारा भुदरगड बघायचा बेत ठरला तेव्हाच जाता जाता साताऱ्याजवळील लिंब गावातील 'बारा मोटेची विहीर' बघावी असं ठरलं. ह्या विहिरीच्या रचनेबद्दल एक वेगळा लेख लिहिणं योग्य वाटलं. भुदरगडाविषयी वेगळा लेख लिहणार आहेच.
फेसबुक आणि वॉट्सऍप वर ह्या विहिरीबद्दल बरंच वाचलं-बघितलं होतं. प्रत्यक्ष विहीर बघून कळलं कि जी माहिती सोशल मीडिया वर फिरत आहे, त्यातले फोटो हे ह्या विहिरीचे नसून चम्पानेर येथील दुसऱ्या एका विहिरीचे आहेत. त्या फोटो खालील माहिती मात्र ह्या बारा मोटेच्या विहिरीचीच दिलेली आहे. साहजिक बऱ्याच लोकांनी ही विहीर प्रत्यक्ष बघितली नसल्यानं जी माहिती मोबाईल आणि संगणकावर फिरतीये त्यावर विश्वास ठेवला जातो. वाचकांनी असल्या पोस्ट बद्दल दक्ष राहावं.
लिंब येथील बारा मोटेची विहीर आणि त्यावर बांधलेला राजमहाल/खलबतखाना |
ही विहिर म्हणजे स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे ! जे काही बांधलेलं आहे, ते 'काय' बांधलंय आणि त्या बांधकामाचं 'प्रयोजन' काय हे जर अभ्यासपूर्वक जाणून घेतलं तर आपल्या पूर्वजांबद्दलच्या भावनेनं आपली छाती अभिमानानं अजून चार इंच फुलून येईल.
मुख्य विहीर अष्टकोनी आकाराची असून त्याच्या वरील बाजूस मोटा लावण्याच्या नऊ जागा आहेत. प्रत्येक तीन मोटांनंतर अष्ट बाजूंमधली एक बाजू मोकळी सोडली आहे. (तीन तीन मोटा 'अल्टर्नेट' बाजूंवर). एका बाजूच्या खालच्या अंगाला राजवाड्याचं बांधकाम आहे त्यामुळे ह्या बाजूवर मोटा नाहीत. त्याच्या डावी-उजवीकडे एक एक बाजूला सुद्धा मोटांचे चौथरे नाहीत.
विहिरीचा नकाशा (प्रमाणात नाही) |
मोटांच्या जागांपासून पाणी पसरू न देता योग्य ठिकाणी वाहून नेण्यासाठी दगडात बांधलेले पाट आणि खाचा आहेत. सर्वच खाचा आज शाबूत नाहीत, कदाचित जमिनीखाली गाडल्या गेल्या असाव्यात किंवा ह्याचे दगड लोकांनी इतर बांधकामासाठी उचलून नेले असण्याची शक्यता आहे.
निमुळत्या आयताकृती भागात मुख्य विहिरीला जोडून असणाऱ्या दोन उपविहीरी आहेत. खरंतर ह्याला उपविहीर म्हणण्यापेक्षा 'हौद' संबोधलं तर जास्ती योग्य ठरेल.
मुख्य विहीर, त्याच्या उपविहिरी किंवा हौद आणि विहिरीमध्ये आत उतरायचा जिना ह्यांचा एकत्रित आकार शंकराच्या पिंडीप्रमाणे आहे. अश्या आकाराच्या बऱ्याच विहिरी शिवकाळात बांधल्या गेल्या. त्यातील एक विहीर पुण्यात अरण्येश्वर जवळ आहे (सध्या अत्यवस्थ). अजून एक विहीर कादवे गावाजवळील शिरकोली इथं बघायला मिळते.
दोन हौदांच्या वरील भागात मोटा लावण्याच्या प्रत्येकी तीन अशा एकूण सहा जागा आहेत. म्हणजे विहिरीला मोटा लावण्याच्या एकूण पंधरा जागा !
ह्यातील बारा मोटा एका वेळेस चालू असायच्या आणि उरलेल्या तीन ह्या 'बॅक अप' म्हणून होत्या. त्यामुळे विहिरीला बारा मोटेची विहीर म्हणतात, असं वाचण्यात आलं.
एका वेळी बारा (च) मोटा चालू ठेवण्यामागे काय प्रयोजन असावं? पाण्याच्या अधिक उपश्यासाठी पंधरा पैकी अधिकाधिक (जास्तीत जास्त पंधरा) मोटा वापरल्या जात असाव्यात. पावसाळ्यात किंवा गरज नसताना ह्यातील काही मोटाच वापरण्यात येत असाव्यात (बाराच मोटा का ? ह्या संदर्भात काही दस्तऐवज असल्यास कृपया तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा).
विहीर जमिनीच्या पातळीच्या बऱ्याच खाली म्हणजे जवळपास वीस फूट खाली बांधली आहे. येथपर्यंत जाण्यासाठी दगडी जिना बांधला आहे.
विहिरीच्या आत उतरण्यासाठी दगडी जिना |
दगडी जिना आतील बाजूने |
जिना संपला कि दगडी सपाट वाट आहे. जिन्या नंतरचा हा दगडी रस्ता मुख्य विहिरीच्या अगदी काठापर्यंत येऊन थांबतो. ह्या वाटेच्या दोन्ही बाजूला उपविहिरी किंवा हौद बांधले आहेत. रस्ता संपतो तिथे एक कमान बांधलेली आहे.
जिना उतरून खाली आल्यावर असणारा दगडी रस्ता. ह्याच्या डाव्या उजव्या बाजूला जी खोलगट जागा आहे, ते हौद आहेत. समोर कमान आहे त्याच्या पलीकडे मुख्य विहीर आहे. |
हौदांच बांधकाम खूपच विचारपूर्वक केलेलं आहे. ह्या हौदांचा उपयोग असा कि, जेव्हा मुख्य विहिरीला पाणी भरपूर असेल, तेव्हा कमानीमधून ते आतमध्ये शिरेल (ओव्हरफ्लो). हे जास्तीचं पाणी दोन्ही बाजूंच्या हौदामध्ये आपोआप साठवलं जाईल. जेणेकरून आत उतरायचा जिना आणि त्याच्यापुढील वाटेवर पाणी साठून राहणार नाही. कारण हा भाग पाण्याने भरला तर विहिरीमध्ये आत उतरायची वाट आणि खलबतखान्यात जाणारे अंधारे जिने पाण्यानं भरून जातील.
ह्या भागातील पाण्याचं प्रमाण खूपच वाढल्यास दोन्ही हौदांच्या वरती असणाऱ्या मोटांनी पाणी बाहेर काढता येईल.
मुख्य विहिरीला लागून असणाऱ्या कमानीच्या बाजूच्या दोन्ही भिंतींमध्ये वरती जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्यांच्या ह्या वाटा अतिशय चिंचोळ्या असून एका वेळेस एकच व्यक्ती जा-ये करू शकते. पायऱ्यांची ही वाट अंधारी आहे, ती वर जाताना एक 'U' टर्न घेते. पायऱ्यांचे आकार एक सारखे नाहीत. वरती खलबतखाना बांधलेला आहे. खलबतखान्याच्या दोन विरुद्ध दिशांनी पायर्यांच्या वाटा वरती येतात.
कमानीच्या बाजूच्या भिंतींमध्ये जे कोनाडे दिसत आहेत, त्या वरील महालात जाण्याच्या वाटा आहेत |
कमानीचा दुसऱ्या बाजूने घेतलेला फोटो. वरील बाजूस महालाचा सज्जा दिसत आहे. |
हौदांच्या आणि मुख्य विहिरीच्या मधोमध बांधलेला महाल (खलबतखाना) विशेष पाहण्याजोगा आहे. ह्याच्या बांधकामात दगडी खांब आहेत. खांबावर मारुती, गणपती, गजारूढ महाराज, अश्वारूढ महाराज अशी शिल्प कोरलेली आहे. ह्या महालास एक सज्जा (गॅलरी)आहे. त्याची दिशा विहिरीच्या बाजूला आहे. सज्ज्यास तीन महिरपी कमानी, कमानीच्या प्रत्येक बाजूला एक अशी एकूण सहा कमळ शिल्पे कोरलेली आहेत.
ह्याखेरीज विहिरीच्या बांधकामातील वाघ, सिंह, शरभ ह्यांची शिल्प बघण्यासारखी आहेत. ह्या शिल्पांबद्दल अधिक माहिती गूगल वर मिळू शकेल.
महालाच्या छतावर सिंहासनाची आणि दरबाराची जागा आहे. (ह्या जागेवर अधिक बांधकाम असावं असा एक अंदाज. कारण सिंहासन आणि सभेचे ठिकाण उघड्यावर का असावे ? का हे सभास्थान सध्याच्या पंचायती प्रमाणे गावातील लोकांचे एकत्रीकरण करून चर्चा करण्यासाठी असावे ?)
महालमधील खांब व त्यावरील शिल्प |
खांबांवरील कमळ शिल्प |
विहिरीच्या बांधकामाची माहिती देणारा शिलालेख विहिरीमध्ये जाणाऱ्या पायर्यांच्या वाटेवर लावला आहे.
ह्या शिलालेखावरून संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहु महाराज (पहिले शाहु महाराज) यांच्या काळात या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ (इसवी सन १७१९ ते १७२४) या दरम्यान सौ. विरुबाई भोसले यांनी केले असं समजतं.आत उतरायच्या जिन्याच्या कमानीवर असणारा शिलालेख |
अमित कुलकर्णी यांनी काढलेले विहिरीचे अप्रतिम फोटो :
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-5-1620x1080.jpg
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-6-1617x1080.jpg
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-1-1440x1080.jpg
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-4-1620x1080.jpg
सध्या तशी दुर्लक्षित असणारी ही विहीर आवर्जून बघण्यासारखी आहे हे नक्की !
*ह्या लेखातील सर्व फोटो निखील आणि श्रुती कडून साभार.
No comments:
Post a Comment