Wednesday, October 23, 2019

किल्ले इंद्राई आणि थरार ! - Indrai Fort

पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जवळपास सर्व किल्ल्यांवर तंगडतोड झाल्यानंतर आता हे लांबचे, काहीसे अल्प परिचित किल्ले खुणावू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सातमाळ रांगेतले किल्ले एकदम राकट. त्यातील धोडप सोडला तर बाकी सर्वच बघायचे राहिलेले. ह्या रांगेतीलच एक किल्ला म्हणजे चांदवड जवळ असलेला इंद्राई !



इंद्राई डावीकडे, राजधेर उजवीकडे


खूप दिवसांनी असं झालं की चक्क पाच जण ट्रेकला यायला तयार झाले! पहाटे साडेपाचच्या सुमारास WR -V सर्वांना घेऊन निघाली.प्रवासात तुफान मजा करत, निवडणुकांच्या उमेदवारांवर ताशेरे ओढत आणि मध्ये मध्ये चहाचे ब्रेक घेत साडेअकराच्या सुमारास आम्ही किल्ल्याच्या पायथ्याच्या इंद्राईवाडीमध्ये पोचलो.
चांदवड जवळील झेंडूच्या शेतात

 आकाश ढगाळलं होतं, त्यामुळे उन्हाचा त्रास कमी होणार होता. खाली असणाऱ्या घरांमध्ये चौकशी करून आम्ही पायवाट पकडली.
दोन पातेली (मोठे खिचडी आणि छोटे चहा साठी), दोन टेंट्स, स्लीपिंग मॅट्स, एक दुर्बीण, कॅमेरा, थंडीचे कपडे वगैरे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाच किलोचा गॅस सिलेंडर असं 'हलकं' सामान घेऊन आम्ही निघालो. हे सिलेंडर प्रकरण माझ्यासाठी पहिल्यांदाच होतं. पुष्कर आणि सुमंत मात्र त्याबद्दल भलतेच कॉन्फिडन्ट होते.

अर्ध्या तासात एका पठारावर आलो. किल्ल्यावर येण्यासाठी तीन मुख्य वाटा आहेत. त्यातील इंद्राईवाडी आणि राजधेरवाडी मधून येणाऱ्या वाटा इथे पठारावर एकत्र येतात. इथून पुढे हि वाट आपल्याला कातळ कड्यापाशी घेऊन जाते. वडबारे नावाच्या गावामधून येणारी वाट कातळकड्याच्या पायथ्याशी ह्या वाटेल येऊन मिळते (नकाशा बघा).


किल्ल्यावर येणाऱ्या पायवाटा



किल्ल्यावरील स्थलदर्शन
पठारावरून कातळ कड्याकडे जाताना वाटेत बारीक पाऊस सुरू झाला. पंधरा-वीस मिनिटात कातळ कड्यापाशी आम्ही पोचलो. इथे कड्याच्या डावीकडच्या टोकाला वळसा घालून थोडं पुढे आलं की उजवीकडे कड्यात खोदून काढलेल्या पायऱ्या आपलं लक्ष वेधून घेतात.

पायऱ्या उजवीकडे ठेवून, कड्यालगत सरळ थोडं पुढे गेलं की काही गुहा दृष्टीस पडतात. ह्या पाण्यानं भरल्या होत्या. त्या पाहून परत मागे पायऱ्यांपाशी आलो. पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. काही फुटांवरचंही दिसत नव्हतं. चार पायऱ्या चढून आम्हाला कोरडी जागा मिळाली. पाऊस कमी व्हायच्या आशेनं तिथे काही वेळ थांबलो.



ह्या पायऱ्या दगड कातून काढल्या आहेत. C शेपचा कट आहे. पायऱ्यांवर जागोजागी पोस्ट होल्स आहेत (लाकडी खांब रोवण्यासाठी केलेले गोल किंवा चौकोनी खड्डे). तसेच उजव्या बाजूच्या कातळ भिंतीमध्येसुद्धा अनेक ठिकाणी छोटे चौकोनी पोस्ट होल्स आहेत. पूर्वीच्या काळात ह्या पायऱ्यांवर जागोजागी छप्पर आणि कठड्याची व्यवस्था असावी हे कळून येतं. पायऱ्यांच्या मध्ये पाणी वाहून जाण्यासाठी चॅनेल खणले आहेत. पावसाचं पाणी बरोबर ह्या चॅनेल मधून वाहून बाहेर दरीकडे ढकललं होतं, त्यामुळेच आम्ही बसलो होतो तो भाग कोरडा राहिला होता. इथे दुर्बीण बाहेर काढली. सहज इकडे तिकडे न्याहाळताना किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला असलेल्या माळावर एक जुनं मशीद दिसून आलं (त्याचे फोटो घेता आले नाहीत. exact लोकेशन साठी मॅप बघावा).




कोरीव पायऱ्या



थोड्या वेळात पाऊस कमी झाला, आणि आम्ही पुढे निघालो.
पायऱ्यांचा मार्ग काटकोनात उजवीकडे वळला. इथून पुढे हा कातळ वर पर्यंत खोदून, दोन कातळ भिंतीमधून मार्ग काढला आहे. नाणेघाट आठवला, फक्त तो वरील बाजूने नैसर्गिकरीत्या उघडा आहे. हा मार्ग मात्र पूर्ण डोंगर पोखरून खाच तयार करून बनवला आहे.
सध्या पुणे-नाशिक महामार्गावर पुण्याहून जाताना संगमनेरच्या अलीकडे चंदनापुरी घाट आहे, त्याचं काम अगदी असंच डोंगर मध्येच खणून खाच तयार करून केलेलं आहे. आज आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आणि सामुग्री आहे, त्या काळी छन्नी-हातोडा आणि हात इतकीच सामुग्री होती.

पायऱ्या जिथे काटकोनात वळतात तिथेच उजव्या हाताला भिंतीमध्ये पहारेकऱ्यांची छोटीशी चौकोनी देवडी खणून काढली आहे. आकार अंदाजे पाच बाय पाच फूट.
माझ्या अंदाजानुसार ह्या ठिकाणी दोन कातळ भिंतींमध्ये बांधलेला किल्ल्याचा एक दरवाजा नक्की असणार. पूर्वी किल्ल्याच्या दरवाज्याला आतल्या बाजूने आडवे असे एक/दोन/तीन अडसर लावायचे. हे अडसर अडकवण्याच्या खोबण्या ह्या ठिकाणी समोरासमोरील कातळ भिंतीमध्ये दिसून येतात.
ह्याच ठिकाणी पायऱ्यांवर एक कमळ शिल्प पडलं आहे. वरील बाजूला असणाऱ्या, सध्या भग्नावस्थेत असलेल्या दरवाज्यावरील हे कमलपुष्प असावे. काळाच्या ओघात घरंगळून खाली आले.


कमळशिल्प



पहारेकर्यांची देवडी


कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या
ह्या पायऱ्या चढून वर गेल्यावर आपल्याला किल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो. दरवाज्याचे केवळ काही दगड शिल्लक राहिले आहेत. दरवाज्याच्या अलीकडे, डाव्या भिंतीवर फारसी भाषेतील शिलालेख आणि उजव्या भिंतीवर एक कोनाडा आहे.

शिलालेख

भग्नावस्थेतील किल्ल्याचा मुख्य दरवाजा

इथून पुढे पुसट झालेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर खोदीव पावठ्या येतात. त्या चढून पुढे आल्यावर सरळ चालत पुढे जावे. डोंगर चिंचोळा आहे. आणि आजूबाजूला काही अवशेष नाहीत. दहा मिनिटं चालत पुढे आल्यावर आपल्याला समोर एक टेकडी दिसते. इथे डाव्या-उजव्या बाजूला दरी आहे. उजवीकडे अगदी दरीच्या तोंडाशी जमिनीशी मिळती जुळती झालेली तटबंदीचे काही दगड दिसले. इथून समोर लांबवर राजधेर, कोळधेर, कांचना, इखारा, धोडप, रवळ्या-जवळ्या अशी एकापेक्षा एक किल्ल्यांची शृंखलाच दृष्टीस पडते. तर डाव्या बाजूस दोन रोडग्यांचा डोंगर, त्याच्या मागे चांदवड किल्ला आणि लांबवर परसूल धरण नजरेस पडतं.


किल्ल्यांची शृंखला (brightness कमी केला आहे)

थोडं पुढे चालत गेल्यावर टेकडीच्या डाव्या बाजूला वाड्याचे अवशेष आहेत. शिल्लक असलेले बांधकाम विटा आणि सिमेंट वापरून केलेले दिसते. त्यावरून ते तुलनेनं नवीन असावं असा अंदाज.
इथे उजवीकडे पाण्याची खांबटाकी आहेत. टेकडी उजवीकडे ठेवून पुढे चालत गेल्यास उजव्या बाजूला खोदलेल्या गुहांची शृंखला आहे. एकाच धाटणीतल्या ह्या जवळपास वीस गुहा आहेत. प्रत्येक गुहेला दरवाजा आणि बाजूला एक किंवा दोन खिडक्या आहेत. गुहेच्या बाहेरील बाजूस नक्षीदार खांब आहेत. ह्या खांबांवर मी खुणा दिसतायत का ते बघितलं, जेणेकरून त्यांच्या बांधकामाच्या काळाचा अंदाज येईल, पण मला नाही समजू शकलं.




सर्व गुहा पाण्यानं भरल्या होत्या. गुहांची रांग संपते तिथे पाण्याचं विशाल टाकं आहे. आर्किटेक्ट पुष्करच्या मते हे पाण्याचे टाके नसून एक सभागृह असावं. ही वास्तू पाण्यानं पूर्ण भरलेली असल्यानं त्याच्या खोलीचा अंदाज काही आला नाही. पाण्याच्या टाक्याशी तुलना केली तर वास्तू प्रचंड मोठी आहे हे मात्र नक्की.



गुहांची शृंखला
ह्या सर्व गुहांचा उद्देश काय असावा? बौद्ध भिक्खुंच्या राहण्याची जागा असावी का? की त्या काळातील प्रवाशांची केलेली सोया असावी?
अजिंठा लेण्यात अनेक छोट्या अंधाऱ्या खोल्या आहेत, ज्याचा उपयोग ध्यान धारणेसाठी व्हायचा असं तिथले गाईड सांगतात. ह्या गुहांचंही तसंच काही असेल का?
"कोणी बांधलं?", "का बांधलं?", "त्या काळी इथे कसं असेल?" हे विचारच मला किल्ल्यांवर भटकण्यास उत्साह देतात. आपली कल्पनाशक्ती लावायची. कधी चूक, कधी बरोबर. पण त्यातली मजाच काही खास !
ह्या सर्व बांधकामावरून इंद्राई हा एक प्राचीन किल्ला आहे ह्यात शंका नाही.

अंदाजे पाच वाजले असतील. सर्वत्र धुकं पसरलं होतं. पाऊसही होता. आम्ही भिजलो होतो. प्रत्येकाच्या मनात "आजच्या पुरतं बस्स झालं" हीच भावना.
आजची रात्र शंकराच्या मंदिरात काढून बाकी किल्ला उद्या सकाळी उठून बघायचा असं ठरलं.

पावलांचा वेग वाढला. गुहांपासून उजवीकडे कातळात खोदलेल्या काही पायऱ्या आहेत. ह्या चढून पुढे दहा मिनिटं चालत गेल्यावर भगवा ध्वज दृष्टीस पडला. आम्ही मंदिर गाठलं.
हे मंदिर म्हणजे बांधलेलं मंदिर नसून खडकात कोरून काढलेलं मंदिर आहे. (भुदरगडावरही असंच कोरून काढलेलं एक छोटंसं मंदिर आहे).
मंदिर कोरणाऱ्यांनी मध्यभागी मूळ दगडातून कोरलेले चार खांब ठेवले आहेत. गाभारा मागील बाजूस वेगळा काढलेला आहे. गाभाऱ्यातील शंकराची पिंड मात्र तुलनेनं नवीन वाटली. गाभाऱ्याच्या बाहेर डावी-उजवीकडे कोनाडे आहेत.
समोर प्रचंड विस्तार असलेला, आयताकृती बांधीव तलाव. तलावाच्या बाजूला काही अंतरावर अर्धवर्तुळाकार रचनेतील बांधकाम.
एकंदरीत सगळं बघता हा परिसर म्हणजे पूर्वी एखादं तीर्थक्षेत्र असावं. किल्ल्यावर लोकांचा भरपूर वावर असावा. त्या काळात ह्या परिसराचं वैभव बघण्यासारखं असणार !

मागे दोन रोड्ग्यांचा डोंगर, त्याच्यामागे चांदवड किल्ला

हेच ते शिवमंदिर

गुहेत स्थिरावलो आणि इथून पुढे आमच्यासमोर एकापेक्षा एक अश्या अडचणी यायला सुरुवात झाली.
मंदिरात जेमतेम चार माणसं दाटीवाटीत झोपू शकतील इतकीच जागा होती. त्यातील बरीच जागा पाण्यानं आधीच धरून ठेवली होती. आम्ही होतो पाच जण !
खूप विचार आणि चर्चा झाली, कोण कुठे कसं झोपेल ते ठरलं.
एकूणच काय, तर रात्री टेंट टाकून मस्त चांदण्यात झोपावं, रात्रीचं गडावर थोडं भटकावं अश्या काही स्वप्नांना कात्री लागली.

"चहा तर व्हायलाच पाहिजे"

पुष्करनं सिलेंडर बाहेर काढला. अमित आणि पुष्कर त्यावर सिलेंडरची थाळी बसवू लागले. काय चैन आहे बघा, बाहेर मुसळधार पाऊस, सगळीकडे ओलं किच्च झालेलं, आणि आग पेटवायला काहीच कष्ट नव्हते !
मी, श्रुती आणि हर्षल कौतुकानं त्यांच्याकडे बघत होतो.

तितक्यात राडा झाला ! त्या सिलेंडरची थाळी बसवत असताना गॅस लीक झाल्याचा आवाज येऊ लागला.
"अरे थांब, अरे थांब, आता असं फिरव" असं म्हणेपर्यंत त्या थाळीलाच जोडलेल्या लायटर मधून ठिणगी पडली, आणि गॅसचा भडका उडाला !!
लीक होणाऱ्या गॅसमुळे ज्वाळा अजूनच मोठी होऊ लागली. दोन सेकंद सगळे लांबूनच त्याच्याकडे बघत होते. त्या थाळीवर आलेला प्लास्टिकचा नॉब वितळून त्याचे थेंब सिलेंडर वरती पडू लागले.

अक्षरशः: फा ट ली !

"बाहेर व्हा.. बाहेर व्हा.. ती बदली घे, भरून आण त्या तलावातून ..."
सगळे पळत बाहेर ! हर्शलनी बदली भरून आणली आणि गुहेच्या दारातूनच त्या सिलेंडरवर ओतली. वाईट म्हणजे आग शांत झालीच नाही..
"अजून एक बदली भरून घेऊन ये .. लवकर.."
अजून एक बदली आणली आणि त्या पेटत्या सिलेंडरवर पालथी केली.
आग शांत झाली, पण गॅस लीक चा आवाज अजूनही येत होता.
पुष्करनं पटकन पुढे होऊन ती थाळी उलट फिरवून काढली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला..

सगळे आत आलो, एकमेकांची तोंड बघण्यात काही मिनिटं गेली.
सर्वांनी जमिनीवर बघितलं. उरली सुरली कोरडी जागासुद्धा पाण्यानं व्यापून टाकली.
"आता काय करायचं ?" मोठा प्रश्न होता. पावसाच्या तयारीनं कोणी आलोच नव्हतो ! थंडीचे कपडे सोबत आणले होते.
पावणेसहा वाजले. अंधार पडू लागला. ओले कपडे आणि वाढती थंडी.
"उतरू खाली.. गावात जाऊन झोपू" - एक नवा विचार.

सर्वांनाच पटलं.

"इतकं आलोय तर चहा व्हायलाच पाहिजे, तो घेऊ आणि निघू"
"अरे तो सिलेंडरचा मॅटर नकोय पुन्हा ... चहा कसला करतो.."
"लावू रे.. नीट लावू .. थांब आधी त्या थाळीचा थोडा अभ्यास करू.. मग च लावू."
थाळी आणि त्याला असलेल्या लायटरचं सेटिंग नीट समजून घेतलं आणि थाळी नीट सिलेंडरवरती बसवली. नॉब फिरवला, गॅस चालू झाला.

'कंट्रोल आणि आऊट ऑफ कंट्रोल' मधला फरक !

पाचव्या मिनिटाला चहा तयार होता. सोबत बिस्किटं आणि केक हाणले.
"आवरा रे.. अंधार वाढत चाललाय"

जणू किल्ल्यालाच आम्ही नकोसे झालो होतो. सव्वासहा वाजता देवाला नमस्कार करून उतरायला सुरुवात केली. समोर गडद धुकं.. आणि अंधार .. मुसळधार पाऊस .. दहा फुटांवरचंही दिसेना !
पंधरा मिनिटं चाललो आणि एका दरीच्या समोर येऊन थबकलो.
"बोंबला, वाट चुकलो.. फिरा मागे .. थोड्या अलीकडे बघा डावीकडे वाट गेलेली दिसतीये का.."

पुन्हा पाच मिनिटं बॅकट्रॅक. बारीक पायवाट उजवीकडे वरती जाताना दिसली. त्यावरून अंदाज बांधून डावीकडे जायला सुरुवात केली. पुढे आल्यावर त्याच वाटेवरून किल्ल्यावर आलो असं वाटलं. आपण त्या चिंचोळ्या भागात आहोत हे समजलं. इकडे तिकडे दरी, सरळ चालायचं !

तितक्यात धुकं थोडंसं बाजूला झालं आणि समोर बघतो तर काय.. काही फुटांवर दहा-बारा गायी पुतळ्यासारख्या उभ्या होत्या !! आमचे पुतळे व्हायचेच बाकी होते !
इतक्या जवळ जाऊन पण त्यांची आम्हाला आणि आमची त्यांना चाहूल पण लागली नाही.
हा क्षण पचवतो तोच त्यांच्यातून मध्येच एक घोडा पळत पळत उजवीकडून डावीकडे गेला..
अरे काय चाललंय काय.. गुरं इतक्या पावसात कोणी सोडली? आणि मध्येच तो घोडा कुठून आला?
'कैच्याकै च !'

एव्हाना सुमंत एकदम passive मोड मध्ये गेले होते. तोंडातून शब्दही फुटत नव्हता. त्यामुळे वाट शोधायच्या धडपडीत आम्ही चौघ च. श्रुती तिची भीती स्पष्ट बोलूनच मोकळी करत होती.
मला भीती वाटत नव्हती पण वाट सापडली नाही तर रात्र कुठे काढावी त्याची चिंता सतावत होती.
मोबाईल काढला. GPS चालू केलं. ट्रेक ला जायच्या आधी मॅप ऑफलाईन डाउनलोड करायची माझी सवय इथे उपयोगात आली. मॅप वर बघितलं तेव्हा समजलं आम्ही किल्ल्याच्या एकदम उत्तर टोकावर आलो आहोत.
खोदीव पायऱ्या मागे उजव्या हाताला कुठेतरी राहिल्या.
पुन्हा मागे फिरलो, GPS झिंदाबाद. गूगल मॅप झिंदाबाद.
वाट मिळेल तसं त्या खाचेच्या दिशेनं जायला सुरुवात केली. अनेक वेळेस समोर भलतीच कुठलीतरी घळई आली, मध्येच दाट काटेरी झुडुपं, काही ठिकाणी दहा फूट उभा ड्रॉप.. पायऱ्यांच्या अगदी जवळ येऊन पोचलो होतो. इकडे तिकडे बॅटरी मारून अखेरीस पायऱ्या नजरेस पडल्या, आणि खूप बरं वाटलं.
वाट सापडली !

पायऱ्या आल्यावर काय, सगळेच राजे ! तासाभरात किल्ला उतरला.

"चला, चांदवडला जाऊ, दोन घास शेवभाजी पोटात ढकलू, आणि पुढचं पुढे ठरवू"

इंद्राईला मनोमन नमस्कार करून, पुन्हा भेटायला यायची इच्छा व्यक्त केली, आणि तिथून निघालो. चांदवडला शेवभाजी हाणली, आणि निघालो.
सर्वच जण गाडी चालवणारे होते. प्रत्येकानं आळीपाळीनं थोडा वेळ डुलकी थोडा वेळ ड्रायविंग करत पहाटे चारच्या सुमारास पुण्याला पोचलो.

तर असा हा इंद्राईचा थरारक अनुभव !
आजपर्यंतच्या गड भटकंतीचा सर्व अनुभव पणाला लावायला लागला. निसर्गाचं रौद्र रूप आणि त्याच्या पुढे आपण किती क्षुद्र आहोत ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली !
आधुनिक तंत्रज्ञान आपली कशी मदत करू शकते तेही समजलं.

इंद्राईवर जाणाऱ्यांसाठी काही टिप्स -
१) किल्ला हिवाळ्यात करणे सोयीचे. अर्थात, आजकाल पावसाचा भरवसा नाही, त्यामुळे हवामानाचा पूर्ण अंदाज घेऊन जाणे.
२) किल्ल्यावर जाणारी वाट अवघड नाही. पावसाळ्यात मात्र वाटेचा अंदाज येणं अवघड आहे.
३) शंकराच्या मंदिरात दाटीवाटीत पाच जण झोपू शकतात. अलीकडील २० गुहा झोपेसाठी योग्य नाहीत. ओपन टेंट टाकून झोपायला पुष्कळ जागा आहे.
४) गडावर अनेक टाकी आहेत. परंतु कोणत्याच टाक्याचे पाणी पिण्यास तितकेसे चांगले नाही. पातेले घेऊन जाणे, आणि पाणी उकळून पिणे.
५) जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती.

Leave nothing but footprints. Take nothing but memories.

आणि हो .. गॅस सिलेंडर ट्रेकला न्यावा की न न्यावा ह्यावरून आमच्यात सध्या वाद सुरू आहेत.

Friday, October 11, 2019

मोरगिरी - सुखद अनुभव ! - Morgiri

पाचे आज पुन्हा मृगगडाच्या वाटेवर होती. मृगगडावर मी अगदी महिन्याभरापूर्वीच जाऊन आलो होतो. पण आजची फेरी श्रुती (बायको) साठी होती. आम्हाला दोघांनाही गड-किल्ले भ्रमंतीची आवड असल्यानं आमच्यात एक अलिखित नियम पडला आहे. जर मी एखादा किल्ला तिच्याशिवाय बघितला, तर तिच्यासोबत तो पुन्हा बघायचा. आणि मलाही आवडतं हे. आपले किल्ले आहेतच असे. पुन्हा पुन्हा जावसं वाटणारे !

NH४ वरती अपाचे पळत होती. कामशेतचा तो छोटा घाट पार केला तसा डावीकडील भातराशीच्या मागून आभाळात घुसलेला डोंगराचा एक सुळका डोकावू लागला.

मोरगिरी !

प्रत्येक वेळेस तिथून जाताना तो खुणावत असतो. आजही त्यानं साद घातली.

"श्रुती, मोरगिरी. व्हायचाय आपला."
"जायचं का?"
"चला लगेच. तसंही मी परवाच डिटेल्स काढून ठेवलेत."

मृगगडाची मनातल्या मनात माफी मागून गाडी लोणावळ्यातून डावीकडे वळवली.
मोरगिरी तसा अल्पपरिचित किल्ला. थोड्या अवघड श्रेणीतला. त्यामुळे गर्दीची लागण ह्या किल्ल्याला झालेली नाही.
लोहगड, विसापूर, तुंग, कोराईगड ह्या किल्ल्यांवर मी अनेक वेळेस आलोय. दर वेळेस मोरगिरीचा हा डोंगर साद घालायचा. कोराईगडावरून बघितल्यावर ह्या डोंगरानं तुंगला ग्रहण लावलेलं दिसतं.
काही वर्षांपूर्वी शाखेतील एका शिक्षकांना ह्याबद्दल विचारलं तेव्हा समजलं कि हा डोंगर म्हणजे मोरगिरी नावाचा किल्ला आहे.

इतक्या जवळ, पण इतका अपिरिचित !

२०१५-१६ च्या सुमारास साईप्रकाशच्या ब्लॉग मध्ये ह्याबद्दल चांगली माहिती मिळाली. गेल्या दीड एक वर्षांपासून ट्रेकक्षितिज वरही मोरगिरीची चांगली माहिती समाविष्ट केलेली आहे.
हिमांशू सोबतही बोलणं झालं होतं. तो नुकताच जाऊन आला होता. त्यानं दिलेली माहितीची शिदोरीही सोबत होतीच.

जांभुळणे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. गावाच्या बुद्धवस्तीपाशी गाडी लावली. अनिल आणि राम ह्या गावातल्या छोट्या पोरांनी आम्हाला रस्ता दाखवला. पंधरा-वीस मिनिटांच्या चढाई नंतर आम्ही एका विस्तीर्ण पठारावर आलो.
मोरगिरी म्हणजे ह्या विस्तीर्ण पठारावर साधारण मध्यभागी असलेला एक उंच कातळ. आमच्या जागेपासुन तो फार लांब अंतरावर दिसत होता. इथून किल्ल्यापर्यंत कसं जायचं ते सांगून अनिल आणि राम मागे फिरले.

पठारावर आल्यावर लांबवर असणारा मोरगिरी !
त्या प्रचंड पसरलेल्या पठारावर आता आम्ही दोघंच होतो. अधून मधून धुकं येऊन वातावरण अजून गूढ करत होतं. ट्रेक-क्षितिज वर मोरगिरी हा कठीण श्रेणीतील किल्ला असं नमूद केलं आहे, आणि त्यांनी दिलंय म्हणजे नक्कीच असणार !
आज खूप दिवसांनी अश्या आडवाटेवरच्या किल्ल्यावर येणं झालं होतं.
भोवतालच्या ह्या वातावरणामुळे मनात थोडी चलबिचल होती. असं गूढ वातावरण मी बऱ्याच वेळेस अनुभवलं आहे. पण सोबत तीन-चार जणांचा ग्रुप असेल तर त्याचं दडपण येत नाही. आज मात्र आम्ही दोघंच.
मध्येच मला बाई-माणसांच्या गप्पांचा पुसटसा आवाज ऐकू येत होता. लांब लांब वर कोणीच नव्हतं. किल्ला जवळपास दीड-दोन किलोमीटर अंतरावर होता. हे पठाराची बऱ्यापैकी उंचीवर होतं. त्यामुळे एकतर ह्या आवाजाचा मला भास होत होता, किंवा वारा कुठूनतरी लांबून हा आवाज माझ्यापर्यंत घेऊन येत होता.
श्रुतीला हे सांगून उगाच तिची भीती मी वाढवली नाही.

तसा ह्या किल्ल्याच्या आजूबाजूचे डोंगर आणि परिसर माझ्या परिचयाचा होता. आज मात्र निसर्गासोबत नीट कनेक्ट होत नव्हतं.

पावलं भरभर टाकायला सुरुवात केली.

"काय रे .. होईल ना? कुठच्या कुठंय बघ किल्ला अजून.."
"होणार होणार ... चल भरभर"
शक्य तितक्या लवकर त्या सुळक्याच्या पायथ्याशी पोचायचं असा बेत होता.

त्या पठारावरून आम्ही डोंगर डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत साधारण वीसेक मिनिटं चाललो. वाट अगदी सरळ सपाट होती. आता किल्ला डावीकडे आला होता. ते पठार मात्र उजवीकडे 'कैच्याकै' लांबपर्यंत पसरलं होतं.


आता फक्त इतकी चढाई बाकी !

आम्ही वरती चढायचा मार्गच शोधात होतो. तितक्यात समोर थोड्या अंतरावर गावातली काही मुलं दिसली. तेव्हा खूप बरं वाटलं. चलबिचल, भीती, काळजी सगळं एका क्षणात गायब ! हातापायात नवा त्राण शिरला.

माणसाला माणसाची सोबत किती महत्वाची आहे !




त्या मुलांना पुढच्या चढाईचा रस्ता विचारला. इथून पुढे त्या कातळावर चढाई सुरु ! सुरुवातीला दाट जंगलातून, आणि पुढे कारवीच्या झुडुपातून वाट भरभर वर चढत गेली.


पावलागणिक उंची वाढत होती. पावसाळा असल्यानं माती ओली होती. त्यामुळे चांगली पकड मिळत गेली. उन्हाळ्यात मात्र इथे प्रचंड घसारा असणार, आणि हाच चढ अधिक धोकादायक होणार ह्यात शंका नाही. उन्हाळ्यात इथे येणं टाळावं.
वाटेत एक दोन ठिकाणी सात-आठ फुटांचे अवघड टप्पे लागले. हे सर्व पार करून आम्ही गडमाथ्याच्या अगदी जवळ पोचलो होतो.
इथे काही चपला दिसल्या. ह्याचा अर्थ वर अजून लोक आहेत.
अरे हो, आज नवरात्रातील अष्टमी !
आम्ही पण आमची पादत्राणे इथेच सोडली. थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला खडकात पाण्याचं टाकं दिसलं. ते पूर्ण भरून ओसंडून वाहत होतं.

काही मिनिटात आम्ही 'जाख'-देवीच्या ठाण्यात पोचलो. तांदळाच्या रूपात असलेली हि जाखदेवी ह्या भागातील लोकांची कुलस्वामिनी.
देवीचं ठाणं म्हणजे कातळात खोदलेली, अंदाजे पाच बाय सहा फूट इतकी छोटीशी गुहा आहे. ह्याच गुहेत एक पाण्याचं टाकं आहे. एका शेजारी एक अशी जेमतेम पाच-सहा मंडळी बसतील इतकीच गुहेच्या बाहेर जागा. समोर तीनशे फुटांचा थेट ड्रॉप !

देवीचं मनोमन दर्शन झालं, चांगभलं रे देवा चांगभलं !

तिथेच मांडून ठेवलेला खोबऱ्याचा प्रसाद घेतला. गावातील काही मंडळी देवीच्या दर्शनाला आलेली होती. सर्वांसोबत तोंडओळख झाली.
पठारावरून चालत असताना ह्यांच्याच गप्पांचा आवाज मला ऐकू येत होता.

देवीच्या गुहेशेजारीच वर जाण्यासाठी पाच-सात फुटांची छोटी शिडी लावली आहे. पूर्वी हि शिडी नव्हती, त्यामुळे हा पॅच अधिकच कठीण होता. शिडीवरून जाताना पाठमोरी बघितलं तर डोळे चक्रावतील अशी खोल दरी !


अगदी थोडक्या जागेत उभी असणारी मंडळी. तिथेच डाव्या बाजूला देवीचंठाणं आणि समोरच्या कातळ भिंतीवर शिडी आहे.

शिडीमुळे आम्हा गरिबांची सोय झाली. नाहीतर शक्य वाटत नव्हतं. शिडी चढून गेल्यावर पुढे खोदीव पायऱ्या लागल्या. त्या पार केल्या आणि आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोचलो !
गडमाथ्याचा विस्तार अगदी थोडका. वरती पाण्याचं एक टाकं आणि बांधकामाचे काही अवशेष विखुरलेले होते.
किल्ल्याचा उपयोग मुख्यत: जवळच कोकणात उतरणाऱ्या पायमोडी घाटावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा.
माथ्यावरील पाण्याचं टाकं
पूर्वीच्या काळी ह्या किल्ल्यांवर लोक कसे रहात असावेत ह्याची आपण केवळ कल्पना करावी.. मोरगिरी काय, कोकणदिवा काय.. इतरही काही किल्ले... इतकीशी टीचभर जागा तिथं. असे किती लोक मुक्कामी असावेत?
शक्य नाही वाटत. पण ते सत्य आहे. ते बांधकाम, ती पाण्याची टाकी, खोदीव पायऱ्या.. कोणी बांधलं हे सगळं?
आजूबाजूच्या किल्ल्यांवर चमकणाऱ्या मशालींच्या उजेडानीही किती धीर मिळत असेल त्यांना !

इथून दिसणारं दृश्य मात्र खरोखर मन मोहून टाकणारं होतं.


परम पवित्र भगवत ध्वज की जय !

कातळ चढताना खाली पसरलेलं पठार

पावना धरणाचे दृश्य !

समोरच असणारा तुंग किल्ला आणि अलीकडला किल्ल्यासादृश  भासणारा डोंगर.


जांभूळणे गावातून किल्ल्याचा मार्ग दिला आहे.

हेच ते शिखर जे इतकी वर्ष NH४ वरून जात येता खुणावत होतं. आज आम्ही त्या शिखरावर पोचलो!
आज मोरगिरीला भेटलो.
समोर तुंग अक्षरश: ठेंगणा दिसत होता. त्यामागे लोहगड, विसापूर, भातराशी, उजवीकडे तिकोना, मागे कोरीगड असे किल्ले नजरेस पडत होते.

हे सगळं सगळं मनात साठवून, किल्ल्यावरचे ते काही क्षण सोबत घेऊन आम्ही निघालो. पुन्हा देवीच्या ठाण्यापाशी आलो. सोबतच तिथे आलेली मंडळी निघाली. पटपट उतरत पंधरा मिनटात आम्ही पठारावर पोचलो सुद्धा ! इथून सर्व मंडळी आपल्या वाटेने निघाली. किल्ल्यावर येण्यासाठी अजूनही एक वाट प्रचलित आहे. ती लोकं तिकडून आली होती.
आम्ही आमच्या वाटेनं निघालो.

पुन्हा लांबवर पसरलेलं ते पठार. पण आता भीती पेक्षा त्या जागेबद्दल एक आपुलकी निर्माण झाली होती. मनात मोरगिरी बघितल्याचा अपार आनंद ! आणि आम्ही खऱ्या अर्थानं त्या निसर्गाशी एकरूप झालो होतो ! परतीच्या वाटेवर कणभरही भीती वाटली नाही. भरपूर फोटो काढले. पठारावर काही क्षण निवांत बसून घालवले. काही वेळात खाली उतरलो.

एक थरारक पण उत्साहवर्धक अनुभव घेऊन.




किल्ले भ्रमंतीचा पुरेसा अनुभव सोबत असेल तर किल्ला खूप अवघड नाही. तरीसुद्धा जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. 
जाण्यासाठी उत्तम कालावधी - ऑक्टोबर, नोव्हेंरपर्यंत. नंतर घसारा वाढून चढाई उतराई अवघड होण्याची शक्यता आहे.

Leave nothing but footprints. Take nothing but memories.

Sunday, March 26, 2017

कलानिधीगड (कलानंदीगड) - Kalanidhigad (Kalanandi gad)

      गड किल्ल्यांना परमोच्च महत्त्व प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. गड किल्ल्यांचा आधार घेऊन आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. महाराजांनी योग्य जागा हेरल्या. मोक्याच्या जागेच्या आजूबाजूच्या डोंगरावर बुरूज-तटबंदीचा शेला पागोटा चढवून किल्ल्यांची उभारणी केली.
रामचंद्रपंत अमात्य विरचित आज्ञापत्रात महाराजांचे किल्ल्यांविषयी असलेले विचार प्रकट होतात. त्यात म्हटलंय - "राज्यरक्षणाचें मुख्य कारण किल्ले, देशोदेशी स्थळे पाहून बांधावे."

कोल्हापूर जिल्ह्यातला कलानिधीगड हा असाच एक देखणा किल्ला. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. सिंधुदुर्ग आणि गोमंतकात उतरणाऱ्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी.


कालिवाडे गावातून कलानिधीगड
गड कसा असावा आणि त्याच्या रचनेसंदर्भातील कागदोपत्री वाचलेली माहिती मी ह्या किल्ल्यावर अगदी यशस्वीपणे पडताळून पहिली. किल्ले फक्त बघण्यापेक्षा ते समजून घ्यायला खूप जास्ती मजा येते !
रामचंद्रपंत अमात्य ह्यांनी गड बांधणीबाबत आज्ञापत्रात नमूद केलेल्या 'सूचना' हा किल्ला बांधणाऱ्या स्थापत्यवीराने तंतोतंत पाळल्या आहेत. कलानिधीगडावर ह्याची चटकन जाणीव होते ह्याचं कारण गड विस्ताराने लहान आहे, आणि इतक्या कमी जागेत किल्ल्यावर आवश्यक अश्या सर्व प्रकारच्या इमारती उभारल्या आहेत. हे एक प्रकारचं 'चॅलेंज' म्हणावं लागेल. कोणती इमारत कुठे असावी हे सुद्धा आज्ञापत्रातील उल्लेखाला अनुसरून आहे. लेखात मी त्या गोष्टींचा पडताळा नमूद करणार आहे.

बेळगाव-आंबोली रस्त्यावर बेळगाव पासून अंदाजे २५ किमी अंतरावर कालिवडे हे किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे. गडावर पायी जाण्यासाठी सध्या कालिवडे गावातून जाणारी पायवाट वापरात आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रॅक्टर जाईल असा अजून एक कच्चा दगडी रस्ता सुद्धा काढला आहे. हा गडाला लांबची फेरी मारून वरती येतो. आम्ही ह्या दगडी रस्त्यानं न जात पायवाट पकडली आणि किल्ला चढायला सुरुवात केली.

वाटेत खंडोबाचं (कि एखाद्या वीराचं?) उद्ध्वस्त मंदिर आणि मूर्त्या दिसल्या. चढताना मध्येच मुख्य पायवाट सोडून दुसऱ्या कमी रुळलेल्या वाटेनं गेल्यामुळे मंदिराचे हे अवशेष बघायला मिळाले.


वाटेमध्ये असलेली वीराची मूर्ती

गडाचा दरवाजा गाठायला अंदाजे दीड तास लागला. सुस्थितीत असणारा हा दरवाजा खरंतर गडाचा दुसरा दरवाजा आहे. ह्याचं कारण किल्ला फिरताना आम्हाला भग्न झालेला गडाचा मुख्य दरवाजा दिसला, जो दुसऱ्या दिशेला आहे.
ह्या सुस्थितीत असणाऱ्या दुसऱ्या दरवाज्याची रचना गोमुखी म्हणता येणार नाही. जागेअभावी दरवाज्यास गोमुखी पद्धतीनं बांधणं शक्य झालं नसावं. पण दरवाजा एका सशक्त बुरुजाच्या मागे लपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. दरवाज्याच्या डावीकडील बुरूज त्याला बरोबर कवेत घेतो. (वर्धनगडाची चोर दिंडी अगदी ह्याच पद्धतीनं बांधली आहे). 
आज्ञापत्रात पंत म्हणतात-
"दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून, पुढे बुरूज देऊन, येतिजाती मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे, यांकरिता गड पाहून, एक दोन तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यांमध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या"


गडाचा सुस्थितीत असणारा दरवाजा, उजवीकडील बुरुजामध्ये तोफ डागण्याची जागा आणि जंग्या दिसत आहेत
दरवाज्याची रचना - वर येणारी पायवाट बुरुजांच्या कुशीतून किल्ल्यात प्रवेश करते

दरवाज्यातून आत आल्यावर मागील बाजूस फांजीवर जाण्यास बांधलेल्या पायऱ्या दृष्टीस पडतात.

दरवाजा आतील बाजूने
दरवाज्याकडे पाठ करून उभं राहिल्यास उजवीकडील तटबंदी गडाच्या पश्चिम टोकापर्यंत शाबूत आहे. ह्याच ठिकाणी डाव्या हाताला एक लांबलचक भिंत बांधली आहे. जी गडाच्या दक्षिण टोकाच्या तटबंदीला जाऊन मिळते. ह्या भिंतीची जाडी अंदाजे सव्वा मीटर तर लांबी जवळपास सत्तर मीटर आहे(जीपीएस मेझरमेन्ट). ही भिंत तटबंदी नाही, तर किल्ल्यावरील सपाट प्रदेशाचे दोन भाग करण्यासाठी आहे (ज्याला आपण मराठीत 'पार्टिशन वॉल' म्हणतो).
अशी भिंत बांधायचं प्रयोजन आणि त्या संदर्भातील आज्ञापत्रातील उल्लेख लेखामध्ये पुढे देतो आहे.
गडाची विकीमापिया इमेज
सध्या ह्या भिंतीला मध्येच खिंडार पाडून एक लोखंडी दार बसवलं आहे. ह्या लोखंडी दारातून प्रवेश केल्यावर आपण किल्ल्याच्या पूर्वेकडील विभागात प्रवेश करतो. समोरच बीएसएनएलची चौकी आहे. चौकीत कालिवडे गावातील दोन व्यक्ती सिक्युरिटी गार्ड म्हणून काम पाहतात. ह्या चौकीच्या शेजारी टॉवर उभारला आहे.
इथून डाव्या बाजूनं पुढे गेल्यावर दारुकोठार आहे (नकाशा बघावा). एके ठिकाणी ह्याचा उल्लेख वाडा म्हणून आलेला आहे. परंतु मला हा वाडा किंवा कोणाच्या राहण्याची जागा वाटत नाही. हे दारुकोठार किंवा युद्धसामग्री संबंधातील एखादं बांधकाम असावं. ह्याचं कारण लेखात मी पुढे दिलं आहे.
ह्याच दिशेनं पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या पूर्व टोकावरील बुरुजावर येतो. ह्या ठिकाणावरून कालिवडे गावातून येणारी पायवाट दृष्टीस पडते.
तटबंदी डावीकडे ठेवत गडाच्या दक्षिण दिशेला चालत राहिल्यावर आपल्याला त्या काळी बांधण्यात आलेलं शौचकूप (संडास) दृष्टीस पडतं. गडाच्या तटबंदीला अगदी चिकटून ह्याचं बांधकाम आहे (तटबंदीची भिंत दोन्हीमध्ये 'कॉमन' आहे). असे अजून तीन शौचकूप ठराविक अंतरावर दिसतात. लोहगड, सिंधुदुर्ग, राजगड आदी किल्ल्यांवर शौचकूप आहेत, पण ते तटबंदीच्या आतच भुयार किंवा कोनाड्यासारखे बांधून काढले आहेत. पूर्वीच्या काळी तटावर चोवीस तास पहारेकरी असायचे (जश्या आज आपल्या शिफ्ट ड्यूट्या असतात). ह्या पहारेकऱ्यासाठी केलेली हि सोय आहे, जेणेकरून त्यांना नित्यविधींसाठी तटापासून लांब जायची गरज भासणार नाही.
मला ह्या शौचकुपांचं फार विशेष वाटतं. बहुतांश किल्ल्यांवर फक्त दरवाजे, तटबंदी आणि बांधकामाच्या जोती शिल्लक राहिल्या आहेत. 'शौचकूप' हे एक बांधकाम असं आहे की जे अजूनही आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे, आणि त्याच्या रचनेत फारसे बदल झालेला नाही!
इथून थोडं पुढे गेल्यावर आपण 'त्या' भिंतीच्या दुसऱ्या टोकापाशी येतो जी दरवाज्यापासून किल्ल्याला दोन भागात विभागते. इथून भिंतीला डावीकडे ठेवत पुन्हा लोखंडी दरवाज्यापाशी यायचं, आणि लोखंडी दरवाज्यातून डावीकडे बाहेर पडायचं.

इथे आपल्या डाव्या हाताला भवानी मातेचं प्रशस्त मंदिर आणि त्याला लागूनच असलेलं एक घर आहे. ह्या मंदिर परिसराचे तीन विभाग आहेत
१) मंदिरासमोरील अंगण, इथे एक मोठं तुळशी वृंदावन(समाधी?) आहे.
२) मंदिराचा सभामंडप.
३) मंदिराचा गाभारा. खरंतर दोन गाभारे आहेत, एका गाभाऱ्यात शिवलिंग आणि भैरोबा तर दुसऱ्या गाभाऱ्यात भवानी मातेची शस्त्रसज्ज मूर्ती आहे. हि मूर्ती पारगड आणि प्रतापगड ह्या किल्ल्यांवर असलेल्या मूर्तीशी साधर्म्य असलेली, पण आकारानं लहान आहे. ही मूर्ती ज्या खडकात घडवली त्याचा प्रकार अगदी प्रतापगड आणि पारगडावरील मूर्तीच्या खडकाशी मिळत जुळता आहे. गाभाऱ्याचा बाजूलाच गणेशाची देखणी मूर्ती आहे.
मंदिर आणि परिसर रचना
श्री गणेशाची मूर्ती

वरील आकृतीमध्ये मी ह्या बांधकामाची साधारण रचना दाखवायचा प्रयत्न केला आहे.
मंदिराला लागून एक घर आहे. ह्याला वाडा म्हणता येणार नाही, ना हि ह्याला सदर म्हणता येईल. हे एक साधं घर किंवा भक्तांसाठी मुक्कामाची सोय असावी. भिंतींमध्ये दिवे ठेवण्यासाठी अनेक कोनाडे आहेत. घरातच एका कोपऱ्यात दोन भिंती बांधून एक भाग वेगळा काढला आहे. हे स्नानगृह असावे.


तुळशी वृन्दावन

हे बघून आपण मंदिराच्या मागे असणारी विहीर बघायची. हि विहीर म्हणजे दगडाची प्रचंड मोठी खाण आहे. ह्या आयताकृती विहिरीची लांबी अंदाजे चोवीस मीटर, रुंदी अठरा मीटर आणि सरासरी खोली पाच-सहा मीटर आहे. किल्ल्याच्या बांधकामातील दगड ह्याच खाणीतून काढले आहेत.
वापरलेल्या दगडाचे काम झाल्यावर अश्या खाणींचा उपयोग नंतर विहिरी म्हणून केला गेला. महिपालगड, सामानगड सारख्या किल्ल्यांवर ह्या खाणींना पाणी लागले आणि त्या त्या ठिकाणी एकच मोठीच्या मोठी विहीर तयार झाली.
दगडाची खाण, मागे मंदिर परिसर

पण कलानिधीगड, संतोषगड या किल्ल्यांवर खाणीमध्ये पाणी लागलेले दिसत नाही. त्यामुळे खाणीच्या तळाशी अजून खोल खणून विहिरी काढण्यात आल्या. कलानिधीगडावर ह्या खाणीत तीन कोपऱ्यात तीन विहिरी खणल्या आहेत. ह्यातील एकच विहीर सध्या वापरात आहे. बाकी दोन बुजलेल्या स्थितीमध्ये आहेत. वापरात असलेली विहीर अंदाजे पन्नास फूट खोल आहे. जानेवारी मध्ये ह्यातील पाण्याची पातळी अंदाजे चाळीस फुटांवर होती. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची ही एकमेव सोय आहे, त्यामुळे किल्ल्यावर येताना लांब दोर बाळगावा.

आज्ञापत्रात पंत म्हणतात -
"गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणी ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळपर्येंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे, जसें तसें पाणीही पुरतें, म्हणुन तितकियावरीच निश्चिंती न मानावी. उद्योग करावा, किनिमित्य कीं, झुंजामध्यें भांडियांचे (तोफांच्या) आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें. याकरीतां तसे जागीं जखिरियाचें पाणी म्हणून दोन चार टाकीं तळीं बांधावीं. त्यातील पाणी खर्च होऊं न द्यावें, गडाचे पाणी बहुत जतन राखावें."
महाराजांच्या दूरदृष्टीला काय म्हणावे! त्यांच्या विचारला अनुसरूनच त्या काळी किल्ल्यांचा बांधकाम केलं गेलं, त्यामुळे आपल्याला बहुतांश किल्ल्यांवर पाण्याची अनेक टाकी बघायला मिळतात.
युद्धामध्ये पाणी स्रोतांमध्ये विष टाकून तो निरुपयोगी करणे हि सुद्धा एक नीती होती. त्यामुळे अश्या वेळेस गडावर अनेक टाकी, तीही किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागात असणे केव्हाही सोयीचेच होते!

विहीर पाहून आम्ही किल्ल्याच्या दक्षिणेकडील तटबंदीचा फेरफटका मारायला निघालो. वाटेत घरांच्या आणि इतर बांधकामाच्या अनेक जोत्या आहेत. त्यात एक जोत इतरांपेक्षा लांबी-रुंदीने मोठी आहे. हा किल्लेदाराचा वाडा असावा.
येथील तटबंदीला लागूनच एक धान्यकोठार आहे. त्याचेही मध्ये भिंत बांधून दोन भाग केलेले दिसतात.

आतापर्यंत आपण जे जे अवशेष बघितले त्यावरून एक कळतं की किल्ल्यावर बऱ्यापैकी वस्ती असावी आणि ही वस्ती किल्ल्याच्या ह्याच भागात होती.
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किल्ल्याच्या सध्या वापरात असलेल्या दरवाज्यापासून जी आडवी भिंत बांधली आहे, ती किल्ल्याचे दोन भाग करते. भिंतीच्या एका बाजूला दारुकोठार आहे. (बीएसएनएल चा टॉवर आहे त्याच्या शेजारी). दुसऱ्या भागात मंदिर, अंगण, त्याशेजारील घर, इतर बांधकामाचे आणि घरांचे अवशेष आहेत. धान्यकोठार सुद्धा आहे.
पंतांनी आज्ञापत्रात काय म्हटलंय ते पाहू -
"दारूखाना घराजवळ घराचे परिघाकाली नसावा. आठ पंधरा दिवसांत हवालदाराने येऊन दारू, बाण, होके आदिकरून बाहेर काढून उष्ण देऊन मागुती मुद्रा करुन ठेवीत जावें. दारूखान्यास नेहमी राखणेस लोक ठेवावे. त्यांणी रात्रं दिवस पहा-या प्रमाणे जागत जावें. परवानगीविरहित आसपास मनुष्या येऊं न द्यावे. किल्ला संरक्षणाचे कारण ते भांडी व बंदुका, याकरीता किल्ल्यांत हशम ठेवावेत (ते) बंदुकीचे ठेवावेत"
दारूकोठाराजवळ घरे असू नयेत(ते धोक्याचे आहे). दारुगोळा वेळोवेळी बाहेर काढून त्याची देखभाल बघितली जायची. परवानगी शिवाय दारूकोठारापाशी येण्यास मज्जाव होता.
किल्ल्याच्या एका भागात घरे तर दुसऱ्या भागात बीएसएनएल च्या चौकीशेजारील बांधकाम आहे. आज्ञापत्रात सूचना लक्षात घेता हे बांधकाम म्हणजे वाडा नसून दारुकोठार किंवा युद्धसामग्री संबंधातील एखादं बांधकाम असावं असा माझा तर्क आहे.
कलानिधीगड बांधणाऱ्याकडे जागा कमी उपलब्ध होती. गडाला बालेकिल्ला किंवा माची नाही. त्यामुळे किल्ल्याला दोन भागात मोडणाऱ्या जाड भिंतीचे प्रयोजन हे संरक्षणासाठी, आणि लष्करी गोष्टी मूळ वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी असावं असं मला वाटतं.

धान्यकोठाराच्या बाजूला आम्हाला किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याचे भग्नावशेष दिसले. हाच किल्ल्याचा मुख्य दरवाजा! हा दरवाजा म्हणजे दोन दरवाज्यांचा समूह आहे. पहिला (बाहेरील) दरवाजा पश्चिमेकडे तोंड करून, तर दुसरा (आतील) दरवाजा दक्षिणेकडे तोंड करून बांधला आहे. दोन्ही दरवाजे मजबूत तटबंदीने जोडले आहेत. एका दरवाज्यातून दुसऱ्यामध्ये जाण्यासाठी ९० अंशात वळायला लागतं. ह्याच वेळेस शत्रूची पाठ दिसते.
भग्नावस्थेतील मुख्य दरवाजा



शिळेवर असणारी गणपतीची मूर्ती


मुख्य दरवाजा नकाशा, आत येणारी वाट बुरुज तटबंदीच्या विळख्यात आहे
भग्न दरवाजा

सध्या हा दरवाजा पूर्णपणे पडझड झालेला आहे. इतका, की इथं एक दरवाजा आहे हे ओळखायला खूप बारीक नजरेनं बघावं लागतं. दगडांच्या शीळांचा मोठा ढीग इथे जमा झाला आहे. त्यातीलच एका आडव्या शिळेमध्ये कोरलेला गणपती दरवाज्याची साक्ष पटवून देतो. दरवाज्याच्या बाजूचे बुरूज अतिशय धोकादायक झालेले आहेत. 
दुर्गांची ही अवस्था बघून स्वर्गातील त्या किल्लेदाराला कितीवेळा आवंढा गिळायला लागत असेल, ते त्यालाच ठाऊक.

दरवाज्याला लागून असलेल्या तटबंदीवरून आपण पश्चिम दिशेला चालत राहायचं. इथे एक शानदार बुरूज उभा आहे.
किल्ल्यावर असणारा एक शानदार बुरुज, त्यात वरती तोफ डागण्याची जागा दिसत आहे. बुरुजाच्या मध्य उंचीवर जंग्या दिसत आहेत

ह्यापुढील तटबंदी फोडून ट्रॅक्टरचा रस्ता गडावर आणला आहे. ह्या बुरुजावरून सूर्यास्त बघणं हा एक स्वर्गीय अनुभव होता. लांबवर पारगड आणि आंबोली घाटातले डोंगर डोळ्याचं पारणं फेडत होते.
असं दृश्य फक्त गड-किल्ल्यांवरच
इथून पुढे चालत गेल्यावर पश्चिमेकडील भक्कम बुरूज येतो. ह्याच बुरुजाला लागून असलेल्या तटबंदीमध्ये आपल्याला अलंगा दिसतात. अलंगा म्हणजे पहारेकऱ्यांच्या विश्रांतीची जागा.
तटबंदीला लागून असलेल्या अलंगा

हे बघून किल्ल्याची तटबंदी डाव्या हाताला ठेवून आम्ही  मागे फिरलो. पुन्हा मंदिरापाशी आलो. येथे गडफेरी पूर्ण झाली. संपूर्ण किल्ला बघताना मनाला अपार समाधान मिळालं.


किल्ल्यावरून दिसणारे जंगमहट्टी जलाशयाचे दृश्य 


त्या काळी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य अशा गडकिल्ल्यांची उभारणी करण्यात आली. प्रत्येक किल्ल्यावरील बांधकामाला एक वेगळा अर्थ आहे. हे बांधकाम घडविणारा कारागीर वेगळा आहे, त्यामुळे त्यात विविधता आहे. ह्या बांधकामातच आपल्या इतिहासाची आणि समाजरचनेची पायामुळं आहेत.
ह्या किल्ल्यांना नुसत्या भेट देऊन परतण्यापेक्षा, जर ते समजून घेतले तर त्यातून अधिक मजा तर येतेच, शिवाय त्या वास्तूबद्दल आणि आपल्या पूर्वजांबद्दल मनात आदरभाव निर्माण होतो.

२५० किल्ल्यांच्या निमित्ताने

      क ळवण्यास आनंद होतो आहे की आज माझे २५१ गडकोट अभ्यासपूर्ण बघून पूर्ण झाले. लहानपणी संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आजह...